Water Crisis  Agrowon
संपादकीय

Water Crisis : ‘पाणीबाणी’वर शाश्‍वत उपाय

Water Scarcity : शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी प्रत्येक नागरिकाला मिळायला हवे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, तर सर्वांना असे पाणी पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

विजय सुकळकर

Water Shortage Crisis : उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न उग्ररूप धारण करेल, याची चाहूल पावसाळ्यानंतरच लागली होती. अगदी त्याचप्रमाणे उन्हाचा चटका वाढत असताना ग्रामीण आणि शहरी भागांत सुद्धा पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत आहे. कमी पाऊसमानामुळे नदी-नाले कधीच आटले आहेत.

आता वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून धरणे, तलाव, विहिरीही आटत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक शहरांची पिण्याच्या पाण्यासाठीची भिस्त आता टॅंकरवर आहे, तर ग्रामीण भागात महिलांची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यातील झोडगे या गावातील माय-लेकी गावाशेजारील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता पाय घसरून विहिरीत पडल्याने दोघींचाही मृत्यू झाला आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक महिला-मुली असाच जीव धोक्यात घालून मिळेल तिथून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करीत असताना अजून किती जणींचा बळी आपण घेणार आहोत, हा खरा प्रश्‍न आहे.

शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी प्रत्येक नागरिकाला मिळायला हवे, हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, तर सर्वांना असे पाणी पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अशावेळी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, गमवावा लागतो, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

सत्तर वर्षांपूर्वी गाव परिसरातील नदी-नाले आठ-दहा महिने वाहते असायचे. त्यातील पाणी डोक्यावरून वाहून पिण्यासाठी रांजणात भरून ठेवायचे, अशी पद्धत होती. उन्हाळ्यात नदी, नाले आटले तरी त्यात खोल विऱ्हा केला की त्यास पाणी लागत होते. त्यावर उन्हाळ्यातही पाण्याची गरज भागत होती.

पुढे विऱ्ह्याचेही पाणी पुरत नसल्याने गाव परिसरात १० मीटर खोलीपर्यंतचे बारव करण्यात आले. बारवेला वर्षभर पाणी असायचे. पाण्याची गरज वाढली तसे गावात सार्वजनिक आड झालेत. आडही जास्त खोल नव्हते. आडही आटत चालल्यानंतर ६० ते ९० मीटर खोलीचे बोअरवेल करण्यात येऊ लागले. आता बोअरवेलची खोली २०० मीटर नेली, तरी अनेक ठिकाणी पाणी लागत नाही.

बोअरवेल बंद पडू लागल्यानंतर पाण्याचा शोध गावाबाहेर सुरू झाला. त्यानंतर गावकुसाबाहेर विहिरी पाडून तेथील पाणी विद्युत पंपाने गावात आणण्याची कल्पना पुढे आली. यातूनच पुढे घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविण्याच्या योजनेचा जन्म झाला. आता आपण पाहतोय नळ योजना असलेल्या अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.

अर्थात, पिण्याच्या पाण्यासाठीचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न फसले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे गावाजवळील शाश्‍वत पाण्याचे नैसर्गिक स्रोत आपण एकतर नष्ट केले आणि दुसरे म्हणजे नवे स्रोत निर्माण करून त्यांचे संवर्धन करण्यात आपण कमी पडलो आहोत.

१५ ऑगस्ट २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनची सुरुवात केली. हर घर जल, हा या मिशनचा एक भाग आहे. २०२४ पर्यंत या अभियानाद्वारे ग्रामीण भारतातील सर्व घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. परंतु देशभर अजूनही २५ टक्के कुटुंबे पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडणीपासून वंचित आहेत. नळाद्वारे पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचण्यासाठी गाव परिसरात पाण्याचे स्रोत जिवंत असायला पाहिजेत.

अन्यथा, जल जीवन मिशनही फेल ठरेल. पाऊस हा पाण्यासाठीचा एकमेव स्रोत आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी पुढील आठ-नऊ महिने गावाला पुरेल अशा पद्धतीने प्रत्येक गावाने भूगर्भ अथवा भूपृष्टावर साठवायला हवे. ही साठवणूक भूगर्भातील पाणी परत वापरता येईल तर भूपृष्ठावरील साठा प्रदूषित होणार नाही, पाझरणार नाही आणि त्याचे बाष्पीभवन देखील होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. पाणीबाणीवरील हाच शाश्‍वत उपाय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT