Sericulture  Agrowon
संपादकीय

Sericulture Farming : रेशीम अभियान नव्हे; ही तर विचारांची पेरणी

विजय सुकळकर

Ideas of Sericulture Farming : महाराष्ट्र राज्यात या वर्षीच्या महारेशीम अभियानाला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. महारेशीम अभियान ही तुती लागवडीपासून ते कीटक संगोपनापर्यंतच्या प्रसार-प्रचाराची मोहीम आहे. रेशीम शेती ही तंत्रशुद्ध पद्धतीने केली तरच त्यात यश मिळते.

या अभियानात हेच तर शेतकऱ्यांना शिकविले जाते, सांगितले जाते. अभियानाचा कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर हाही खूपच विचारपूर्वक ठरविण्यात आला आहे. तुतीची लागवड जून-जुलैमध्ये करायची असेल, तर रोपं फेब्रुवारीमध्येच तयार करावी लागतात. त्यामुळे या अभियानात लाभार्थ्यांची निवड ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केली, तर फेब्रुवारीत रोपं तयार होऊन जून-जुलैमध्ये लागवड करता येते.

शेतकऱ्यांना शेतात तुतीचे चांगले पीक पाहायला मिळते. हेच अभियान उन्हाळ्यात राबवायचे ठरविले तर दुष्काळी पट्ट्यात शेतात. काहीही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारच्या नियोजनातून राज्यात तुतीचे क्षेत्र वाढले, लावलेली रोपे वाचून रेशीम शेती बहरत आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढत आहे. खरे तर मराठवाड्यात २००४ पासून नोंदणी अभियान सुरू होते. त्याचेच पुढे (२०१६ मध्ये) राज्यस्तरावर महारेशीम अभियान करण्यात आले आहे.

रेशीम विभाग मुळातच छोटा, त्यात मनुष्यबळाची कमतरता असल्याने शासनाच्या गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांची मदत या अभियानासाठी घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर गावस्तरावरील कर्मचाऱ्यापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांचा या अभियानात गरजेनुसार सक्रिय सहभाग कसा राहील, याची काळजी घेतली गेली आहे.

असे शेती-शेतकरी यांच्याशी संबंधित सर्व एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांचा अभियानाबाबत विश्‍वास वाढला आहे. त्यामुळे अभियानांतर्गत काळात तुती लागवडीसाठीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळतोय.

महारेशीम अभियानांतर्गत दरवर्षी सुमारे २० हजार शेतकऱ्यांपर्यंत नोंदणीचा कार्यक्रम होतो. ही नोंदणी फुकट नसून प्रति शेतकरी ५०० रुपये भरून होते. त्यामुळे जवळपास एक कोटी रुपये महसूल जमा होतो. या अभियानाचा शासनाचा उद्देश महसूल गोळा करणे हा नसून योग्य लाभार्थ्यांची निवड करणे हा आहे.

महारेशीम अभियानांतर्गत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधी या विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर रेशीम शेतीसाठी नवनव्या गावांची निवड केली जाते. विविध विभागांनी एकत्र येऊन अभियान कसे राबवायचे ते ठरविले जाते. गावोगाव घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची व्यवस्थित स्क्रिप्टच तयार केली जाते. आणि त्याच ठरावीक अजेंड्यावर कार्यक्रम चालत असल्याने तो भरकटत नाही.

अर्ध्या तासात कार्यक्रम उरकतो. त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी होते, यादी तयार केली जाते. पैसेही लगेच जमा होतात. पैसे जमा केल्यामुळे शेतकऱ्यांनाही या अभियानात आपला सहभाग असल्याची जाणीव होते, त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील कार्यक्रमांना येतो. हे सर्व सहा महिने चालते.

अर्थात, या कालावधीत ज्यांना रेशीम शेती जीव ओतून करायची नाही, ते गळून जातात आणि मग उरतात खरे लाभार्थी! या अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्याच्या एक दिवस आधी गावात दवंडी दिली जाते.

अधिकारी-कर्मचारी-पदाधिकारी यांनी सकाळी लवकर गावात जाऊन तुती लागवडीपासून ते कीटक संगोपनापर्यंत थेट प्रात्यक्षिके दाखविली जातात. तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे जुने शेतकरी अभियानात आपले अनुभव कथन करतात. अशी या अभियानाच्या कार्यप्रणाली असल्यामुळे ते शेतकऱ्यांना समजायला सोपे जाते.

अर्थात, रेशीम शेतीचे विचार आधी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात पेरले जातात. कर्मचारी ते विचार शेतकऱ्यांच्या डोक्यात पेरण्याचे काम करतात. त्यातूनच पुढे बहरते रेशीम शेती! खरे तर ही महारेशीम अभियानाची ‘थीम’ आहे.

शेतकऱ्यांनी सुद्धा गटशेतीच्या माध्यमातून महारेशीम अभियान राबवायला हवे. रेशीम शेतीमध्ये गटशेतीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पुढे त्यांचापण लाभ उत्पादक एकत्र आल्याने त्यांना मिळू शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT