
प्रियंका मोरे, डॉ. योगेश सैंदाणे, डॉ. उत्तम कदम
Sterility Mosaic Virus: महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून, त्याखाली क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. भारतातील प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये कर्नाटकनंतर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात एकूण ११.११ लक्ष हेक्टरवर तुरीची लागवड होती व त्यातून ८.९२ लाख टन एवढे तुरीचे उत्पादन मिळाले.
तरीही राज्यामध्ये तुरीची उत्पादकता ही ८०३ किलो प्रति हेक्टर इतकी कमी आहे. तुरीची उत्पादकता कमी राहण्यामागे या पिकावर येणारे कीड व रोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. विशेषतः मागील वर्षी तूर पिकावर ‘वांझ’ या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला. हा रोग ‘पीजन पी स्टरिलिटी मोझॅक व्हायरस’ या विषाणूमुळे होतो.
या विषाणूंचा प्रसार एरिओफाइड माइट (Eriophyid mite) या अतिसूक्ष्म कोळी प्रादुर्भावामुळे होतो. या रोगामुळे तुरीच्या झाडांच्या फुलोरा आणि शेंगांची वाढ पूर्णपणे खुंटते, परिणामी झाडे वांझ राहतात. या रोगामुळे ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच या रोगाचे व त्यासाठी एरिओफाईड कोळी या किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
कोळीची ओळख
एरिओफाइड कोळी (Eriophyid Mite) ही तुरीवरील एक अत्यंत सूक्ष्म, पण अत्यंत हानिकारक कीड आहे. हे कोळी आकाराने फारच लहान (लांबी सुमारे ०.२ मि.मी.) असून, ती उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. पिकांच्या निरीक्षणासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. कोळीचे शरीर पांढरट ते फिकट पिवळसर रंगाचे, नळीसारखे लांबट असते.
इतर अष्टपाद कोळ्यांप्रमाणे चार पायांच्या जोड्या नसून, यांना फक्त पायांच्या दोन जोड्या असतात. हे कोळी तुरीच्या पानांच्या खालच्या बाजूस वास्तव्य करतात. पानांतील रस शोषून त्यावर उपजीविका करतात. यामुळे झाडांमध्ये पोषणद्रव्यांची कमतरता भासते आणि वाढ खुंटते.
कोळीचा जीवनक्रम
एरिओफाइड कोळीचा जीवनक्रम अंडी अवस्था – पिल्लावस्था – प्रौढ अवस्था या तीन प्रमुख अवस्थांमध्ये पूर्ण होतो.
अंडी अवस्था : प्रौढ मादी दरवेळी एकच याप्रमाणे कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूस, नवीन फांद्यांवर, अंकुर किंवा फुलांजवळ अंडी देतात. अंड्यांचा रंग सुरुवातीला पारदर्शक / पांढरट तर नंतर फिकट पिवळसर होतो. अंडे १ ते २ दिवसांत उबतात. (२० ते ३० अंश सेल्सिअस). एक मादी आयुष्यामध्ये सुमारे १५ ते २५ अंडी घालते.
पिले अवस्था : अंड्यातून बाहेर पडलेली पिले अत्यंत लहान व पारदर्शक असतात. पिल्ले अवस्था प्रोटोनिंफ व ड्युटोनिंफ या दोन दोन उप-अवस्थांमध्ये विभागली जाते. या दोन्ही अवस्थांमध्ये कोळी कोवळ्या भागांचा रस शोषून नुकसान करतात. या अवस्थांतील शरीराचा रंग पांढरट ते फिकट पिवळसर आणि शरीर लांबट असते. प्रत्येक उप-अवस्था सुमारे २ ते ३ दिवसांची असते.संपूर्ण पिल्लाअवस्था ४ ते ५ दिवसांमध्ये पूर्ण होते.
प्रौढ अवस्था : प्रौढ कोळीचे शरीर नळीसारखे, अत्यंत लहान व पिवळसर रंगाचे असते. शरीराची लांबी ०.१५ ते ०.२० मि.मी. पर्यंत असते. भिंग किंवा सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने पूर्ण वाढलेला कोळीही फक्त दोन पायांच्या जोड्यांसह दिसतो. या कोळीचा जीवनक्रम सुमारे दोन आठवड्यांत पूर्ण होतो.
प्रसार
कोळी पानातील रस शोषतात. त्यांनी रोगग्रस्त झाडांतील रस शोषल्यानंतर त्यांच्या सोंडेमध्ये हरित लवक व रस काही प्रमाणात राहतो. त्या शोषलेल्या रसामध्ये वांझ रोगाचे विषाणू राहू असतात. त्यानंतर तेच वांझ रोगाचे विषाणू निरोगी झाडातील रस शोषताना त्या पानांमध्ये शिरकाव करतात. अशा प्रकारे वांझ रोगाचा प्रसार होतो. तुरीच्या एका झाडावर जर पाच कोळी असतील, तर झाडांच्या १०० टक्के भागावर वांझ रोगाचा प्रसार होतो. हे अतिसूक्ष्म कोळी वाऱ्याच्या साह्याने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वेगाने जाऊ लागतात. त्यामुळे त्यांच्या मार्फत वांझ रोगाचे विषाणू वाऱ्याच्या दिशेने ५०० मीटर अंतरापर्यंत वाहून जाऊ शकतात.
पोषक वातावरण
कमाल २५ ते ३० अंश आणि किमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता या विषाणूजन्य रोगासाठी पोषक असते.
रोगाची लक्षणे
झाडांची उंची खुंटते. पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो. पाने आक्रसतात. रोपावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात. पाने आकाराने लहान राहून आकसतापोषक वातावरण
कमाल २५ ते ३० अंश आणि किमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता या विषाणूजन्य रोगासाठी पोषक असते.
रोगाची लक्षणे
झाडांची उंची खुंटते. पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो. पाने आक्रसतात. रोपावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर प्रथम तेलकट पिवळे डाग पडतात. पाने आकाराने लहान राहून आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरांतील अंतरदेखील कमी राहते. त्यांना अनेक फुटवे फुटतात. झाडांची वाढ खुंटते. शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
व्यवस्थापन
रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी.
शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची हाडे काढून टाकावीत.
तूर पिकाचा खोडवा घेऊ नये.रोगग्रस्त झाडे दिसताच त्वरित उपटून जाळून नष्ट करावीत.
रासायनिक नियंत्रण
प्रादुर्भाव दिसून येताच त्वरित फवारणी फवारणी प्रती लिटर पाणी
डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा
फेनाक्झाक्वीन (१० ईसी) १ मि.लि किंवा
पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम.
(टीप- तुरीवरील कोळी किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचे लेबल क्लेम नसले तरी ॲग्रेस्को शिफारशीत त्यांना मंजुरी मिळाली आहे.)
प्रियंका मोरे (पीएचडी स्कॉलर) ८५५२८९८५३५
- डॉ. योगेश सैंदाणे (सहायक प्राध्यापक) ९८५०२९५३०८
डॉ. उत्तम कदम (विभाग प्रमुख) ७५८८६०४२४६
कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.