
Indian Agriculture: संसाराचा गाडा हाकताना विधवा महिलांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र अशा कष्टकरी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र करून घोणसी (ता. जळकोट, जि.लातूर) येथील चौतराबाई सुभाष नवाडे यांनी स्वावलंबी केले आहे. गटामार्फत गांडूळ खत आणि दशपर्णी अर्काचे उत्पादन केले जाते. विविध प्रदर्शने आणि शेतकऱ्यांना या उत्पादनांची विक्री करून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
साधारणपणे ३५ वर्षांपूर्वी पतींचे अकाली निधन झाले. मुलगा, मुलगी लहान असतानाच हे संकट कोसळले. पाच एकरांतील उत्पन्नातून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे शक्य नव्हते. अशा बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी घोणसी (ता. जळकोट, जि. लातूर) येथील चौतराबाई सुभाष नवाडे यांनी वीस वर्षांपूर्वी स्वतःसह नऊ विधवा महिलांना एकत्र करून शिवशंभो महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला पंचवीस रुपयांपासून बचत सुरू केली. शांताबाई गव्हाणे यांचा अपवाद सोडला तर उर्वरित नऊ महिला अशिक्षित आहेत. मात्र एकत्र येत या महिला बचत गटाचे आर्थिक व्यवहार शिकल्या, स्वाक्षरी करण्यासाठी बाराखडीदेखील शिकल्या.
गटाला सुरुवातीला गावातील अंगणवाड्यांतील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे काम मिळाले. त्यानंतर गटाने कपडे विक्री सुरू केली. सहा वर्षांपूर्वी गटाला कासा संस्थेचे पाठबळ मिळाल्यानंतर विविध ठिकाणी जाता आले, यातून बचत गटाच्या कामाची माहिती मिळाली. संस्थेच्या माध्यमातून गटातील सदस्यांना गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क उत्पादनाची माहिती आणि प्रशिक्षण मिळाले. संस्थेने सुरुवातीला गांडूळ खत निर्मितीसाठी एक बेड आणि दशपर्णी निर्मितीसाठी एक बॅरेल मोफत उपलब्ध करून दिले.
गांडूळ खत निर्मितीला सुरुवात
महिला गटातर्फे चौतराबाईंच्या शेतीमध्ये तीन वर्षांपासून गांडूळ खत आणि अर्क निर्मिती केली जाते. गांडूळ खत निर्मितीसाठी गटातील सर्व महिलांचे चांगले योगदान आहे. कासा संस्थेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी गटाला गांडूळ खत आणि दशपर्णी निर्मितीसाठी एक लाख रुपयांचे साहित्य मिळाले. आठ मोठे व तीन हजार लहान बॅरेल, खत निर्मितीसाठी पाच बेड, बॅनर, बकेट आणि मग आदी साहित्यांचा त्यामध्ये समावेश होता. खत निर्मितीसाठी १५ फूट लांब, चार फूट रुंद आणि दोन फूट उंचीचे पाच बेड उभारण्यात आले. गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे शेणखत गावातील गोशाळेतून उपलब्ध होते. गटातर्फे गोशाळेकडून तीन हजार रुपये ट्रॉली दराने शेणखत आणि पंचवीस रुपये लिटर दराने गोमूत्राची खरेदी केली जाते.
शेतशिवारातील काडीकचरा एकत्र करुन त्यावर शेणखत टाकून पंधरा दिवस रोज पाणी शिंपडले जाते. खतातील उष्णता कमी झाल्यानंतर गांडूळ बीज सोडले जाते. दोन महिने दहा दिवसांनंतर गांडूळ खत तयार होते. गटातर्फे गुणवत्तापूर्ण गांडूळ खताचे उत्पादन केले जाते. अर्धा आणि एक किलो पिशवीमध्ये खताचे पॅकिंग केले जाते. गटाने वर्षभरात तीन टन खत उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. साधारणपणे १८०० रुपये क्विंटल दराने गांडूळ खताची विक्री होते.
दशपर्णी अर्क निर्मिती
दशपर्णी अर्क निर्मितीसाठी गटातील महिला गावशिवारात फिरून सीताफळ, कण्हेरी, कडूलिंब, करंजी, एरंडी, धोतरा, रुचकी, टणटणी, गुळवेलीचा पाला गोळा करतात. गोमूत्र, दहा प्रकाराची पाने मिसळून दशपर्णी अर्क तयार केला जातो. कीडनाशक म्हणून दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. तसेच भाजीपाला पिकामध्ये आळवणीसाठी शेतकऱ्यांच्याकडून दशपर्णी अर्काला मागणी आहे. दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामापूर्वी पाचशे लिटर दशपर्णी अर्क तयार केला जातो. पाच लिटर कॅनमध्ये पॅकिंग केले जाते.
पन्नास रुपये लिटर दराने दशपर्णी अर्काची विक्री केली जाते. विविध ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनात गांडूळ खत आणि दशपर्णी अर्काची विक्री केली जाते. याचबरोबरीने शेतकऱ्यांना देखील या उत्पादनांची मागणीनुसार विक्री होते. शहरी भागातील लोक कुंडीतील फुलझाडे, भाजीपाल्यासाठी गांडूळ खत आणि दशपर्णी अर्काची खरेदी करतात. येत्या काळात ऑनलाइन बाजारात उत्पादनांच्या विक्रीसाठी चौतराबाई यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
चार दिवस गटासाठी...
अध्यक्षा चौतराबाई नवाडे यांच्यासह सचिव सुनीता गोविंद सुकणे, सदस्या मीरा लक्ष्मण मालुसरे, शशिकला श्रीराम जानतिने, शकुंतला मुरलीधर जानतिने, लक्ष्मीबाई बाबू काळे, हजरतबी चाँदसाब मुल्ला, शांताबाई बालाजी गव्हाणे, नूरजहाँ रमजान शेख, रुक्सान नबीब शेख यांचा गटात सहभाग आहे. सरासरी ३५ ते ५५ वर्ष वयोगटातील या महिला आहेत. गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क निर्मिती, खत चाळणे आणि पॅकिंग या कामासाठी गटातील सदस्या सकाळच्या वेळी एकत्र येतात.
आठवड्यातून चार दिवस बचत गटाच्या कामासाठी आणि उर्वरित तीन दिवसांमध्ये गटातील सदस्या रोजगारासाठी गावशिवारातील शेतीमध्ये कामाला जातात. गेल्या चार वर्षांपासून चौतराबाई नवाडे सेंद्रिय शेती करत आहेत. सध्या शेतीमध्ये मूग, उडीद आणि सोयाबीन आहे. गेल्यावर्षी त्यांनी केसर आंबा पन्नास कलमांची लागवड केली आहे. येत्या काळात गटातर्फे रोपवाटिका करण्याचे नियोजन आहे. याबाबत गटाने प्रशिक्षण घेतले आहे. गटाकडे खत, दशपर्णी अर्क उपलब्ध असल्याने रोपनिर्मिती खर्चामध्ये बचत होणार आहे. रोपनिर्मितीतून चांगला आर्थिक फायदा मिळेल, असा चौतराबाई नवाडे यांना विश्वास आहे.
‘उमेद’मधून ट्रॅक्टर अन् अवजारे बॅंक
महिला बचत गटांच्या वाटचालीत चौतराबाई नवाडे यांचे उल्लेखनीय काम आहे. गावातील काही बचत गटाच्या ग्रामसंघाच्या त्या अध्यक्षा असून घोणसी जिल्हा परिषद गटासाठी स्थापन शिल्पकार महिला प्रभाग संघाच्या सचिव आहेत. उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या प्रभाग संघाला शेतीसाठी लागणारे अवजारे बँक स्थापन करण्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला. यातून त्यांनी ट्रॅक्टर, दोन अवजारे खरेदी केली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात संघाने पेरणी आणि मशागतीच्या माध्यमातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
चौथराबाई यांच्या पुढाकाराने कृषी विभागाच्या ‘आत्मा’कडे त्यांच्या चार गटांची नोंदणी आहे. कृषी विभागाकडे नैसर्गिक शेतीसाठी पन्नास महिलांचे दोन गट आणि उमेद अभिायांतर्गत चाळीस गटाचे नियोजन चौतराबाई यांच्या पुढाकाराने सुरू आहे. इतर बचत गटाच्या महिलांनाही त्या गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रशिक्षण देत असतात. यातून महिला सक्षमीकरण आणि जमीन सुपीकतेची चळवळ चांगल्या गतीने वाढली आहे.
चौतराबाई नवाडे ७०८३६४६६३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.