Solar Production Agrowon
संपादकीय

Agriculture Solar Power Generation : शिळ्या कढीला ऊत

विजय सुकळकर

Agricultural Electricity Availability : महाराष्ट्र राज्यात शेतीला दिवसा वीज पुरवायचे कवित्व मागील दशकभरापासून सुरू आहे. सत्तेत आलेली सर्वच सरकारे, मग ती कोणत्याही पक्षाची असो, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे आश्वासन जरूर देतात. परंतु त्याबाबतचे योग्य नियोजनच नसल्यामुळे दिलेले आश्वासन पूर्ण होत नाही.

दोन दिवसांपूर्वी सुमारे नऊ हजार मेगावॉट सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी विकासकामांना देकारपत्र (लेटर ऑफ ॲवॉर्ड) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हस्ते प्रदान करण्यात आली आहेत. अर्थात, यात गुंतवणूक होऊन त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी देकारपत्र देण्याच्या कार्यक्रम दिवसाला ते ऐतिहासिक दिवस मानत आहेत.

हा खरे तर शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार म्हणावा लागेल. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ सुरू केली होती. सर्वांत आधी ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राळेगणसिद्धी येथे राबविण्यात आली. तिला यश मिळून तीन वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून आपण करतोय काय, हा खरा प्रश्न आहे.

राज्यात कृषी विजेचे एकूण ग्राहक ४५ लाख आहेत. त्यांपैकी निम्म्या म्हणजे २२.५ लाख ग्राहकांना दिवसा तर तेवढ्याच ग्राहकांना आता रात्री वीज मिळते. अर्थात, रात्री वीज मिळणाऱ्या २२.५ लाख ग्राहकांना आपल्याला दिवसा वीजपुरवठ्यावर आणावे लागणार आहेत. त्याकरिता जवळपास १८ ते २० हजार मेगावॉट वीज निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट ठेवायला हवे, असे यातील जाणकार सांगतात.

असे असताना आताही केवळ नऊ हजार मेगावॉटचेच (निम्मे) उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात, यात गुंतवणूक होऊन हा प्रकल्प मार्गी लागला तरी अजून १० ते ११ लाख ग्राहकांना वीजपुरवठा होईल. अशावेळी उर्वरित ११ लाख ग्राहकांचे काय, असा प्रश्नही उपस्थित होतो. सौर वाहिनीद्वारे मागील तीन वर्षांत केवळ दीड हजार मेगावॉट वीज निर्मिती सुरू झाली असून, त्याद्वारे फक्त ५० हजार ग्राहकांना वीज जोडणी मिळाली आहे. ही गती खूपच धीमी आहे, असे म्हणावे लागेल. हीच गती कायम राहिली तर कृषीच्या सर्व ग्राहकांना दिवसा वीज मिळण्यासाठी किती कालावधी लागेल, याचा अंदाज आपल्याला यायला हवा.

खरे तर सौरऊर्जेद्वारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे सहज शक्य आहे. यामध्ये मुख्य गुंतवणूक ही जागेचीच आहे. आत्ताही प्रकल्पासाठी जागा मिळाली असल्याचे सांगितले जात असले, तरी नऊ ते १० हजार मेगावॉटचे उद्दिष्ट ठेवले म्हणजे तेवढीच जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित १० हजार मेगावॉट क्षमता निर्मितीला कधी जागा मिळणार, ते प्रकल्प पूर्ण कधी होणार या प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत.

यावरून हेच स्पष्ट होते, की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीजपुरवठा करणार असल्याचा दावा हा पूर्णपणे फसवा आहे. वन्यप्राण्यांचे भय आता सर्वत्रच आहे. शिवाय रात्री पिकाला पाणी देण्यात इतरही अनेक तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे शेतीला दिवसा विजेची मागणी राज्यभरातूनच होते आहे.

शेतीला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सिंचनासाठी विजेची मागणी अधिक असते. या वेळी सौरऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते. त्यामुळे सौरऊर्जा हा दिवसा विजेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. गरज आहे ती या दिशेने योग्य पावले उचलण्याची! सौरऊर्जा निर्मितीत उद्दिष्ट ठेवून काम केले आणि ते उद्दिष्ट ठरावीक वेळेत पूर्ण केले, तर सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकते.

औष्णिक विजेच्या मर्यादा लक्षात घेता देशपातळीवर अक्षय ऊर्जेला महत्त्व देण्याबाबत सर्वत्र बोलले जातेय. परंतु त्यात भरीव असे काम कुठेही होताना दिसत नाही. आपल्या देशाचा विचार करता पावसाळ्यातील काही ढगाळ वातावरणाचे दिवस सोडले तर आपल्याला वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध होतो. या सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रुपांतर करण्याची चांगली संधी आपल्याला लाभलेली आहे, तिचे सोने करण्यास आता वेळ दवडू नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT