
Farming Reality: शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या आल्या की सोशल मिडीयावर शेतीतील फसव्या यशकथांचा महापूर येतो. हा योगायोग नसतो. हे ठरवून केले जाते. वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य कमी करणे हा त्यामागचा मुख्य हेतू दिसतो. शिवाय यांचं बघून नवे-नवे लोक (बकरे) अधिक पैसे कमाविण्याच्या लालसेपोटी शेतीत येऊन असे प्रयोग करतात आणि हमखास बुडतात. शेतीमध्ये असे नवे लोक आणून त्यांना देशोधडीला लावणे हा सुद्धा एक फायद्याचा धंदा आहे. यात शेतकरी बुडतो पण शेतीमालाची लूट करणारी साखळी मालामाल होते.
शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या आल्या की सोशल मिडीयावर शेतीतील यशकथांचा महापूर येतो. कोणीतरी आयटीची नोकरी सोडून शेती करू लागला आणि तो शेतीतून करोडोचं उत्पन्न काढतोय... कोणीतरी परदेशातील सुखवस्तू जीवन सोडून भारतात येतो. शेतीत नवा प्रयोग करतो आणि वर्षाकाठी करोडो रुपयांची कमाई करू लागतो... कोणी सेंद्रिय शेतीतून, कोणी भाजीपाल्यातून तर कोणी शेतीतील टाकाऊ पदार्थांपासून लाखो रुपये मिळवतो... अशा बातम्या आणि व्हिडिओ सगळीकडं दिसू लागतात. मी गेल्या वर्षभरापासून बारकाईने बघतोय. हे आपोआप घडत नाही. हे पद्धतशीरपणे कोणीतरी घडवतंय. एका बाजूला सातत्याने शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असताना शेतीतील लाखो, करोडो रुपये कमाईच्या यशकथा कशा काय समाजमाध्यमावर दिसू लागतात?
मी मुद्दाम अशा कथा वाचतो, बघतो. तेव्हा त्यातील खोटारडेपणा सहजपणे लक्षात येतो. या फसवणूक कथा कोण समोर आणतंय? कशासाठी आणतंय? याचा बारकाईने विचार केला, तर हे करण्यामागे वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे गांभीर्य कमी करणे हा मुख्य हेतू दिसतो. शिवाय यांचं बघून नवे-नवे लोक (बकरे) अधिक पैसे कमाविण्याच्या लालसेपोटी शेतीत येऊन असे प्रयोग करतात आणि हमखास बुडतात. शेतीमध्ये असे नवे लोक आणून त्यांना देशोधडीला लावणे हा सुद्धा एक फायद्याचा धंदा आहे. यात शेतकरी बुडतो पण शेतीमालाची लूट करणारी साखळी मालामाल होते. शिवाय हे सगळं बिनबोभाट चालू राहातं. कोणाचं तरी बघून, वाचून, ऐकून असे प्रयोग करणाऱ्याला मी याच्यामुळं बुडायलो असं सांगताही येत नाही.
शेतीत कुठलाही नवा प्रयोग करणाऱ्याला लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीचे लाभधारक अनेक असतात. लुटारूंना शेतकऱ्यांच्या भल्याबुऱ्याशी काही देणंघेणं नसतं. शेतकऱ्यांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणं आणि ही साखळी जगवणं हे सरकारचं अघोषित धोरण असल्याने अशा बोगस यशकथा हा त्यांचा अधिकृत सापळा आहे. या सापळ्यात अनेक नवे, भाबडे लोक अडकतात हा एक फायदा. दुसऱ्या बाजूला शेती व्यवसाय किती फायदेशीर आहे, हे मध्यमवर्गाच्या आणि कोणाचं तरी अनुकरण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनावर ठसवता येतं.
शेतकऱ्यांच्या शत्रूंचा कावा
हे यशकथावाले शेतकरी उच्चशिक्षित, निवृत्त सनदी अधिकारी, आयटीवाले, फॉरेन रिटर्न्ड असे असतात. साहजिकच बहुतेकांना वाटतं की, ‘शेतीत यश मिळवण्यासाठी अशी बुद्धिमान माणसं गरजेची आहेत. अशाच माणसांची शेती फायद्याची होऊ शकते. जे शेती तोट्यात आहे असे म्हणतात, जे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात; ते शेतकरी शेती करण्यासाठी लायक नाहीत,’ असं बांडगुळांचं मत बनतं. ‘तो शेतीत एवढं उत्पन्न काढतोय, तर तुम्ही कसं काय हे काढू शकत नाही? तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करीत नाही, कष्ट करीत नाहीत. म्हणजे तुम्ही लायक नाहीत,’ असा निष्कर्ष ही मंडळी काढतात. शेती फायद्याची आहे हो; पण बहुतांश शेतकऱ्यांना ती करता येत नाही, हे मत एकदा समाजमनावर बिंबवलं, की शेतकरी आत्महत्यांबद्दलची सगळ्यांची संवेदना आपोआप बोथट होऊन जाते. शेतकरी आत्महत्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ‘रोजचंच मढं, त्याला कोण रडं’ असा होऊन जातो. अशी समाजभावना बनवण्यात शेतकऱ्यांचे शत्रू यशस्वी झाले आहेत.
मी ज्या आनंददायी शेतीचा पुरस्कार करतो, त्यात शेतीत मोठी कमाई होण्याची सुतराम शक्यता नाही. ती फक्त पोट भरू शकते. जगण्याचा आनंद देऊ शकते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ज्यांची मातीशी नाळ जुळलेली आहे तेच लोक अशी शेती करू शकतात. ज्यांना कोरडवाहू शेतीतून पैसे कमावण्याची इच्छा आहे, त्यांनी शेतीत अजिबात येऊ नये, ही मांडणी मी वारंवार करतोय. अर्थात, केवळ स्वत:च्या आनंदासाठी शेती करणं बहुतांश शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यांच्या समोरचे जीवनमरणाचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांना शेतीतून अधिक पैसे मिळवण्याची गरज आहे. असे शेतकरी अशा यशकथांचं अनुकरण करून हमखास बुडतात.
पाण्याची आस
अधिक उत्पन्न काढायचं तर शेती ओलिताखाली आणायला हवी. त्यासाठी शेतकरी विंधन विहिरीवर (बोअरवेल), विहिरीवर लाखो रुपये खर्च करतात. यातून पुरेसं पाणी मिळत नाही. पहिल्यांदा लागलेलं पाणी टिकत नाही आणि यामुळं कर्जबाजारी झालेला शेतकरी या कर्जातून कधीच बाहेर येत नाही. दहा कर्जबाजारी शेतकऱ्यांशी बोलाल तर त्यातले पाच शेतकरी हमखास असे भेटतील.
शेतकऱ्यांमध्ये एक खोड आहे. ते थोडसं यश मिळालं तरी ते तिखटमीठ लावून सांगतात. पण जबर अपयशही लपवण्याचा प्रयत्न करतात. अपयश सांगणं हे ते कमीपणा मानतात. याचा अनुभव मी वेळोवेळी घेत गेलोय. मी स्वत: शेतीत शाश्वत पाणी मिळविण्याच्या प्रयत्नात भरपूर बुडालोय. तीन वर्षांपूर्वी तीव्र उन्हाळ्यातही अर्धा इंची पाणी विहिरीत पडावं म्हणून मी चार विंधन विहीरी घेतल्या. एका विंधन विहिरीला अर्धा इंची पाणी लागलं. ते विहिरीत टाकण्यासाठी हजार फुटाची नवीन पाइपलाइन टाकली. फक्त चारच दिवस विहिरीत पाणी पडलं आणि बोअर बंद पडला. ती माझी, अर्धा इंची पाण्याची गोष्ट वाचून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं.
अनेकांनी तुमच्या शेतात पाण्याचं हमखास ठिकाण दाखवतो, असा विश्वास दाखवला. पण माझ्या लक्षात आलं होतं, की आमच्या शेतात विंधन विहीर यशस्वी होऊच शकत नाही. सगळी प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने ते शक्यच नव्हतं. म्हणून मी तो मोह टाळला आणि ४२ लाख लिटर क्षमतेचं शेततळं केलं. आज या तळ्यामुळं दुष्काळी वातावरणातही आमची छोटीशी फळबाग टिकून आहे. पण असे अनेक शेतकरी मी पाहतोय, की थोडेसे आगाऊ पैसे हातात आले, की ते हमखास विंधन विहीर घेतात आणि शेतीच्या नावाने बोटं मोडत बसतात.
कोरडवाहू शेतीत फायदा होणं शक्य नाही, हे माहीत असताना अवाजवी गुंतवणूक करून जोखीम वाढवणं शहाणपणाचं नाही. उलट कमी खर्च हा फायदा वाढवतो. प्रत्येकाची जमीन, पाण्याची स्थिती, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे एका शेतकऱ्याचा प्रयोग दुसरीकडं यशस्वी होऊ शकतोच असं नाही. हे माहीत असतानाही शेतकरी कोणाचं तरी अंधानुकरण करतात, तेव्हा ते त्यांच्या डोक्याचा वापर करीत नाहीत. इतरांचं सोडा माझ्यासारखा विचारी माणूस असे प्रयोग करून फसतो. अनेकदा आर्थिक फायद्यापेक्षा त्यात भावनिकताही असते. गेल्या दोन वर्षांत मी अशा दोन प्रयोगांत फसलो. शेतीबद्दल नकारात्मक मत तयार होऊ नये म्हणून मी आजवर त्यावर लिहिणं टाळलं होतं. पण आता ते सांगूनच टाकतो.
मत्स्यपालनाची अपयशकथा
पहिला प्रयोग शेततळं पूर्ण होऊन त्यात पाणी भरल्यानंतरचा आहे. तळ्यातील निळ्याशार पाण्याचे फोटो फेसबुकवर टाकले तेव्हा ‘सर, मत्स्यपालन करा’ अशा अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यात हे करणं फायदेशीर आहे, असं सांगणाऱ्याचं प्रमाण मोठं होतं. खरं तर मत्स्यपालन फायदेशीर नसल्याची दोन-तीन उदाहरणं मी प्रत्यक्ष बघितली होती. पण तरीही हे करावं, अशी इच्छा कुठंतरी मनात तयार झाली होती. यू-ट्यूबवरील काही व्हिडिओ बघून ही इच्छा प्रबळ झाली. शेतीतला सहकारी नरेश शिंदे याला बोललो. तो अनुकूल होता.
यातून चांगले पैसे मिळू शकतात, असं त्याचं मत होतं. मी विचार केला की, फायदा नाही तर नाही; किमान आपल्याला भरपूर मासे खायला मिळतील. निर्णय झाला की अंमलबजावणी मी वेगात करतो. तळ्याभोवती कुंपण तयार होतंच. अहिल्यानगरहून मत्स्य बीज, तळ्यात मध्ये पक्षी जाऊ नयेत म्हणून शंभर बाय शंभरची जाळी आणि खाद्य कारने घेऊन आलो. त्याचं बिल तेवीस-चोवीस हजार रुपये झालं असावं. मासे तळ्यात सोडण्याचे फोटो, व्हिडिओ केले. दररोज माशांना खाद्य टाकताना, त्या पिलांना बघणं हा दिनक्रम बनला. महिनाभरात मासे थोडे मोठे झाले. खाद्य टाकले, की सगळे मासे एकत्र येऊन मस्ती करायचे. ते बघून खूष व्हायचो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचो.
मध्येच अचानक शेततळ्यात बेडकांची संख्या अफाट वाढली. जाळ्या असतानाही, ही बेडकं आत कुठून आली, ते कळलं नाही. आठ महिन्यांपर्यंत हे असंच चालू होतं. दरमहा अहिल्यानगरवरून माशाचं खाद्य आणून टाकणं सुरू होतं. सोबत गिरणीचं पीठ, शेण टाकणंही सुरू होतं. पण माशांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. तेरा हजार बीज सोडलं होतं. पण शंभर-दीडशेच मासे दिसत होते. खाद्य खाताना त्यांना बघणं हा आमचा आनंददायी कार्यक्रम सुरू होता.
दहाव्या महिन्यात गावातील मासे पकडणाऱ्या इसमाला बोलावलं. तो ट्यूब आणि जाळे घेऊन पाण्यात उतरला. पाच तासांत दोन वेळा जाळे बदलून त्याला फक्त दोन-तीन किलो मासे सापडले. तो बोलला, की तळ्यात मासेच नाहीत. माझा दिवसाचा रोजगार बुडाला म्हणून तो कुरकूर करू लागला. त्यामुळे त्याला निम्मे मासे मागण्याची हिंमत झाली नाही. इथले १३ हजार मासे कुठं गेले? अचानकपणे तळ्यात आलेल्या बेडकांनी ती माशांची पिलं खाऊन टाकली, असा निष्कर्ष आम्ही चर्चेअंती काढला. मत्स्यपालनाच्या डायरीवरील खर्चाच्या नोंदीची बेरीज केली तेव्हा ती ६० हजार रुपये भरली. एवढे पैसे जाऊनही आमच्या तळ्यातील एकही मासा आम्हाला खायला मिळाला नाही. पण तळ्यातील मासे जवळून पाहायला मिळणं, हे ६० हजार रुपयांपेक्षा अधिक मोलाचं असल्याचं मानून मी याचं दु:ख केलं नाही.
मिरचीचा ठसका
हिरवी मिरची लावून पन्नास-साठ हजार रुपये कमावण्याचा दुसरा प्रयोग नरेश शिंदे याच्या आग्रहाखातर करण्यात आला. माझी याला मान्यता नव्हती; पण मी विरोधही केला नाही. त्याचा एक नातेवाईक मिरची लागवडीतून भरपूर पैसे कमावत होता. त्याचं मार्गदर्शन त्याला मिळणार होतं. आमच्या शेतात मल्चिंग पेपर वापरून पहिल्यांदा मिरची लावली. नरेश आणि गजानन यांनी न कंटाळता भरपूर मेहनत घेतली. काहीही करून यश मिळवायचे अशा जिद्दीने फवारण्या केल्या. दोन-तीन सल्लागार बदलले. औषध दुकानदार बदलले. पण मिरचीवरचा बोकडा काही गेला नाही. सात-आठ हजाराची मिरची विकली. पण निव्वळ खर्च झाला ६०-६५ हजार. यात दोघांची मजुरी धरलेली नाही.
मी निष्कर्ष असाच काढला, की शंभरातील पाच-सहा जणच शेततळ्यातील मत्स्यपालनात पैसे कमावू शकतात. सगळ्यांना हे शक्यच नाही. मिरचीमध्येच नाही, तर कुठल्याही पिकाबाबत दुसऱ्याचे अनुकरण केले, तरी पहिल्याचा अनुभव दुसऱ्याला येईल याची शेतीत खात्री देता येत नाही. तेव्हाच मी ठरवलं, की जास्तीत जास्त दहा हजार रुपयांचं नुकसान होईल, एवढाच प्रयोग करायचा; त्यापेक्षा जास्त खर्चाचा अजिबात नाही.
शेतीत जादा पैसे मिळत नाहीत, याची खात्री असताना, असं इतरांचे अनुकरण करून मनःस्वास्थ्य बिघडू द्यायचं नाही. मातीशी नाळ जोडून घेतलेली आपली निसर्गपूरक आनंददायी शेती करायची. यात आनंदच आनंद आहे.
९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९,
(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.