Drip Irrigation
Drip Irrigation Agrowon
संपादकीय

Drip Irrigation : संभ्रमाचे ‘थेंब’

टीम ॲग्रोवन

सूक्ष्म सिंचन (Micro Irrigation) पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते, तसेच पीक उत्पादनातही(Crop Production) वाढ होते, एवढे ढोबळमानाने शेतकऱ्यांना चांगले पटलेले आहे. त्यामुळेच अधिकाधिक शेतकऱ्यांकडून ठिबक (Drip Irrigation) अथवा तुषार सिंचनाचा (Sprinkler Irrigation) वापर होतोय.

मोकाट सिंचनाच्या तुलनेत सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर कमी कष्टदायक असल्यामुळे देखील याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय. असे असले तरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जलशक्ती मंडळाने ठिबकच्या वापराबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष पुढे आलेले आहेत.

त्यांच्या या सर्वेक्षणातून ठिबकच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसते. मोकाट पद्धतीने तसेच ठिबक तंत्राने पिकाला किती पाण्याची गरज असते, हे एकाही शेतकऱ्याला स्पष्ट करता आले नाही. ठिबक वापरणारे जवळपास निम्मे शेतकरी जमीन पूर्ण भिजेपर्यंत तर उर्वरित ५० टक्के शेतकरी सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार, इतरांकडून ऐकलेल्या पद्धतीप्रमाणे, विजेच्या उपलब्धतेनुसार, ठिबक विक्रेत्यांच्या सल्ल्यानुसार आणि जमीन-हवामानाच्या स्थितीनुसार ठिबकचा वापर करतात.

अर्थात पीकनिहाय पाण्याची गरज काय, सिंचन ठिबकद्वारे करायचे असेल तर पिकाच्या वाढीनुसार कधी आणि किती वेळ ठिबक चालू ठेवावे, याचा बहुतांश शेतकऱ्यांना आजही थांगपत्ता लागल्याचे दिसत नाही. यात शेतकऱ्यांचा काहीही दोष नाही. ठिबकबाबत कृषी विद्यापीठांत जे काही संशोधन झाले, ते विद्यापीठाच्या बाहेर पडले नाही.

ठिबक साधनसामग्री उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांना केवळ त्यांच्या व्यवसायाचे पडले आहे. त्यामुळे अधिकाधिक संच कसे विकले जातील, हेच ते पाहतात. कृषी विभाग सूक्ष्म सिंचनाचे आलेले अनुदान कसे वितरित होईल, त्यात आपला काय लाभ होईल, हेच पाहत आलेले आहे. त्यामुळे ठिबक सिंचन वापराच्या हेतूला हरताळ फासला जात असून यात नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.

शेतात केवळ लॅटरल आणि ड्रिपर्स टाकून त्याद्वारे कितीही वेळ पाणी दिले म्हणजे ठिबक सिंचन नव्हे. ठिबक सिंचनात पाण्याची बचत होते. परंतु ही बचत पीकनिहाय गरजेपुरते पाणी ठिबकद्वारे देण्यात आले तरच होते. नेमकी हीच माहिती काही अपवादात्मक द्राक्ष, डाळिंब उत्पादक सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या मोकाट सिंचनाने शास्त्रीयदृष्ट्या पिकाला लागणाऱ्या पाण्याच्या दुप्पट पाणीवापर शेतकरी करतात. संशोधन असे सांगते की पारंपरिक प्रवाही सिंचनाऐवजी ठिबकचा अवलंब केल्यास पाणी निम्म्याने कमी लागेल. परंतु हे जेव्हा शेतकरी शास्त्रीयदृष्ट्या पिकाला आवश्यकतेनुसार ठिबकद्वारे पाणी पुरवठा करतील, तेव्हाच शक्य आहे.

त्यामुळे पीकनिहाय ठिबकद्वारे पाणी किती लागेल आणि ते किती वेळ ठिबक चालवून पिकाला मिळेल, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. एवढेच नव्हे तर या माहितीच्या आधारेच राज्यातील शेतकरी ठिबकद्वारे पिकाला पाणी देतील, हेही पाहावे लागेल. ठिबकद्वारे पिकाला सिंचन करतानाचा संभ्रम पाहता शेतकऱ्यांचे व्यापक प्रबोधन आवश्यक आहे.

यातूनच राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमात ठिबक विषयाचा समावेश करून देशभर जनजागृतीची मागणीही रास्तच आहे. ठिबक वापराबाबत प्रबोधनाची जबाबदारी केवळ शासनाचीच नाही तर ठिबक संच निर्मिती करणाऱ्या कंपन्या, विक्रेते यांनी सुद्धा शेतकरी घेत असलेल्या पिकांत ठिबकचा वापर कधी, कसा, किती वेळ करायचा हे सांगितले पाहिजे. ठिबकची देखभाल दुरुस्ती हेही बहुतांश शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय.

त्यामुळे कंपन्यांनी ठिबक संच बसविल्यानंतर पहिल्या वर्षी निःशुल्क तर पुढील काही वर्षे सशुल्क देखभाल, दुरुस्तीची सेवा पुरवायला हवी. ह्या सेवा राज्य शासनाने कंपन्यांवर बंधनकारकच करायला हव्यात. शेतकऱ्यांनी सुद्धा येथून पुढे अधिक सजगतेने ठिबकचा वापर कसा होईल, हे पाहावे. असे झाले तरच ठिबकच्या वापरातून पाणी बचत होईल, शेतीमालाचे उत्पादन वाढेल, दर्जा सुधारेल, जमिनीचा पोतही चांगला राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT