Soil And Water Management Agrowon
संपादकीय

Village Soil-Water Management : गावनिहाय करा माती-पाणी व्यवस्थापन

विजय सुकळकर

Agriculture Management System : पुढील काही दिवसांत मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोरदार पावसासह मॉन्सूनच्या आगमनाचे वेध राज्यातील शेतकऱ्यांना लागले आहेत. त्यातच मॉन्सूनच्या आगमनास पोषक वातावरण निर्माण झाले असून राज्याच्या बऱ्याच भागांत पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यावर्षी महाराष्ट्रासह देशभर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहेच, तर काही हवामान तज्ज्ञांनी पूर्व विदर्भ, कोकण हे अधिक पावसाचे विभाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडणार असल्याचे संकेतही दिले आहेत. असो, हवामानाचा अंदाज चार महिने असा दीर्घकालावधीसाठी आणि देशव्याप्त असल्याने नेमका कुठे, किती, कधी पाऊस पडेल, याचा अचूक अंदाज बांधणे थोडे कठीणच जाते.

हवामान बदलाचा हा काळ आहे. या काळात कमी वेळात धो-धो पाऊस पडतोय. हा पाऊस पाण्यासोबत शेतातील मातीही वाहून घेऊन जातो. शिवाय दोन पावसांत मोठे खंड पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही सर्व परिस्थिती नुकसानकारक तसेच पीक उत्पादन घटीस कारणीभूत ठरतेय. त्यामुळे शेतकऱ्यांसह शासन-प्रशासनाने अधिक तसेच कमी पाऊसमान अशा दोन्ही परिस्थितीतील नियोजनास सज्ज असायला पाहिजे.

यावर्षी लोकसभा निवडणूक आचार संहितेत शासन-प्रशासनाचे खरीप पीक नियोजन अटकले आहे. निविष्ठाच्या पुरवठ्यातही प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. निविष्ठांपूर्वीही शेतीसाठी माती अन् पाणी हे दोन मूलभूत घटक महत्त्वाचे आहेत. माती-पाणी-पिके यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असून अनेकदा हे समजण्यात सर्वच चूक करतात. परिणामी नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते.

देशातील ६० टक्के जमीन अयोग्य व्यवस्थापनाने खराब झाली असल्याचे १९४० च्या दशकात यातील अभ्यासकांनी सांगितले होते. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे तेव्हापासून आपले शेती-मातीचे अयोग्य व्यवस्थापन चालूच आहे. त्यामुळे आज आपल्या शेतीची काय परिस्थिती झाली असेल, त्याचे कुठेही नीट मोजमाप नाही. आपण आजपर्यंत शेतीत पाण्यालाच महत्त्व देत आलो आहोत, आजही देतोय आणि पिकांचा मुख्य आधार माती दुर्लक्षितच राहिली आहे. मागील आठ दशकांत जमीन सुधारणेबाबत देशात काही कायदे करण्यात आले, निर्णय घेतले.

परंतु हे सर्व काळाच्या ओघात वाहून गेले आहे. त्यामुळे कमी पाऊसमानामुळे कुठे जमिनीचे वाळवंटीकरण होत आहे, तर कुठे अति पावसाने मातीची धूप होऊन ती पेरणीयोग्य सुद्धा राहत नाही, हे वास्तव आपल्याला स्वीकारावेच लागेल. आत्तापर्यंत महाराष्ट्रात चार सिंचन आयोग होऊन गेले, पण पाणी आणि माती यांचे संयुक्त कायदे आपल्याकडे नाहीतच.

या दोन गोष्टी कशाही वापरा, त्यावर काहीच नियंत्रण नाही. ‘पाणी आणि माती यांचा एकात्मिक विचार करणे ही आता काळाची गरज झाली आहे. माती आणि पाण्याचे व्यवस्थापन गावनिहाय हवे. हे करीत असताना सगळीकडे एकच मोजमाप लावणे चुकीचे ठरेल. गावनिहाय पडणारा पाऊस आणि मातीचा प्रकार पाहून पीक-पाण्याचे व्यवस्थापन करावे लागेल.

सिंचनाचा वापर मातीच्या गुणवत्ता आणि प्रमाणावर अवलंबून असतो. पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबरअखेर गावात किती पाणी उपलब्ध आहे हे पाहून ग्रामपंचायतीने पुढचे नियोजन करायला हवे. परंतु तसा काही हिशेब ठेवण्याची यंत्रणा आणि मनोवृत्तीही सध्यातरी आमच्याकडे नाही.

जर तुमच्या शेतातली माती चांगली असेल आणि तिच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल तर शेतातून पाणी वाहणार नाही. माती निकृष्ट असेल तर पाण्याबरोबर ती वाहून जाईल. शेतातून मातीचा एकही कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा वाहून जाणार नाही, असे शेतकऱ्यांच्या पातळीवर नियोजन झाले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT