Pratap Pawar : तेव्हापासून कानाला खडा!

Pratap Pawar Article : आपल्या शिक्षणासाठीही आपल्याला चांगलीच किंमत मोजावी लागते. माझी एक-दोन ठिकाणी फसगतही झाली. याचा विचार एखाद्या वेळी माझ्या मनात येतो तेव्हा मी चेष्टेनं स्वतःलाच विचारतो : ‘‘निर्णय कुणाचा होता?’’ उत्तर येतं, ‘‘अर्थातच तुझा!’’
Pratap Pawar Article
Pratap Pawar ArticleAgrowon
Published on
Updated on

BIAF : ‘बाएफ’ (भारतीय ॲग्रो-इंडस्ट्रीज फाउंडेशन) या संस्थेचा विश्वस्त या नात्यानं मी नुकताच उरुळीकांचन इथं गेलो होतो. संस्थेचा वर्धापन दिन, संस्थापक मणिभाई देसाई यांचा स्मृतिदिन हे निमित्त होतं. सर्व देशांतून अनेक आदिवासी संस्था, व्यक्ती - ज्या ‘बाएफ’मुळे यशस्वी झाल्या होत्या - त्यांचा कौतुकसोहळाही यानिमित्तानं होत असतो. ओडिशा, बिहार, नंदुरबार इथल्या दुर्गम भागात जाऊन ‘बाएफ’च्या कार्यकर्त्यांनी घडवलेलं सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक परिवर्तन पाहणं, तिथल्या लोकांचं, विशेषतः स्त्रियांचं, काम आणि मनोगत ऐकणं हा सर्व कार्यकर्त्यांना, विश्वस्तांना समाधान देणारा प्रसंग असतो. देशातील तेरा प्रांतांमध्ये गेली पाच दशकं हे काम अव्याहत सुरू आहे. स्थानिक प्रतिनिधींपासून शास्त्रज्ञांचा यात सहभाग असतो. एकट्या उरुळीकांचनमध्ये सुमारे ४०० लोक विविध प्रकल्पांवर काम, संशोधन करत असतात आणि हे सर्व मग देशपातळीवर जातं.

‘ॲग्रोवन’च्या माध्यमांतून महाराष्ट्रात हे ज्ञान, माहिती पोहोचवणं मला सोपं जातं. आपल्या माध्यमाचा तो आणखी एक कृतिशील सहभाग असतो. तिथं मला एका व्यक्तीनं भेटायची इच्छा व्यक्त केली होती; परंतु आजारी पडल्यानं ते शक्य झालं नाही. यानिमित्तानं काही आठवणी जाग्या झाल्या. सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची गोष्ट. मी बारामतीहून पाटसमार्गे सोलापूर महामार्गानं पुण्याकडे येत होतो व गाडी मीच चालवत होतो. उरुळीकांचनला पोहोचेपर्यंत दुपारचे दोन-तीन वाजलेले होते. एक गोरागोमटा तरुण एका लहानशा झाडाखाली भर उन्हात उभा होता. माझं त्याच्याकडे दुरूनच लक्ष गेलं. त्याच्या कपड्यांवरून तो सुशिक्षित असावा असा अंदाज मी बांधला. कोवळा चेहरा...त्यामुळे तो शेतकऱ्याचा नसावा असाही विचार मनात आला. मी गाडी थांबवली. नाहीतरी मी एकटाच होतो आणि बहुधा पुण्यालाच जाण्यासाठी हा तरुण एसटीची वाट पाहत असावा हा माझा अंदाज बरोबर ठरला. गाडी थांबल्यावर तो तरुण पळतच आला.
मी विचारलं , ‘‘कुठं जायचंय?’’
तो म्हणाला, ‘‘पुण्याला. तास-दोन तास झाले; पण एसटीचा पत्ताच नाही.’’
मी म्हणालो, ‘‘बस गाडीत. मीही पुण्यालाच चाललो आहे.’’
आमच्या गप्पा सुरू झाल्या. तो अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन भारतात नुकताच परतला होता. गप्पा मारता मारता पुणं कधी आलं हे ध्यानातही आलं नाही.
मी म्हणालो, ‘‘हे पाहा, स्वारगेट आलं आहे; परंतु तुला पुढं कुठं जायचं आहे? कारण मी डेक्कन जिमखान्यावर चाललो आहे.’’

Pratap Pawar Article
Pratap Pawar : माझे काही शिक्षक

तो उतरता उतरता म्हणाला, ‘‘साहेब, मलापण तिकडेच जायचं आहे.’’
मी म्हणालो, ‘‘मग बस की, मी सोडतो तुला तिकडेच.’’
जिमखाना आल्यावर मी सहज म्हटलं, ‘‘आता मी प्रभात रोडवर जाणार आहे.’’
तो लगेच उत्तरला, ‘‘अहो मला पण...’’
गाडी पुढं जात राहिली.
प्रभात रोडला यायच्या आधी पुन्हा मी म्हटलं, ‘‘मी दुसऱ्या गल्लीत जाणार आहे.’’
तो उत्तरला, ‘‘साहेब, मलाही...!’’
आता मात्र मी चकित झालो.
मी त्याला थट्टेनं म्हणालो, ‘‘आता सांगू नकोस, की त्या गल्लीत पवारांकडे जायचं आहे.’’
तोही थोडा गोरामोरा झाला आणि म्हणाला, ‘‘साहेब, विश्वास ठेवा... माधवराव पवारांच्याच घरी जायचं आहे मला!’’
आम्ही त्या वेळी एकत्रच राहत असू. या विलक्षण योगायोगानं माझीही करमणूक झालीच; परंतु कायमचं नातंही जोडलं गेलं.

Pratap Pawar Article
Pratap Pawar : काही वाचन, चिंतन

 अडचणीत आलेल्या लहान उद्योजकांना  शंतनूराव किर्लोस्करांच्या मार्गदर्शनात ‘किर्लोस्कर फाउंडेशन’चा विश्वस्त या नात्यानं मी मदत-मार्गदर्शन करत असे. यात बहुधा मराठी उद्योजक असत. मलाही खूप शिकायला मिळायचं. शंतनूरावांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही अनेक होते. अशीच एकदा एका प्रथितयश उद्योजकानं माझी भेट घेतली. ज्या जिल्ह्यात या उद्योजकाचं उत्पादन होत होतं तिथं मला आग्रहानं बोलावण्यात आलं. आपण अत्यंत अडचणीतून हा उद्योग कसा उभा केला आणि आता विस्तार करण्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी केल्याचंही त्यानं सांगितलं. अर्थात, मला कौतुक वाटलं. नंतर त्यानं त्याच्या नवीन प्रकल्पाचं उद्‍घाटन करण्यासाठी मला आणि त्याच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाला बोलावलं. आदरातिथ्य, सत्कार वगैरे गोष्टी झाल्या. जेवताना त्या अध्यक्षांनी ‘ही संस्था उत्तम असून आम्ही समाधानी आहोत’ असं सांगितलं. यानंतर संबंधित उद्योजक घरी भेटायला आला. ‘उधारीमुळे व्यवसाय वाढत नाही... कच्चा माल रोखीनं घ्यावा लागतो...’ असं सांगून त्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा त्यानं वाचला.
त्याचं सगळं ऐकून घेतल्यावर ‘मला काय करता येईल यावर मी विचार करेन,’ असं मी त्याला सांगितलं. त्याचा ताळेबंद पाहिल्यावर, उधारीत खूप पैसे अडकलेले असल्याचं माझ्या ध्यानात आलं. माझा त्या व्यवसायाशी संबंध असल्यानं अनेक पुरवठादार माझ्या व्यक्तिगत ओळखीचे होते. त्यांना मी एकत्र बोलावलं आणि सुचवलं - ‘बँकेनं ९० दिवसांची व्याजासह पैशाची हमी दिल्यास माल द्यावा.’ बहुतेक सर्वांनी ते मान्य केलं. एक-दोन जण म्हणाले, ‘‘साहेब, हा माणूस भरवशाचा नाही.’ परंतु त्यांच्या म्हणण्याकडे मी दुर्लक्ष केलं. आता त्या उद्योजकाला ९० दिवसांच्या गरजेइतकं खेळतं भांडवल मिळणार होतं. त्या उद्योजकाची ‘आर्थिक तब्येत’ही सुधारेल आणि प्रगतीपण होईल, असा आमचा यामागचा हेतू.

Pratap Pawar Article
Agricultural Article : आपला देश खरेच कृषिप्रधान आहे का?

मग हा उद्योजक मला भेटून म्हणाला, ‘‘साहेब, बँकांमधून मी खूपच पैसे उचलले असल्यानं पाच-सहा कोटी रक्कम बँकांना दिल्याशिवाय पुरवठादारांना L/C म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट द्यायला तयार नाहीत. तुम्ही मदत करा. माझ्याकडे पुष्कळ जमीन, एक-दोन घरं आहेत, ती मी गहाण ठेवीन.’’
मी अशा भानगडीत पडत नाही; परंतु त्या परिस्थितीत मी तेही मान्य केलं. सुदैवानं, पैसे द्यायच्या आधी माझ्या, तसंच पुरवठादारांच्याही पैशाची काळजी व्याजासह घेतली जाईल, यापेक्षा अधिक जमीन कायदेशीररीत्या बांधून घेतली.
नंतर हे महाशय भेटेनात. पुरवठादारांच्या तक्रारी सुरू झाल्या. रोज देवपूजा-अर्चा, टिळा लावणारे हे महाशय शब्द न पाळणारे निघाले. त्यांचा ताळेबंद खोटा होता. या उद्योजक महाशयांनी बँकेच्या अध्यक्षांना आधीच सांगितलं होतं - ‘हे पवार आहेत. यांच्याकडे खूप पैसा आहे. यातून मी तुमची कर्जे फेडीन. त्यामुळे माझ्या उद्योगाबद्दल चांगलंच बोला.’ परिणामी, उद्‍घाटनाच्या वेळी संबंधित बँकेच्या अध्यक्षांनी स्वार्थी भावनेतून ‘संस्था उत्तम आहे,’ असं मला
सांगितलं होतं.
त्या उद्योजकानं गहाण ठेवलेल्या जमिनी विकून मी सर्व पैसे व्याजासह वसूल केले. सर्व पुरवठादारांचेही पैसे फेडले आणि उरलेले सुमारे दीड कोटी रुपये त्या उद्योजकाला धनादेशाद्वारे परत केले.

उद्योजकावर दिल्लीतून धाड पडली. त्या वेळी, मी पैसे दिलेले दिसल्यानं मला बोलावण्यात आलं. कसून चौकशी करण्यात आली. भाषा अत्यंत उर्मट होती. आपल्या अधिकारांचा दर्प ठाई ठाई दिसत होता; परंतु सर्व व्यवहार धनादेशाद्वारे झाल्यानं आणि मीच त्या उद्योजकाला दीड कोटी रुपये परत केल्याचं स्पष्ट दिसत असल्यानं दिल्लीकरांचा निरुपाय झाला. तरीही
मला वीस लाख रुपयांच्या मागणीचा निरोप आलाच. मी म्हणालो, ‘‘वीस रुपयेसुद्धा देणार नाही.’’ सुदैवानं मी यातून सुटलो. काही वेळा, नंतरच्या काळात आर्थिक बाबतीत काही भागीदारीत व्यवसाय केले. काहींमध्ये यश, तर काहींमध्ये अपयश आलं. काही वेळा चुकीची गुंतवणूक केली गेली. या सर्व गोष्टींमुळे मी आता कुणाच्याही आर्थिक फंदात पडत नाही. त्याची
गरजही नाही. यातून आपल्याच ध्यानात येतं, की आपल्या शिक्षणासाठीही आपल्याला चांगलीच किंमत मोजावी लागते. एक-दोन ठिकाणी फसगतही झाली. याचा विचार एखाद्या वेळी माझ्या मनात येतो
तेव्हा मी चेष्टेनं स्वतःलाच विचारतो, ‘‘निर्णय कुणाचा होता?’’
उत्तर येतं, ‘‘अर्थातच तुझा!’’
मग मी स्वतःलाच समजावतो, ‘‘मग, यापुढं त्याचा परिणामही तुझाच...’’
आणि, हेच खरं आहे...हे तुम्हालाही पटेल असं वाटतं.
तुमच्यावर अशी वेळ येऊ नये एवढीच सदिच्छा!

शक्य झाल्यास अवश्य मदत करावी, तीही निरपेक्ष असावी...आणि आपल्याला शक्य झालं याच्या समाधानात राहावं असा माझा स्वभाव. तथापि, यातून काही कटू अनुभवही आले. तुमच्या हातून अशा चुका होऊ नयेत यासाठी त्यातील एक अनुभव सांगावासा वाटतो.

(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
 ८४८४९ ७३६०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com