
Interaction on Indian Spices: भारतीय मसाल्यांना जगभरातून मागणी आहे. स्वाद आणि रंगासोबतच इतर आयुर्वेदिक गुणधर्म, वैशिष्ट्ये जपल्याचा हा परिणाम आहे. भारतातून दरवर्षी सुमारे १८ लाख टनांपेक्षा अधिक मसालावर्गीय पिकांची निर्यात होते. त्यामुळेच येत्या काळात मसाल्याचा दर्जा राखण्यासोबतच सेंद्रिय पद्धतीने उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याबाबत कोझिकोडे (केरळ) येथील सुपारी व मसाला पिके विकास संचालनालयाचे संचालक डॉ. होमी चेरियन यांच्यासोबत साधलेला संवाद.
सुपारी व मसाला पिके संचालनालयाबद्दल काय सांगाल?
केरळमधील कोझिकोडे (कालिकत) येथे १९६६ मध्ये सुपारी व मसाला पीक संचालनालयाची स्थापना झाली. देशभरातील ४८ कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांतही मसाला पिकांच्या संशोधन कार्याचा समन्वय साधण्याचे काम संचालनालयाच्या वतीने केले जाते. वेलचीच्या (Cardamom) नवीन संशोधित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांच्या लागवडीतही संस्थेने प्रक्षेत्रावरील चाचण्यांवर भर दिला आहे. याकामी मिशन ऑफ इंटिग्रेटेड हार्टिकल्चर या केंद्र पुरस्कृत योजनेतून निधी उपलब्ध होतो. त्यासोबतच एमआयडीएच अंतर्गत १२५ प्रकल्प किंवा योजनांची अंमलबजावणी होते. यातील १६ योजना या मसालावर्गीय पिकांशी संबंधित असून याच योजना अत्यंत यशस्वी ठरल्या आहेत. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध मसालावर्गीय पिकांसाठी संस्था काम करते.
निर्यातीची स्थिती काय?
निर्यातीचा विचार करता शेती पिकांच्या क्रमवारीत मसालावर्गीय पिके ही चौथ्या क्रमांकावर आहेत. दरवर्षी १७ ते १८ लाख टन मसाला पिकांची निर्यात होते. याचे मूल्यांकन ४.७ बिलियन यूएस डॉलर्स (४१० अब्ज, ५३ दशलक्ष रुपये) इतकी रक्कम होते. मिरची, जिरे, पुदीना, करी पावडर (कढीपत्ता), वेलची, काळी मिरी यांचा निर्यातीमध्ये प्रामुख्याने समावेश होतो. स्पाइस बोर्डाची प्रयोगशाळा गुंटूर (आंध्र प्रदेश) मध्ये आहे. या प्रयोगशाळेत शेतीमालाचे पृथक्करण करून नंतर त्या अहवालाच्या आधारेच निर्यात होते. मिरचीमध्ये अफ्लाटॉक्सीन बुरशी (पोट खराब करण्यास कारणीभूत बुरशीजन्य विष), रेसिड्यू यांची समस्या मोठी आहे. मिरचीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या मोठ्या प्रमाणावर होतात. परिणामी रेसिड्यू आढळतो. या आव्हानाला सामोरे जात निर्यात होत आहे.
मिरचीमधील बुरशीचे आव्हान का आहे?
मिरची तोडणीनंतर बाजारात पाठविण्यापूर्वी वाळत घातली जाते. वाळत घातलेल्या ठिकाणी ओलावा असल्यास त्या ठिकाणी बुरशी तयार होते. त्याला अफ्लटॉक्सीन म्हटले जाते. त्यातून किडनी, लिव्हरचे आजार होण्याचाही धोका राहतो. त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक राहते. शेंगदाण्यातही हा प्रकार आढळतो. निर्यातक्षम उत्पादनात हा घटक आढळल्यास अडचणी निर्माण होतात.
आपण हळद पिकवत असूनही आयात का होते?
देशातील प्रमुख मसाला पीक असलेल्या हळद उत्पादनात भारताची मोठी आघाडी आहे. आयुर्वेदीय गुणधर्मामुळे भारतीय हळदीला मागणी देखील आहे. परंतु कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या वाणांची मागणी उद्योगांकडून राहते. त्याकरिता व्हिएतनाम व इतर देशांतून हळदीची आयात केली जाते. भारतात देखील कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेले हळदीचे वाण आहेत. त्यामध्ये प्रगती, रोमा, वायगाव यांचा समावेश होतो. प्रत्येकी २५ हेक्टर याप्रमाणे या वाणांच्या लागवडीला संचालनालयाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. या वाणातील कुरकुमीनचे प्रमाण पाच ते सहा टक्के आहे. या भारतीय वाणांना देखील उद्योगाकडून मागणी असली तरी लागवड क्षेत्र कमी असल्याचे संचालनालयाचे निरीक्षण आहे. मसालावर्गीय पिकांच्या लागवडीसाठी म्हणून विशेष क्लस्टर प्रोग्रॅम पण राबविला जातो.
रेसिड्यू फ्री मसाला पिकांसाठी काय संशोधन सुरू आहे ?
रोजच्या भाज्यांमध्ये जिऱ्याचा वापर होतो. सध्या जिरे उत्पादनात कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातून जिऱ्यात कीटकनाशकाचे रेसिड्यू सातत्याने आढळतात. नजीकच्या काळात आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. त्यातूनच जैविक किंवा रेसिड्यू फ्री शेतमालाला अनेक देशांतून मागणी होत आहे. त्याचीच दखल घेत रासायनिक घटक विरहित जिरे उत्पादनाचा प्रयोग हाती घेतला आहे. अजमेर (राजस्थान) येथील एनआरसीसी त्यावर काम करत आहे. चाचण्यांमधून सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
मिरची पिकात इतर संशोधन कोणते?
मिरची उत्पादकपट्ट्यात विषाणूचा (व्हायरस) प्रादुर्भाव होतो. त्याच्या निवारणाकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणावर फवारणी करतात. यामुळे पिकात कीटकनाशकाचे अंश राहत असल्याने मिरचीचे व्हायरस प्रतिकारक वाण विकसित करण्यात आले आहे. हे वाण बंगळूरच्या भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेने विकसित केले आहे. रायचूर (कर्नाटक) विद्यापीठासह मध्य प्रदेशातही या वाणाच्या चाचण्या होत आहेत. मिरची पीक उत्पादनाच्या क्षेत्रात ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.
मिरचीचा रंग का हरवत आहे?
परपरागीकरणामुळे (क्रॉस पॉलिनेशन) मिरचीचा मूळ रंग हरवत असल्याचे निरीक्षण आहे. ही समस्या नजीकच्या काळात अधिक गंभीर झाली आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत संचालनालयाच्या वतीने बीज शुद्धीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मिरचीचा रंग हिरवा असतो परंतु
यात होणाऱ्या आनुवंशिक बदलामुळे ती मूळ रंग हरवत असल्याचे संशोधनात्मक पातळीवर सिद्ध झाले आहे.
त्यातच गर्द हिरव्या रंगाची मिरची बाजारात उपलब्ध आहे. कोरियन टाइप ही मिरची असून त्यामुळे पर परागीकरण झाले की भारतीय हिरव्या मिरचीचा रंग बदलतो. धारवाड (कर्नाटक) विद्यापीठाच्या माध्यमातून मिरचीचा रंग जपण्यावर संशोधन सुरू आहे. त्यात बऱ्याच अंशी यश देखील मिळालं आहे.
विदर्भातील भिवापूरी मिरचीविषयी काय सांगाल?
देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण मिरची वाणांमध्ये भिवापुरी मिरचीचा देखील समावेश होतो. पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या भिवापूर तालुक्याच्या परिसरात या मिरचीचे उत्पादन होते. ही थोडीशी बुटकी मिरची असून तिला भौगोलिक नामांकन देखील प्राप्त आहे. परपरागीकरणामुळे ही मिरची देखील अस्तित्व हरवत आहे. त्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून भिवापुरी मिरचीचा बीज शुद्धीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. यातून सेल्फींग प्रक्रियेअंती ८० टक्के शुद्ध बीज मिळाले. त्यापासून रोपे तयार करून २५ मोठ्या शेतकऱ्यांना ती दिली जाणार आहेत. मिरचीची ऑगस्टमध्ये लागवड केली जाते, त्यानुसार रोपे उपलब्ध केली जातील.
मिरची पिकात फवारण्यांमध्ये वाढ का दिसतेय?
विदेशातून आयात केलेले काही मिरची वाण कीड-रोगाला बळी पडणारे आहेत. त्यातूनच भारतीय मिरची वाणावरही प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी मिरचीवर मोठ्या प्रमाणावर फवारण्या घेतल्या जात आहेत. त्याचीच दखल घेत संचालनालयाच्या वतीने सेंद्रिय मिरची उत्पादनाचा प्रकल्प पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष उत्साह वाढविणारे आहेत. त्यातून काही तरी हाताला लागेल अशी अपेक्षा आहे.
वेलची संशोधनात नवीन काय सुरू आहे?
पुलाव, बिर्याणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या वेलची पिकाचे क्षेत्र कीड-रोगामुळे बाधित होत आहे. कीड-रोगग्रस्त रोपांचा पुरवठा हीच यातली मुख्य समस्या आहे. त्याकरिता अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालॅंडमध्ये मदर प्लॅट (मातृवृक्ष) लावावे, असे आवाहन केले जात आहे. मातृवृक्ष असल्यास त्यापासून निरोगी रोपे मिळविणे शक्य होणार आहे. सिक्कीममध्ये मूळ असलेल्या मोठ्या वेलचीची लागवड आता उत्तराखंडमध्ये होत आहे.
मसाला पिकांच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न होत आहेत?
दालचिनी पीक धोक्यात आले आहे. याचे नारळात आंतरपीक घेऊन संवर्धनाचा प्रयत्न आहे. या पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. दुष्काळी परिस्थितीला देखील ते प्रतिकारक आहे. पण याच्या काढणीकामी मजूर जास्त लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. म्हणून या पिकाच्या काढणीसाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय देण्याचा विचार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि खासगी भागीदारांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात दालचिनीचे उत्पादन होते. पश्चिम किनारपट्टीचे वातावरण यासाठी पोषक असून श्रीलंकेत याचे सर्वाधिक उत्पादन होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.