Women's Day: Agrowon
संपादकीय

International Women's Day: तिच्या पंखात बळ भरूया

Women Empowerment: आता केवळ महिला सक्षमीकरणावर बोलून चालणार नाही, त्या मुळातच सक्षम आहेत. अशा सक्षम महिलांना उंच भरारी घेऊ देण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरूया.

विजय सुकळकर

Womens Rights: आज जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी विविध कार्यक्रम, व्याख्यानांच्या माध्यमांतून महिलांचा गौरव केला जातो. तिच्या हक्क, अधिकाराबरोबर सक्षमीकरणाबाबत पोटतिडकीने बोलले जाते. अगदी अनादी काळापासून विविध क्षेत्रांत महिला आपली कर्तबगारी सिद्ध करीत आल्या आहेत, आजही करीत आहेत. परंतु आपण मात्र केवळ एक दिवस त्यांचा उदो उदो करतो आणि त्यानंतर महिलांच्या कर्तबगारीचा सगळ्यांनाच विसर पडतो.

संपूर्ण जग मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून, तर आपल्या देशात ८० वर्षांहून अधिक काळापासून महिला दिन साजरा केला जातो. परंतु आजही महिलांचे हक्क, अधिकार तसेच त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य, समानता आपण देऊ शकलो नाही. त्यामुळे आज सर्वांत वंचित घटक कोणता असेल तर त्या महिला आहेत. अलीकडच्या काळात तर महिलांवरील अन्याय-अत्याचार वाढतच चालले आहेत. अशावेळी केवळ एका दिवसासाठी आमचा उदो उदो कशासाठी, असा सर्वांनाच अंतर्मुख करणारा प्रश्‍न समस्त महिलांकडून विचारला जात आहे. आणि त्याचे काहीएक उत्तर आपल्याकडे नाही.

शेती, नोकरी, उद्योग-व्यवसाय अशा कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत. शेती या व्यवसायाची तर सुरुवातच महिलांनी केली आहे. कुटुंब, घरकाम सांभाळून अनेक महिला सक्षमपणे शेतीही सांभाळत आहेत. दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन, रेशीम शेती अशा पूरक व्यवसायातही महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे. आता तर ग्रामीण भागात बचत गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ उभी राहत असून, याद्वारे महिला प्रक्रिया उद्योगात उतरत आहेत.

प्रक्रियायुक्त पदार्थांची बाजारात जाऊन कल्पकतेने विक्री करीत आहेत. असे असताना किती महिलांच्या नावे शेतीचा सातबारा आहे आणि निर्णय प्रक्रियेत किती महिलांना स्वातंत्र्य आहे, असे प्रश्‍न पडतात. भारतात केवळ १० ते १२ टक्के महिलांची नोंद सातबारावर आहे, तर महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग खूपच कमी आहे. पुरुषांच्या बरोबरीने समान काम करूनही महिलांना ३० टक्के मजुरी कमी दिली जाते. जुन्या चालीरीती, परंपरा महिलांवर लादून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरही गदा आणली जाते.

शेतीमध्ये महिलांना केवळ वेळेवर निविष्ठा उपलब्ध करून दिल्या, तर उत्पादकतेत २० ते ३० टक्के वाढ होते, असा अन्न व कृषी संस्थेचा एक अहवाल सांगतो. अशावेळी शेतीत समान हक्क, समान मजुरी आणि निर्णयस्वातंत्र्य दिले, तर उत्पादकतेत अनेक पटीने वाढ होईल, यात शंकाच नाही. त्यामुळे आता केवळ महिला सक्षमीकरणावर बोलून चालणार नाही, त्या मुळातच सक्षम आहेत. अशा सक्षम महिलांना उंच भरारी घेऊ देण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरूया.

महिलांना त्यांचे हक्क, अधिकार, समानता, स्वातंत्र्य बहाल करूया. हे करीत असताना महिलांवरील वाढते अत्याचार कमी करण्यासाठी महिलांबाबत पुरुषांच्या मनामध्ये रुजलेल्या धारणा बदलाव्या लागतील. व्यापक समाजप्रबोधनाबरोबर चांगल्या गुणवत्तेच्या सामाजिक पायाभूत सेवांचे जाळे निर्माण करून महिलांची सर्व प्रकारची काळजी घेता येईल. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेत बदलाबरोबर कायद्याचा धाकही हवा. महिलांवर अन्‍याय, अत्याचार करण्यासाठी कोणी धजावणार नाही, अशा प्रकारे कायद्यांची आखणी, अंमलबजावणी करावी लागेल. असे झाले तरच महिलांना सामाजिक सुरक्षा लाभेल. एवढे काम करण्याचा निर्धार आजच्या जागतिक महिलादिनी करूया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT