Gulam Nabi Azad
Gulam Nabi Azad Agrowon
संपादकीय

‘आझाद’ आता ‘गुलाम’ होऊ नयेत!

विकास झाडे

जी-२३ चे (G-23) प्रमुख समजले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी शेवटी पक्षाला रामराम ठोकला. (Azad Resign Form Congress) ते पक्ष सोडणार होतेच. फक्त त्यासाठी वातावरण निर्मिती करायला त्यांना दोन वर्षे लागली एवढेच. ऑगस्ट २०२० मध्ये काँग्रेसमधील बंडखोर गटाची निर्मिती करण्यात आझाद आघाडीवर होते. या गटाने खदखद मांडताना लेटरबॉम्बद्वारे काँग्रेसमधील (Gulam Nabi Azad Letter Bomb) अंतर्गत कलहाचा स्फोट घडवला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावताना देशाने आझादांना पाहिले आहे.

काँग्रेसने त्यांना जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री केले. गेल्या पाच दशकात पक्षाने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. सन्मान दिला. महत्त्वाचा नेता म्हणून ओळख दिली. आझादांचा रोष असलेल्या राहुल गांधी यांच्या वयाइतका आझादांचा राजकीय प्रवास आहे. अशावेळी राहुल अपरिपक्व आहेत अशी टीका करून ते मोकळे कसे होऊ शकतात? आझाद १९७३ मध्ये काँग्रेसमध्ये आले. तेव्हा राहुल जेमतेम तीन वर्षांचे होते. राहुल यांना अंगाखांद्यावर खेळवण्याची आझादांना कदाचित संधी मिळाली असेल. गांधी घराण्याजवळच्या आझादांना राहुलच्या आजीचे आणि वडिलांचे हौतात्म्य माहिती आहे.

अशावेळी राहुल गांधी यांना राजकारणात परिपक्व करण्यासाठी आझादांचे योगदान नसावे? की सततच्या जबाबदाऱ्यांमुळे पक्षातील पुढची पिढी तयार करायला वेळच मिळाला नाही? भाजप नेते नरेंद्र मोदींच्या आव्हानाला तोंड देताना प्रचंड कष्ट उपसावे लागणार, याची जाणीव आझादांसह त्यांच्या लाभार्थी मित्रांनाही आहे. मात्र, ते कष्ट उपसावेत केवळ राहुल आणि सोनिया गांधींनी. लोकसभेत जाता येत नसल्याने किमान राज्यसभेतील प्रवेशासाठी केविलवाणा प्रयत्न करूनही अपयश आल्याने राहुल गांधी यांना लक्ष्य करीत सत्ताधाऱ्यांना ताकद देण्याचे काम काँग्रेसमधील काही नेत्यांनी केले आहे. त्यात आझादांचा वरचा क्रमांक लागतो. ‘आझाद हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे उरलीसुरली काँग्रेस संपेल’, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून हजारोंच्या संख्येने पक्षत्याग होणे अपेक्षित होते. परंतु पक्ष सोडणाऱ्यांमध्ये केवळ पाच जणांची नावे पुढे आली, तीदेखील जम्मू काश्मीरमधून. यावरून आझादांची लोकप्रियता आणि अनुयायांचे बळ दिसते.

राहुल गांधींमुळे दुरावा

राहुल गांधी यांनी २०१३ मध्ये पक्षाच्या उपाध्यक्षपदाची सुत्रे घेतली. तेव्हापासून काही ज्येष्ठ नेत्यांना दूर करण्यात आल्याचा आझाद यांचा आरोप आहे. त्यात तथ्यदेखील आहे. राहुल यांनी आपली स्वतंत्र फळी निर्माण केल्याने जुन्या नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि विकोपालाही गेला. त्यातूनच ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाबाहेर पडण्याची मालिका सुरू झाली. जी-२३ चा उगम राहुल गांधींच्या कृतीत दडला आहे. २०१४ ते २०२२ या काळात दोनवेळा लोकसभेच्या आणि ४९ विधानसभांच्या निवडणुका झाल्या.

त्यात केवळ १० विधानसभा वगळता सर्वच निवडणुकांमध्ये लाजीरवाणा पराभव झाल्याचे खापर आझादांकडून राहुल यांच्यावर फोडले जात आहे. परंतु या सर्व निवडणुकांमध्ये आझाद यांचे किती योगदान होते? त्यापैकी त्यांनी किती राज्यांची जबाबदारी स्वीकारली होती? किती सभा घेतल्या? त्याला कसा प्रतिसाद मिळाला याची गोळाबेरीज नको का व्हायला! राहुल, प्रियांका आणि सोनिया गांधी यांनी सभा घ्याव्यात; देश जिंकावा आणि यांना मनासारखे मंत्रालय द्यावे, अशी आझादांवर टीका होत आहे. मोदी सरकारचा समाचार घेण्यासाठी राहुल ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करीत आहेत.

येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही दिडशे दिवसांची यात्रा बारा राज्यातून ३५०० किलोमीटरचे अंतर कापणार आहे. कन्याकुमारीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप जम्मू-काश्मिरात होईल. या यात्रेत आझाद पूर्णवेळ उपस्थित राहिले असते तर त्यांच्या काँग्रेसवरील निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नसते. सुरू होण्याआधीच यात्रेची देशभर चर्चा सुरू झालेली आहे. त्यात विविध क्षेत्रातील लोकांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा धसका विरोधकांनीही घेतला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी परदेशात असताना आझाद यांनी राजीनामा देण्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत, या चर्चेला पेव फुटले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचेल तेव्हा या यात्रेवर टीकेची झोड उठवणारा आझादांचा एखादा स्वतंत्र पक्ष निर्माण झालेलाही असेल. दोन वर्षांपासून ज्या व्यक्तींचे अदृश्‍यपणे पाठबळ मिळत आहे त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करीत ‘राहुल गांधी काश्मीर छोडो’ची भूमिका वठविताना आझाद दिसले तर आश्चर्य वाटायला नको. ४९ वर्षांनंतर काँग्रेसपासून ‘आझाद’ झालेल्या गुलाम नबींना धर्मांमध्ये विभागणी करणाऱ्या राजकीय पक्षाची संगत लाभण्याची शक्यता बळावली आहे. असे झाल्यास खऱ्या अर्थाने ते ‘गुलाम’ होतील. राज्यसभेत आझादांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सभागृहातला अत्यंत भावनिक क्षण होता तो. आझादांना पद्मभूषण द्यावे, असे काँग्रेस सरकारला कधीच सुचले नाही. मोदींनी ते करून दाखवले.

राहुल गांधींची परीक्षा!

राहुल गांधी यांना वैतागल्याचे कारण पुढे करीत कपिल सिब्बल, कॅप्टन अमरिंदर सिंह, सुनील जाखड, ज्योतिरादित्य शिंदे, अश्वनीकुमार, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह आदी नेते काँग्रेसबाहेर पडले. नेत्यांचे बाहेर पडण्याचे मुख्य कारण राहुल आहेत की सत्तेविना अस्वस्थ होणे हेही तपासले पाहिजे. गेल्या दोन वर्षात जी-२३च्या नेत्यांनी खूपदा बैठका घेतल्या. त्यांच्याकडून मोदी नीतिचे कौतुक झाले. काँग्रेस पक्ष टिकवून ठेवायचा असेल तर राहुल गांधींना त्यांची नीति बदलावी लागणार आहे. त्यांच्याभवती गराडा असलेल्या कंपूतून बाहेर पडावे लागेल. ज्येष्ठ नेत्यांचे बाहेर पडणे कोणत्याही पक्षासाठी चांगले चित्र नसते. ‘जे थांबतील ते मावळे’ अशी राहुल गांधींची भूमिका अंगलट येऊ शकते. आज काँग्रेसचे लोकसभेत ५३, राज्यसभेत ३६, विधानसभेत ६९१, आणि विधान परिषदेत ४६ सदस्य आहेत. हा आकडा भविष्यात घसरला तर राहुल गांधी ‘नापास’ असे शिक्कामोर्तब होईल.

आझादांच्या राजीनाम्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. मुलगा सद्दाम यांना घेऊन आझाद नवा पक्ष काढण्याची शक्यता आहे. यामुळे मुस्लिम मतांची विभागणी होईल. त्याचा परिणाम राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवरही होऊ शकतो. राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॉटिक पार्टी (पीडीपी) हे पक्ष त्यांची मतपेढी गमावू शकतात. काँग्रेसलाही फटका बसेल. आझाद यांचा चिनाब खोऱ्यात प्रभाव आहे. त्यांचे दोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यात मतदार आहेत. अनपेक्षितपणे का होईना भाजपला मदत करताना आझादांना सावध राहावे लागेल. मोदी प्रेमात त्यांचा कॅप्टन अमरिंदर सिंह होऊ नये. अन्यथा ‘आझाद’ झालेले गुलाम नबी केवळ नावाने नाही तर महत्त्वाकांक्षेमुळे ‘गुलाम’ झाल्याचा ठपका त्यांच्यावर बसेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT