Ajay Metachem : आमच्या ‘अजय मेटाकेम’मध्ये सुरुवातीपासून म्हणजे कंपनीच्या जन्मापासूनच अनेक प्रश्नांचा, अडचणींचा मारा सुरू झाला होता. आमचा पाया तंत्रज्ञानाचा होता. कारण आम्ही दोघंही बंधू इंजिनिअरिंगचे पदवीधर होतो. वडीलबंधू माधवराव यांचं शिक्षण मँचेस्टर, लीड्स या इंग्लंडमधील शहरांत झालं होतं. त्यांचा उत्तम मित्रपरिवारही तिथं होताच.
‘मेटाकेम’मध्ये आमचा कुणाशी परिचय नाही, भांडवल नाही, जागा नाही; परंतु हे बहुतेक उद्योजकांच्या बाबतीत होत असतं. यावरच तर मात करायची असते. आमच्या स्पर्धेत जगभर, विशेषतः युरोपमध्ये, स्थिरावलेल्या कंपन्या होत्या. ग्राहकांना असलेली त्या कंपन्यांची भुरळ, संबंध यांमुळे आमच्यासारख्यांना संधी मिळणं अवघड असे. यावर उपाय म्हणजे, नवीन उत्पादनं निर्माण करणं किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या किमती अनेकदा भरपूर असत, ती उत्पादनं स्वस्तात विकणं... यात यश येऊ लागलं होतं. ‘किर्लोस्कर उद्योगसमूहा’नं धोरणात्मक मदत केली. त्यामुळे आमच्या गाडीला वेग येऊ लागला होता. तशीच गोष्ट काही काळानंतर ‘टाटा उद्योगसमूहा’बाबत होती. जमशेदपूरला काही वर्षांनंतर कारखाना सुरू करावा लागला, इतका पाठिंबा मिळू लागला होता. ‘टेल्को’, ‘टिस्को’ यांच्या संशोधन विभागात आमचा सततचा संपर्क असे. त्यांच्या अडचणी, नवीन गरजा यांचा सतत मागोवा घेत आम्ही उत्पादनांत सुधारणा करत असू अथवा नवीन उत्पादनं निर्माण करत असू. एकदा मी त्यांच्या या विभागाला गमतीनं म्हटलं, ‘‘हे बरं आहे, तुम्ही आमचा संशोधन विभाग फुकटात वापरता...आपली डोकेदुखी आमच्यावर ढकलता!’’ त्याचे प्रमुख डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘‘हे खरं असलं, तरी तुम्हाला प्राधान्यानं आम्ही व्यवसाय तर देतोच; परंतु इतरत्र नवीन ग्राहक मिळवण्यात आमच्या नावाचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असणार.’’
आमचे संबंध स्नेहाचे, विश्वासाचे निर्माण झाले होते. बहुतेक कंपन्यांबरोबर आम्ही अशाच प्रकारचे संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत असू.
इंग्लंडमधील ‘डनलॉप’ या कंपनीत माधवरावांचे काही मित्र होते. त्यांनी निर्माण केलेली काही उत्पादनं म्हणजे फोमच्या गाद्या, उशा वगैरे जगभर विकल्या जात. मात्र इंग्लंडमधील काही कैदी आत्महत्या करण्यासाठी या गादीला आग लावत असत. या फोममध्ये आयसोसायनाइड नावाचं अत्यंत विषारी रसायन असतं. आग लागल्यावर आगीपेक्षा या रसायनाच्या गॅसमुळे, म्हणजे वायूमुळे, कैदी मरत असे. घरात, गाडीत आगी लागल्यावर आगीपेक्षा या रसायनामुळे लोक दगावत. डनलॉपला यावर उपाय हवा होता. काही उत्पादनं होती; त्यामुळे गादीचं आयुष्य फार कमी व्हायचं, अथवा तिचा मऊपणा जात असे.
यावर उपाय शोधता येईल असं माधवरावांना वाटलं. आमच्याकडे उत्तम संशोधन खातं होतं. दिवस-रात्र प्रयत्न करून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. मग काय, सर्व जगच आम्हाला उपलब्ध झालं. याची विक्री करण्यासाठी आम्ही दोघंही युरोपमधील सर्व पुढारलेल्या देशांमध्ये, तसंच अमेरिकेला जात असू. यात मी अधिक प्रवास करत असे. याच दरम्यान ‘टिस्को’ कंपनीनं ‘ब्रिटिश स्टील’बरोबर काही नवीन उत्पादनांसंदर्भात करार केला.
डॉ. मुखर्जी यांना मँचेस्टर इथं पाच-सहा महिन्यांसाठी पाठविण्यात आलं असल्याचं मला माहीत होतं. एकदा मी अमेरिकेहून इंग्लंडला आलो. तिथल्या आमच्या ग्राहकांना भेटलो आणि मँचेस्टरला गेलो. डॉ. मुखर्जी यांच्याशी संपर्क साधला आणि ‘ब्रिटिश स्टील’बरोबर नवीन तंत्रज्ञान वापरताना आमची कोणती उत्पादनं लागतील याचा अंदाज घेणं आणि पुण्यात त्यावर काम सुरू करणं असा उद्देश असल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यांना हा आश्चर्यकारक; मात्र कौतुकास्पद असा प्रयत्न वाटला. साहजिकच त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. अशा गोष्टींमधूनच आमची व्यवसायवृद्धी होत होती, हे सांगायला नको.
मँचेस्टर-मुंबई अशी हवाईसेवा ‘ब्रिटिश एअरवेज’नं त्या वेळी नुकतीच सुरू केली होती. लंडनहून विमान पकडण्याऐवजी मी मँचेस्टरहूनच मुंबईला यायचं ठरवलं. त्यामुळे वेळही वाचणार होता. विमानात माझ्याशेजारी साधारणतः २८-३० वर्षांची तरुणी होती. ती गुजराती वाटली. पूर्वी मोबाइल-फोन, विमानातील सीटसमोर टीव्ही वगैरे सुविधा नसत. थोड्या वेळानं जेवण आलं. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. नंतरचं जे घडलं ते लिहावं की नाही याविषयी माझ्या मनात द्वंद्व होतं; परंतु या सदराचं नाव ‘अनुभवें आले...’ हे असल्यानं हा अनुभव लिहीत आहे.
त्या युवतीशी गप्पा सुरू झाल्या. इकडच्या तिकडच्या गोष्टींवर काही वेळा चौकशीवजा आम्ही बोलत होतो. अनेक गोष्टींची माहिती ती माझ्याकडून घेत होती.
थोड्या वेळानं, म्हणजे आमचे जेवण जवळपास संपलेलं होतं त्या वेळी, तिनं विचारलं : ‘‘तुमची महाराष्ट्रात बऱ्यापैकी ओळख दिसते. तुम्हाला एक अगदी वैयक्तिक गोष्ट विचारू का? माझ्या आयुष्याशी त्या गोष्टीचा फार मोठा भावनात्मक संबंध आहे.’’
मला कळेना, असा कोणता प्रश्न आहे, की मला विश्वासात घेऊन त्याबद्दल तिला माझ्याशी बोलावंसं वाटलं...
मी म्हणालो, ‘‘जरूर विचारा. मला शक्य असेल तर मी उत्तर देईन.’’ संवाद सुरू झाला.
‘‘तुम्हाला स्मिता पाटील माहीत आहे का?’’ असं तिनं विचारताच मी म्हटलं ‘‘अहो, ती एवढी प्रथितयश अभिनेत्री आहे आणि तीही मराठी. साहजिकच मला माहीत आहे ती.’’
‘‘तिच्याबद्दल तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक काय माहिती आहे?’’ असं तिनं विचारताच मी म्हणालो, ‘‘हे का विचारताय? हे खरं आहे, की मी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना ओळखतो.’’ त्यावर तिनं परीक्षावजा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मी तिला सांगितलं, ‘‘इंग्लंडला यायच्या आधी मी अमेरिकेतील शिकागो इथं होतो आणि स्मिता पाटीलच्या बहिणीकडे नेहमीप्रमाणे उतरलो होतो.’’
मी तिच्या बहिणीच्या नावाचा उल्लेख केला.
त्या तरुणीचा लगेचच पुढचा प्रश्न, ‘‘मन्या कोण?’’
मी उत्तरलो, ‘‘तिची धाकटी बहीण. वकील आहे ती.’’
मग तिनं तिच्या वडिलांचं नाव (शिवाजीराव पाटील) विचारून घेतलं, तसंच ते मुंबईत कुठं राहतात (कार्टर रोड) इत्यादी माहिती माझ्याकडून मिळवली. माझ्या डायरीत शिवाजीरावांचा टेलिफोन-नंबर होताच. शिवाजीराव पत्नीसह आमच्याकडे, विशेषतः माझे वडीलबंधू माधवरावांकडे, अधिक वेळा येत असत. पाटील कुटुंबीयांशी माझी खरोखरच जवळीक आहे, याची तिला आता खात्री पटली. तिनं आता मन मोकळं करायला सुरुवात केली.
ती म्हणाली, ‘‘माझ्या बाळाच्या जन्माच्या वेळी मी मुंबईत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. प्रसूतिकळांमुळे माझी शुद्ध हरपली. नंतर, मी देहापासून वरती तरंगत आहे असं मला दिसायला लागलं. डॉक्टरांची धावपळही मी पाहत होते. अपघातात मरण पावलेली जवळची मैत्रीण माझ्या त्या अवस्थेत मला एका टप्प्यावर ‘भेटली’.
तिनं मला विचारलं, ‘इथं काय करत आहेस? खाली जा.’
मी तिला म्हणाले, ‘मी इथं काय करत आहे ते मला माहीत नाही... आणि, खाली जायचं म्हणजे काय, हे मला समजलं नाही.’
आणखी ओळखीच्या अशाच एक-दोन व्यक्ती ‘भेटल्या’.
यानंतर स्मिता पाटील ‘भेटली’. तिनं मला एक धक्का दिला. स्मिता मला म्हणाली, ‘ए वेडाबाई, इथं काय करते आहेस? तुझं बाळ खाली तिकडं जन्म घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता लगेच गेली नाहीस तर तुझी गत माझ्यासारखी होईल.’ मी तिला म्हणाले, ‘मला मान्य आहे; परंतु कसं जायचं ते कळत नाही.’ त्यावर स्मिता म्हणाली, ‘मी ते करते... मात्र खाली गेल्यावर त्या डॉक्टरला एक धक्का मार आणि असं असं
करायला प्रवृत्त कर.’ स्मिताचं ते म्हणणं मी मान्य केलं.’’
ती तरुणी तिचे हे अनुभव सांगताना पुढं म्हणाली, ‘‘स्मितानं मला खाली ढकललं व काही अंतर ती स्वतः माझ्याबरोबर आली. या वेळात स्मितानं मला सांगितलं, ‘तू फक्त माझं एक काम कर. माझ्या घरच्यांना सांग, की मी अगदी आनंदात आहे. तुम्ही प्रतीकची (स्मिता पाटील-राज बब्बर यांचा मुलगा) काळजी घेत आहात, त्यामुळे मी फार समाधानात आहे. विशेषतः मन्याला सांग, की मी तुझ्यावर खूप खूश आहे.’ डॉक्टरसंदर्भात स्मितानं मला दिलेल्या सूचनेनुसार मी केलं आणि मी शुद्धीवर आले आणि बाळाला जन्म दिला.’’
स्मिता पाटीलच्या कुटुंबीयांना कसं शोधायचं या विवंचनेत ती तरुणी काही काळ होती. ‘मन्या कोण’, हा प्रश्न तिनं मला का विचारला होता, त्याचा संदर्भ मला आता लागला. मुंबईत उतरल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि मी शिवाजीरावांना फोन करून हे सर्व सांगितलं. त्यानंतर मी त्यांना विनंती केली, की या मुलीनं तुमच्याशी संपर्क साधला तर तिला जरूर वेळ द्या. त्यांनी ते मान्य केलं. ‘‘...परंतु विश्वास बसत नाही,’’ असं मला ते म्हणाले आणि त्यासंदर्भात ते माझ्याप्रमाणेच सहमत झाले. मात्र विश्वास बसणार नाही अशा अतर्क्य गोष्टी काही वेळा पाहायला-ऐकायला मिळतात. त्यापैकीच हा एक प्रसंग होता. अर्थातच कायमचा स्मरणात राहील असा.
आपल्या किंवा काही लोकांच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग कदाचित घडलाही असेल असं यावरून वाटतं. मात्र याबाबत काय वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय वा मत असेल. किंवा आपल्याला माहीत असलेल्या सूक्ष्म मनामुळे (पॅरासायकॉलॉजी) मानसशास्त्रामध्ये काही शारीरिक परिस्थितीत अशा गोष्टींचा अनुभव येतो, असं मला सांगितलं गेलं. मला अर्थातच हे समजायला मर्यादा होत्या.
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक ८४८४९ ७३६०२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.