Agriculture Weather Agrowon
संपादकीय

Agriculture Weather Report : अंदाज असावेत अधिक अचूक

Article by Vijay Sukalkar : दीर्घपल्ल्याच्या अंदाजातून शेतकऱ्यांना अजूनही गाव-विभागनिहाय नक्की कधी, किती, कुठे, कसा पाऊस पडेल, हे कळत नाही.

विजय सुकळकर

Agriculture Climate Prediction : तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे महिनाभरापेक्षा अधिक कालावधीचा अंदाज सांगता येणे आता शक्य झाले आहे. हवामान अंदाजात आता अचूकताही आली आहे. अशा प्रकारच्या दीर्घपल्ल्याच्या अचूक अंदाजाने पीक नुकसान टाळता येते.

नैसर्गिक आपत्तींचे अनुमानही अचूक असल्याने पूर, चक्रीवादळे याद्वारे मरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असा दावा भारतीय हवामानशास्त्र खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी केला आहे.

‘एल निनो’ देखील यंदा सामान्य स्थितीत असून, त्याचा नकारात्मक परिणाम या वर्षी राहणार नाही, त्यामुळे मॉन्सून सरासरी गाठेल, असा विश्वासही त्यांनी भारतीय जनतेला दिला आहे. देशभरातील कथित हवामान तज्ज्ञांचाही त्यांनी या वेळी वेध घेतला ते बरे झाले.

आपण पाहतोय सोशल मीडियावर कथित हवामान तज्ज्ञांचे पीक चांगलेच फोफावले आहे. यातील अनेक व्यावसायिक असून, पैसे कमवण्याच्या नादात ते उलटसुलट हवामान अंदाज वर्तवित असतात.

त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचा गोंधळ उडतोय. हवामान अंदाज वर्तविण्यासाठीचे कोणते मॉडेल त्यांच्याकडे आहे, असे विचारल्यास त्यांची भंबेरी उडते. त्यावरून अशा तथाकथित हवामान तज्ज्ञांकडे अंदाज वर्तविण्यासाठी कोणतेही वेगळे असे मॉडेल नाही, हे स्पष्ट होते.

एकतर ठोकताळ्यावरून नाहीतर आयएमडीचाच अंदाज घेऊन ते फक्त वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे अशा तथाकथित हवामान तज्ज्ञांवर शेतकऱ्यांसह कोणीच विश्वास ठेवून आपले नुकसान करून घेऊ नये.

अशा तथाकथित हवामान तज्ज्ञांबरोबर देशविदेशांतील खासगी संस्थाही भारतातील हवामान अंदाज वर्तविण्यासाठी फारच घाई करतात. घाईगडबडीने वर्तविलेले त्यांचे अंदाज बरोबर येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम पसरतो. अशा प्रकारच्या संस्थांवर काही नियंत्रण आणता येईल का, याचा विचार झाला पाहिजेत. यावर्षीचेच उदाहरण पाहू.

ऑक्टोबर २०२३ मध्ये आगामी उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते मे २०२४ या काळात एल निनो सर्वाधिक तीव्र स्थितीत पोहोचण्याची शक्यता अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (नोआ) या संस्थेने वर्तविली होती.

त्यामुळे शेतकऱ्यांपासून ते शासन अशा सर्वांचीच चिंता वाढली होती. त्या वेळी ‘ॲग्रोवन’ने एल निनोबाबत ‘नोआ’ने वर्तविलेला अंदाज घाईचा वाटतो, याबाबत वाट पाहावी लागेल.

अशी भूमिका घेतली होती. आणि घडलेही तसेच! जानेवारी २०२४ मध्ये आता एल निनो ओसरेल, ‘ला निना’ स्थिती तयार होऊन चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला. मॉन्सूनवर भारताचेच नाही तर जगभराचे अर्थकारण अवलंबून आहे. मॉन्सूनच्या अंदाजावरच व्यापार धोरण ठरते. त्यामुळे जागतिक व्यापार संघटना विविध देशांकडून हवामान विषयक अहवाल मागवत असते.

अशावेळी हवामान अंदाज वर्तविणाऱ्या काही खासगी संस्था व्यापार-उद्योगास पूरक ‘अर्थ’पूर्ण अंदाज देत असल्याचेही बोलले जाते. ही बाब अतिगंभीर असून त्यावरही नियंत्रण यायला हवे. भारतीय हवामान खात्याला १५० वर्षे पूर्ण झालेली असताना हवामान अंदाजात अचूकता आली ते बरेच झाले.

परंतु दीर्घपल्ल्याचे तसेच अल्पकालीन हवामान अंदाजात अजून अधिक अचूकता यायला हवी. दीर्घपल्ल्याच्या अंदाजातून शेतकऱ्यांना गाव-विभागनिहाय नक्की कधी, कुठे, किती, कसा पाऊस पडेल, हे कळत नाही. तसेच अल्पकालीन अंदाजातील अधिक अचूकतेने नैसर्गिक आपत्तीत शेतीमालाचे नुकसान अजून कमी होऊ शकते.

हवामान अंदाजाची अचूकता वाढविण्यासाठी देशभरात रडारसह हवामान केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. हवामान अंदाज तत्काळ सर्वांपर्यंत पोहोचविणारी यंत्रणाही सक्षम करावी लागेल. असे झाल्यास नैसर्गिक आपत्तीत मृत्यूचे प्रमाण कमी होईल, शेतीमालाचे नुकसानही घटेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT