Private Market
Private Market Agrowon
संपादकीय

Private Market : खासगी बाजार चांगला पर्याय

Team Agrowon

पणन संचालनालयाच्या वतीने सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीला (Sahyadri Farmer Producer Company) खासगी बाजाराचा (Private Market) परवाना नुकताच देण्यात आला आहे. खासगी बाजार समितीच्या माध्यमातून फळे-भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीत उतरणारी सह्याद्री ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. प्रचलित बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट आणि पिळवणूक सर्वश्रुत आहे. अशा बाजार समित्या (Market Committee) या लोकनियुक्त संस्था आहेत. त्यात राजकीय मंडळी शिरते. ते शेतकरी हितापेक्षा स्वहित बघतात. दर पाच वर्षांनी निघून पण जातात. त्यामुळेच प्रचलित बाजार व्यवस्थेत सुधारणांच्या अनुषंगाने दीर्घकालीन नियोजन होताना दिसत नाही.

अशावेळी त्यांना पर्यायांची चर्चा अनेकदा होते. यातून सुधारणेच्या अनुषंगाने काही निर्णयही घेतले जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आपल्याकडे बाजार समितीतील सुधारणांना २००४-०५ पासून सुरुवात झाली. त्यात थेट परवाना पद्धत, शेतकरी ग्राहक बाजार, एक परवाना आणि खासगी बाजार असे विविध पर्याय आहेत. पणन सुधारणेत महाराष्ट्राची आघाडी असून निती आयोगाने सुद्धा यांत राज्याला पहिला क्रमांक दिला आहे. कृषी-पणन संदर्भातील केंद्र सरकारच्या (रद्द करावे लागलेल्या) तीन कायद्यांबाबत देशभर वादळ उठले होते. परंतु राज्याने यातील बऱ्याच सुधारणांचा स्वीकार आधीच केला होता. त्यामुळे राज्यात त्याचे फारसे पडसाद उमटले नाहीत. राज्याची भूमिका ही शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी विविध पर्याय खुले करून देणे, अशीच राहिली आहे.

आतापर्यंत बाजार समित्यांतील घटकच दुसऱ्या पर्यायांमध्ये सुद्धा उतरत असत. शेतीमाल खरेदी-विक्रीत बाजार समितीमध्ये आणि बाहेरही यांच घटकांची एकाधिकारशाही चालत आलेली आहे. पणन सुधारणेअंतर्गत शेतीमाल खरेदी-विक्रीत शेतकरी, त्यांचे गट यांना बाजारात उतरविणे, हा उद्देश ठेवण्यात आला होता. त्यात सह्याद्री या शेतकरी उत्पादक कंपनीने एक पाऊल पुढे टाकले ते बरेच झाले. राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातील काही चांगली कामे करीत असून इतर बहुतांश कंपन्यांना नेमके काय करावे, याची दिशा अजूनही मिळत नाही. काही कंपन्यांनी खते-बियाणे विक्री तसेच कांदा, धान्य खरेदीच्या पुढे सरकताना दिसत नाहीत. अशा सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ठिकठिकाणी खासगी बाजार सुरू करायला हवेत.

शेतकरी हा व्यावसायिक झाला पाहिजे, त्यांने केवळ शेतीमाल उत्पादनावर भर न देता त्याच्या मार्केटिंगवर पण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आपण सातत्याने म्हणतो. परंतु एकट्या-दुकट्या शेतकऱ्याला शेतीमालाचे उत्पादन घेणे आणि त्याची विक्री करणे हे अवघड होऊ जाते. परंतु कंपनीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आले तर हे शिवधनुष्य ते सहज पेलू शकतात. शेतीमालाच्या दरात फरक अन् फायदाही पाहिजे असेल तर बाजार व्यवस्थेतील पारंपरिक घटक सोडून शेतकरी वर्ग, सहकारी संस्था, शेतकऱ्यांच्या संघटना, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी खासगी बाजाराच्या माध्यमातून बाजारात उतरले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतीमाल उत्पादनांत खूप विविधता आहे. येथे ज्वारी-बाजरीपासून ते द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी घेतली जाते.

भाजीपाल्यामध्ये सुद्धा पालक-मेथी अशा पालेभाज्यांपासून विदेशी भाजीपालाही येथे पिकतो. अशावेळी खासगी बाजार उभे करण्यास येथे मोठा वाव आहे. या संधीचे सोने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करायला पाहिजे. शेतीमाल खरेदी-
विक्रीसाठी विविध पर्याय निर्माण झाले, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढीस लागली तर शेतकऱ्यांना जवळच चांगल्या बाजारपेठांचा पर्याय उपलब्ध होईल. अशा खासगी बाजार व्यवस्थेत प्रचलित बाजार समित्यांत शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबले, शेतकऱ्यांचा आडत, हमाली, बाजार फी आदींवर होणारा खर्च वाचेल, त्याच्या शेतीमालास रास्त दरही मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT