Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Indian Agriculture : शेतीत काम करायला कुणीही तयार नाही

Agriculture : मागील ४० वर्षांत देशातील शेती क्षेत्रात असलेल्या मनुष्यबळाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २३.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. एकूण शेतीमधील मनुष्यबळापैकी तरुण मनुष्यबळ फक्त १४.४ टक्के आहे. महिलांचा शेती क्षेत्रात काम करण्यासाठीचा सहभागही कमी होत आहे.

Team Agrowon

डॉ. भास्कर गायकवाड 

Indian Farming : मागील ४० वर्षांत देशातील शेती क्षेत्रात असलेल्या मनुष्यबळाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २३.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. एकूण शेतीमधील मनुष्यबळापैकी तरुण मनुष्यबळ फक्त १४.४ टक्के आहे. महिलांचा शेती क्षेत्रात काम करण्यासाठीचा सहभागही कमी होत आहे.

माणसे तसेच पशुधन यांना चांगला- मुबलक पोषक आहार मिळावा म्हणून शेती पद्धतीचा विकास झाला. मागील हजारो वर्षांमध्ये शेतीमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. परंतु मागील एक शतकाचा विचार केला तर शेती क्षेत्रात फार मोठे बदल झाले किंवा ते करावे लागले.

शेतीमध्ये जसजशा समस्या निर्माण झाल्या किंवा समाजाला आवश्यक असलेले शेती उत्पादन कमी पडले; त्या त्या वेळी शेतीमध्ये बदल झाले. भारताचा विचार केला तर हरितक्रांतीनंतर शेती क्षेत्रात अनेक मोठे बदल झाले. आता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मागे वळून बघताना काही बाबी नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजे. देशाची लोकसंख्या ३६ कोटींवरून १३७ कोटींपर्यंत पोहोचली.

म्हणजे लोकसंख्या ३.८१ पटीने वाढली. १९६० पूर्वी पूर्ण दोनवेळचे खायला अन्नधान्य नव्हते. आपण त्यावेळी फक्‍त १०.६० कोटी टन अन्नधान्ये उत्पादन घेत होतो. त्यामध्ये वाढ होऊन आज ९३.६० कोटी टनांपर्यंत उत्पादन वाढविले. म्हणजे शेती उत्पादनात ८.८३ पट वाढ झाली. शेतीचे उत्पन्न २.९१ लाख कोटींवरून २१.१५ लाख कोटींपर्यंत वाढले. म्हणजे यामध्ये ७.९७ पट वाढ झाली; अर्थात याच दरम्यान देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये २८.४४ पट वाढ झाली.

शेतीमधून अन्नधान्य उत्पादन वाढून सर्वांना फक्त दोनवेळचे खायला मिळाले एवढेच नव्हे तर शेतीमालाची निर्यातही वाढविली. आज पीक उत्पादन वाढीचा वेग २.५५ टक्के असला तरी फलोत्पादन ४.५३ टक्के, दुग्ध व्यवसाय ५.३६ टक्के, मत्स्य व्यवसाय ७.१० टक्के या दराने दरवर्षी वाढत आहे, ही एक चांगली बाब आहे. या सर्व बाबी दिसत असल्या तरी  भूतकाळाचा विचार करून भविष्याचा वेध घेऊन वर्तमानकाळात यावर काहीतरी ठोस भूमिका घेतली तरच शाश्‍वत जीवन जगता येते. हाच खरा यशाचा मार्ग आहे.

वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जमिनीची प्रत ढासळत आहे, त्यामुळे उत्पादकता कमी होत आहे. अनेक पिके रासायनिक निविष्ठांना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद देत नाहीत. उत्पादन खर्चात वाढ होत असताना त्या प्रमाणात उत्पादन आणि उत्पन्न मिळत नाही. लोकसंख्या वाढत असल्यामुळे भविष्यात अन्नधान्याची मागणी वाढणार आहे. उत्पादन घेण्यासाठी शेतीखालची जमीन शहरीकरण- औद्योगीकरण यामुळे कमी होत आहे आणि शेती करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता वाढत आहे.

बाकीच्या प्रश्‍नांपेक्षा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्‍न भविष्यात जाणवणार आहे तो म्हणजे शेतीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ. हा प्रश्‍न फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरताच मर्यादित नाही तर तो संपूर्ण जगालाच भेडसावणारा आहे. मागील ४० वर्षांत देशातील शेती क्षेत्रात असलेल्या मनुष्यबळाचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २३.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

महाराष्ट्रात हेच प्रमाण २६.९ टक्क्यापर्यंत आहे तर केरळसारख्या राज्यात फक्त ८.५ टक्के आहे. ज्या राज्यात जास्त शिक्षण झाले तेथील शेतीमधील मनुष्यबळ सर्वांत कमी झाले. एकूण शेतीमधील मनुष्यबळापैकी तरुण मनुष्यबळ फक्त १४.४ टक्के आहे. गावातील तीन कामगारांपैकी एकच कामगार शेतीवर काम करतो तर दोन कामगार व्यवसाय, बांधकाम किंवा इतर क्षेत्रात काम करतात. शेतीमधील मनुष्यबळ कमी होत असताना त्यांचे
सरासरी वयही वाढत आहे.

२० वर्षांपूर्वी शेतीतील मनुष्यबळाचे सरासरी वय ३५ वर्षे होते ते आज ४० झाले आहे. म्हणजे मनुष्यबळ कमी होत असताना त्याचे सरासरी वयही वाढत आहे. ग्रामीण भागातील महिलांचा शेती क्षेत्रात काम करण्यासाठीचा सहभाग कमी होत आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली झाली त्या कुटुंबांतील महिला शेतीमध्ये काम करत नाहीत. पूर्वीच्या काळी हे प्रमाण जास्त होते. पूर्वी शाळेतील मुलेही शेतीकामामध्ये हातभार लावत होते. आज २१-२२ वर्षांपर्यंतची तरुण पिढी शिक्षणामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचाही शेती क्षेत्रात काम करायला हातभार लागत नाही.

शेती क्षेत्रातील महिला मनुष्यबळाचे प्रमाण मागील २० वर्षांत ३५ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत घटलेले आहे आणि ते आणखी घटण्याची शक्यता आहे. कारण आज ७० टक्के महिला बेरोजगार असूनही त्यांना शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा नाही.

तरुणांचीही हीच परिस्थिती आहे. आज ३६ टक्के तरुण बेरोजगार आहेत, परंतु ते शेतीमध्ये काम करायला तयार नाहीत. आज एकूण काम करणाऱ्‍या सात तरुणांपैकी फक्त एकच शेतीमध्ये काम करत आहे. जे तरुण शेती क्षेत्रात काम करतात तेही इतर काही पर्याय नाही म्हणून शेतीत काम करतात.

लोकसंख्येचा विचार केला तर भारत आणि चीनची तुलना होऊ शकते. चीनमध्येही १९८० पर्यंत अन्नधान्याचा प्रश्‍न मोठा होता. परंतु १९८० नंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात परिवर्तन करून ३०-४० वर्षांत जगातील एक नंबरचा देश म्हणून नावलौकिक मिळविला. वाढलेल्या लोकसंख्येला समस्या न मानता त्यांनी संधी समजून  या सर्व हातांना काम दिले आणि मोठी क्रांती झाली. अर्थात त्यावेळी आणखी एक निर्णय चीनने घेतला तो म्हणजे ‘एक कुटुंब- एक मूल’ हे धोरण! चीनची लोकसंख्या नियंत्रणात आली परंतु आज चीनमध्ये ग्रामीण भागातील समाज कमी होत आहे.

१९८० मध्ये ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. त्याचे प्रमाण आता ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्‍या मनुष्यबळाची संख्या १३.७ टक्के पर्यंत खाली आली. तसेच शेतीमध्ये काम करणाऱ्‍या मनुष्यबळाचेही वय वाढत असताना तरुण पिढी शेती क्षेत्रात येण्यास जास्त उत्सुक नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशात शेतीवर फक्त २.५ टक्के समाज अवलंबून आहे. अर्थात तेथेही मागील ७५ वर्षांत शेतकरी कुटुंबांची संख्या ७० लाखांवरून २० लाखांपर्यंत कमी झाली आणि जमीनधारणा ८३ हेक्टरवरून १८० हेक्टर प्रति शेतकरी झाली. याच काळात शेतीवरील मनुष्यबळाचे प्रमाण २३ लाखांवरून ११ लाखांपर्यंत कमी झाले.

अमेरिकेमध्ये इतर अनेक देशांतून शेतमजुरांना तात्पुरता व्हिसा देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. अर्थात ज्या देशातून मजूर येत होते तेथेही शिक्षण- प्रगती- विकास झाल्यामुळे त्यांच्याकडून येणाऱ्‍या मजुरांची संख्या कमी होत आहे. मजुरांच्या अभावामुळे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अंदाजे २० टक्के शेतीमाल शेतामध्येच राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

देशाचा विकास होत असताना शहरीकरण वाढत आहे तर ग्रामीण भागातील समाजाचे स्थलांतर होत आहे. २०५० पर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या १६५ कोटी असेल, त्यांपैकी ८७ कोटी समाज शहरात तर ७८ कोटी समाज ग्रामीण भागात असेल. वाढलेल्या लोकसंख्येच्या पोटापाण्यासाठी शेती उत्पादन घेण्याची जबाबदारी कमी होत असलेल्या शेतकरी- मजुरांवर येत आहे. अर्थात या समस्येला समस्या न समजता ती एक संधी आहे, असा विचार करून भविष्याचे योग्य नियोजन केले तर शेती क्षेत्राचा निश्‍चितच शाश्‍वत विकास होईल.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT