Agrowon
Agrowon
संपादकीय

Life Is Beautiful : जगणं सुंदर आहे!

आदिनाथ चव्हाण

मानवजात किती चिवट असते ना! बळकट सांघिक भावना आणि विजिगीषू वृत्ती असेल, तर कोणत्याही कठीण प्रसंगातून तरून जाण्याची हिंमत माणूस बाळगून असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बाळकडू सहजी कोणालाच मिळालेलं नसतं. पण वेळ येते तेव्हा माणूस असीम जिद्दीची तोरणं बांधून संकटांवर मात करतो.

जगाच्या इतिहासात असे लक्षावधी प्रसंग आले असतील, की ज्यामध्ये माणसाच्या चिकाटीची कठोर परीक्षा घेतली गेली. कित्येकांनी दम तोडला असला, तरी बहुतांश जण धीरोदात्तपणानं वागून उत्तीर्ण झाले, विजेते ठरले. जगण्याला पुन्हा असोशीनं सामोरे गेले. अशा लढवय्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी अनेक पुस्तकं निघाली, लोकप्रियही झाली. त्यावर चित्रपट आले, गाजलेही. ही अशीच एक कहाणी.

दूरवर, तिकडं दक्षिण अमेरिकेत घडलेली. वर्ष होतं १९७२, म्हणजे या घटनेला गेल्या १३ ऑक्टोबरला ५० वर्षं झाली. जगाच्या इतिहासातील ही आगळीवेगळी बचाव आणि सुटका मोहीम. या घटनेनं अवघं जग चकित झालं. जगभरातल्या माध्यमांनी तिची दखल घेतली. उरुग्वे हा तसा छोटा देश. अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या कुशीत वसलेला. या घटनेनं तो जगाच्या केंद्रस्थानी आला.

परंपराप्रिय असलेल्या उरुग्वेतील मुलांवर संस्कारही तसेच व्हायचे. रग्बी हा या देशातला लोकप्रिय खेळ. राजधानी मॉन्टेव्हिडिओमधील जे स्टेला मॉरिस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा ओल्ड ख्रिश्‍चन फर्स्ट फिफ्टीन हा क्लब देशातील सर्वोत्तम संघ गणला जायचा. एकदा ते अर्जेंटिनात जाऊन तिथल्या संघांबरोबर सामना खेळूनही आलेले. या अनुभवानं आत्मविश्‍वास दुणावलेला. त्यामुळं चिलीला जाऊन तिथल्या संघांशी सामने खेळण्याचं ठरलं. सन १९७१ मधला हा दौरा यशस्वी ठरला.

अनेकांचा हा परदेश आणि विमान प्रवासाचाही पहिलाच अनुभव. या यशामुळं हुरळून गेलेल्या मुलांनी दुसऱ्या वर्षी पुन्हा चिलीला जाण्याचा बेत आखला. या दौऱ्याचं नियोजन भरात आलेलं. चिलीला जायचं म्हणजे आपल्या हिमालयासारखी असलेली भव्य आणि बर्फाच्छादित अँडीज पर्वतरांग ओलांडून जाणं आलं. बेत ठरत होता, तसा विस्कटतही होता.

कोण येणार, कोण नाही यावर चर्वितचर्वण सुरू होतं. विशेष विमानातील प्रवासी संख्येची बेगमी व्हावी म्हणून संघाबरोबरच काही मुलांचे नातेवाइकही जाण्यास तयार झालेले. तसं न होतं तर दरडोई विमानखर्च न परवडणारा ठरत होता. ऐनवेळी अनेकांनी माघार घेतलेली. मित्रांनी या सफरीवर यावं म्हणून संघातील रग्बी खेळाडूंनी त्यांना चक्क चिलीतील स्वैर युवतींची भडक वर्णनं ऐकवली. काही जण त्याला फशी पडले, दौऱ्यावर जायला तयारही झाले.

अशी धामधूम सुरू असतानाच जायचा दिवस उजाडला. गुरुवार, १२ ऑक्टोबर १९७२. कॅरास्कोच्या विमानतळावर उरुग्वे एअर फोर्सचं ‘फेअर चाइल्ड एफ २२७’ हे विशेष विमान दाखल झालेलं. दौऱ्यावर निघालेल्या मुलांची वयं अठरा ते सव्वीसच्या दरम्यान. कॅरास्कोचा छोटासा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुलांच्या उत्साहानं सळसळत होता. काही पालकही त्यांच्याबरोबर निघालेले.

विमान निघालं. उरुग्वे ओलांडून अर्जेंटिनावरून प्रवास सुरू झाला. पुढं दीडशे मैल रुंदीची अँडीज पर्वतरांग दिसू लागली. एकाएकी वैमानिकानं घोषणा केली, हवामान खराब असल्यानं विमान अर्जेंटिनातील मेंडोझा विमानतळावर उतरवत आहोत. विमान उतरल्यावर सारे प्रवासी मौजमजा करायला त्या छोट्या शहरात गटागटानं निघाले. रात्रीचा मुक्काम तिथंच करावा लागला. दुसऱ्या

दिवशी हवामान ठीक नसतानाही उड्डाण भरण्याचा निर्णय दोन्ही वैमानिकांनी घेतला. चिलीची राजधानी सँटियागोच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. तो पूर्णत्वास जाणार नव्हताच. चिलीकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी पर्वतरांगांवरील वातावरण पार बिघडून गेलं होतं. ढगांच्या दाटीत शिरलेलं विमान जोरदार वाऱ्यांमुळं फेकलं गेलं.

वैमानिकांना अंदाज आला नाही. पर्वताच्या कडांना पंख धडकल्यानं विमान कोसळलं. एकच कोलाहल झाला. पंचेचाळीसपैकी जे चाळिसेक लोक वाचले त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. पाठीमागचे पंख तुटून बर्फात कोसळलेल्या विमानाच्या सांगाड्याच्या पुढच्या भागातील काही जण शेवटच्या घटका मोजत होते. काही जबर जखमी झाले होते. मानसिक धक्का तर मोठाच होता.

तापमान शून्याच्या किती तरी खाली होतं. विमानाच्या आजूबाजूला मृतदेह विखरून पडले होते. पुढच्या सत्तर दिवसांत याच मित्रांच्या, आप्तांच्या मृतदेहाचे लचके तोडून जीव जगवावा लागणार आहे, याची भयावह जाणीव तेव्हा जगल्या वाचलेल्या कोणालाच नव्हती. आपल्या शोधासाठी उरुग्वे, चिलीहून विमानं बाहेर पडतील. लागलीच आपण या शीत स्मशानातून बाहेर पडू, असा विश्‍वास जिवंत राहिलेल्या सर्वांना वाटत होता.

पण तो फोल ठरणार होता. शोधासाठी विमानं निघाली, पण महाकाय पर्वतरांगांमध्ये या छोट्या विमानाचे अवशेष शोधणं त्यांना जमलं नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क साधणं शक्य होत नसलं, तरी विमानातील दुरुस्त केलेल्या मोडक्यातोडक्या रेडिओवरून मुलांना या घडामोडी कळत होत्या. अखेर काही दिवसांनी हा शोध थांबल्याचं कळल्यावर मुलांना नैराश्यानं घेरलं. पण त्यातून ते सावरले. जगण्यासाठीचा, आपल्या जगात परतण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. अर्थात, त्याला लगेच यशाची फळं लगडणार नव्हती.

ही मुलं कशी जगली, कशी तगली? त्यांच्यात वाद कसे झाले? त्यांनी एकमेकांना कसं सांभाळून घेतलं. जीवघेण्या कडाक्याच्या थंडीला आणि हिमवादळांना त्यांनी कसं तोंड दिलं? जवळचे खाद्यपदार्थ संपल्यावर शून्याखालील तापमानामुळं टिकून राहिलेल्या आपल्याच मित्रांच्या मृतदेहांचं मांस तोडून खाण्याची वेळ त्यांच्यावर कशी आली, हे सारं जाणून घ्यायचं असेल तर पीअर्स पॉल रीड यांनी लिहिलेलं ‘अलाइव्ह’ हे पुस्तक वाचायला हवं.

या पुस्तकाचा रवींद्र गुर्जर यांनी ‘सत्तर दिवस’ या नावानं केलेला मराठी अनुवाद श्रीराम बुक एजन्सीनं पुस्तकरूपात प्रकाशित केला आहे. खूप वर्षांपूर्वी मी तो वाचला होता. तेव्हापासून हे चित्तथरारक पुस्तक माझ्या स्मरणात पक्कं बसलं. अरेच्या, असाही संघर्ष कोणाच्या वाट्याला येऊ शकतो तर, अशी भयचकित करणारी जाणीव या पुस्तकानं करून दिली. पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीतही आशेवर जगणं कशाला म्हणतात, याचंही नेटकं आकलन या पुस्तकानं करून दिलं.

सगळे मार्ग खुंटतात तेव्हा हतबल मानवाच्या हाती उरते केवळ प्रार्थना. पर्वतरांगांत अडकलेल्या मुलांनी तोही मार्ग चोखाळला. त्यांनी ईश्‍वराचा धावा सुरू केला. राणा सहरी यांच्या लेखणीतून उतरलेली आणि जगजित- चित्रा सिंग यांनी गायलेली ही प्रार्थना तुम्ही ऐकली असेल...

मंज़िल न दे चराग़ न दे हौसला तो दे

तिनके का ही सही तू मगर आसरा तो दे ।

बेशक मेरे नसीब पे रख अपना इख़्तियार

लेकिन मेरे नसीब में क्या है बता तो दे ।

अशा प्रार्थनांनाही फळ आलं नाही. मुलांचा आत्मविश्‍वास दिवसेंदिवस ढासळू लागला. भुसभुशीत बर्फावरून चालत पर्वतारोहण करून माणसांच्या जगात पोहोचणं दिवसेंदिवस दिवास्वप्न ठरू लागलं. शेवटी दोघांनी धाडस करायचं ठरवलं. बाकीचे जखमी, अशक्त. त्यामुळं त्यांना विमानाच्या मोडक्या सांगाड्याबाहेर पडणं झेपणारं नव्हतं.

या सांगाड्यानंच त्यांना आसरा दिला होता. तोही नसता तर आणखी काही मुलं थंडीच्या, हिमवृष्टीच्या तडाख्यानं कधीच खपली असती. रॉबर्टो कॅनेसा आणि फर्नांडो पेरॅडो ही तुलनेनं धट्टीकट्टी असलेली मुलं आपल्या मित्रांच्या काही मांसाचा शिधा घेऊन मानवी वस्ती शोधण्याच्या मोहिमेवर बाहेर पडले. अशक्तपणा, प्रतिकूल हवामान, चौदा-पंधरा हजार फुटांवरची खडी चढण त्यांची परीक्षा पाहत होती. तरीही नऊ दिवसांचा प्रवास करून ते मानवी वस्तीत कसे पोहोचले हे मुळातून वाचणं थरारकच.

अशा अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या, लौकिक जगात परतलेल्यांना जगणं किती सुंदर आहे, याची साक्ष न पटती तरच नवल. मृत्यूला स्पर्श करून आलेली ही चिवट मुलं सुटकेनंतर कमालीची आनंदली. अर्थात, त्यांचं मन खात होतं. आपल्याच मित्रांच्या मृत शरीराचं मांस आपण खाल्लं आहे, त्यांच्या घरच्यांना तोंड कसं दाखवायचं, हा यक्षप्रश्‍न त्यांना सतावत होता. कुठून तरी हा विषय हळूवारपणे चर्चेत आला. माध्यमांपर्यंतही पोहोचला. काही माध्यमांनी त्याचा गवगवा केला नाही.

काही आक्रस्ताळी माध्यमांनी चार पावलं पुढं टाकत भडक बातम्या दिल्या. काही जिवंत मुलांना ठार मारून या मुलांनी त्यांचं मांस खाल्ल्याचा जावईशोध त्यांनी लावला. त्यानं ही मुलं हादरली. त्यांनी पुढं येऊन स्पष्टीकरण दिलं. पण व्हायचा तो त्रास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालाच. मित्रांच्या शरीराचे लचके तोडणं सोपं नव्हतं. ते जगण्यासाठी अपरिहार्यच होतं. तो निर्णय घेणं आणि अमलात आणणं त्याहून कठीण होतं. त्याबाबतचा पुस्तकातला हा उतारा..

अन्नसाठा संपत आला होता. सध्याचा आहार म्हणजे फक्त चॉकलेटचा तुकडा आणि घोटभर दारू. त्या सुदृढ खेळाडूंना इतक्या अपुऱ्या आहारावर निभावणं कठीण जात होतं. तरीही सशक्त, अशक्त, जखमी - सर्व जण समान वाटप स्वीकारत होते. जास्त दिवस जिवंत राहणं शक्य नाही हे सत्य ते जाणून होते. दिवसेंदिवस येणाऱ्या वाढत्या अशक्तपणामुळे, अंतकाळ फार दूर नाही हे लक्षात येण्यासाठी वैद्यकीय ज्ञानाची गरज नव्हती.

खाण्याचा प्रश्‍न दुसऱ्या पद्धतीनं सोडवता येईल काय, यावर विचारविनिमय सुरू झाला. अँडीजवर गवताची बारीकशी काडीदेखील उगवत नव्हती. विमानाच्या जवळपास तर बर्फच बर्फ होतं. शंभर फूट खाली जमीन दिसत होती. उघड्याबोडक्या खडकांना ऊन आणि हवा मिळत असे, पण त्यावर शेवाळासारखं काही तरी उगवे. ते खरवडून आणि वाटून पाण्याबरोबर खाऊन पाहिलंसुद्धा; पण त्याची चव कडवट आणि शिसारी आणणारी होती. अन्न म्हणून त्याचा काही उपयोग नव्हता. त्याखेरीज मात्र अक्षरशः काहीही दिसेना.

अगदी खुर्च्यांचाही विचार करण्यात आला; पण त्यात गवत भरलेलं नसल्यामुळं खाण्याच्या दृष्टीनं उपयुक्त काहीच नव्हतं. काहीही करून जिवंत राहायचं असेल, तर अपघातात ठार झालेल्या सहकाऱ्यांचं मांस खाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, हे बऱ्याच जणांच्या पूर्वीच ध्यानात आलं होतं. विचार भयानक होता, पण तितकाच सत्य! विमानाभोवती ठेवण्यात आलेली मृत शरीरं आत्यंतिक थंडीमुळे जशीच्या तशी टिकून होती.

आपल्याच मित्रांचं मांस कापून खाण्याची गोष्ट थरकाप उडवणारी होती; पण दुर्दैवी परिस्थितीमुळे त्याचाही विचार करणं आवश्यक होतं. हळूहळू त्या विषयाला तोंड फुटलं. मुलं आपापसांत बेताबेतानं चर्चा करू लागली. या कल्पनेला पाठिंबा मिळेल असा ज्यांच्याविषयी भरवसा होता, त्यांच्याजवळ विषय काढण्यात आला. शेवटी कॅनेसानं बिनदिक्कतपणे सर्वांपुढे प्रस्ताव मांडला. तो म्हणाला, ‘आपल्याला मदत मिळणं आता शक्य नाही. त्यामुळे सुटकेचे प्रयत्न आपल्यालाच केले पाहिजेत. अन्नाखेरीज ते असंभव आहेत. हा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल.’

काही घटना आपल्या अंतर्बाह्य बदलून टाकतात. मग ते प्रियजनांचे मृत्यू असोत, की असह्य वाटणारा नकार! कोणाचाही सल्ला न ऐकणारेही अशा घटनांनी बदलतात. जीवनाकडं नव्या दृष्टीनं पाहू लागतात. काही मात्र खचून जातात, प्रसंगी विध्वंसाचा मार्गही स्वीकारतात. अँडीजमध्ये अडकून पडलेली मुलंही अशीच बदलली. आपण जे जगतो ते सर्वसामान्य जीवन किती सुंदर आहे, याचा साक्षात्कार त्यांना झाला. पुस्तकातील हा एक उतारा या बदलाचा प्रत्यय देतो...

मानवी वस्तीच्या शोधात बाहेर पडलेल्या पेरॅडोचाही अपघातानंतर कायापालट झाला. त्याचा भित्रा, लाजरा आणि विक्षिप्त स्वभाव कुठल्या कुठे लुप्त झाला होता. त्याची व्यक्तिरेखा आता प्रभावी, खंबीर बनली. त्याच्याच नेतृत्वामुळे अखेरची मोहीम यशस्वी झाली होती. बाकी त्याचं पूर्वीचंच जीवन पुन्हा सुरू झालं; गाडी घेऊन समुद्रकिनाऱ्यावर भटकणं. पूर्वी त्याला बावळट समजणाऱ्या कित्येक सुंदर मुली आता त्याच्याभोवती गोळा झाल्या.

त्याचं प्रेम संपादन करण्यासाठी एकमेकींत चढाओढ सुरू झाली. कुठेही गेला तरी वार्ताहर आणि फोटोग्राफर त्याच्या मागोमाग जात. इतर पंधरा जणांचं प्रस्थही वाढलेलं होतंच. मुख्य म्हणजे सर्वांची एकी पहिल्यासारखीच टिकून होती. मनात प्रत्येकाला वाटायचं, की सुटका होण्यात आपला फार महत्त्वपूर्ण वाटा होता. हे थोडं खरंही होतंच.

सगळ्या मुलांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला होता. माणुसकीवरचा विश्‍वासही वाढला होता. त्या अपघातामुळे त्यांना खूप शिकायला मिळालं. पर्वतावर पाच हजार डॉलर्स जरी मिळाले असते, तरी त्यांनी एकसुद्धा सिगारेट विकली नसती. त्यांच्या फाजील अपेक्षा केव्हाच नष्ट झाल्या होत्या. सुधारलेल्या, ऐषआरामी जगात वावरताना मनातून ते स्थितप्रज्ञ बनले होते. घरच्या लोकांवर ते कमालीचं प्रेम करू लागले, तसंच साऱ्या जगावरही.

या विमान अपघातानं, बचाव मोहिमेनं जगाला थक्क केलं. साहित्य, मनोरंजन विश्‍वाला त्याची भुरळ न पडती तरच नवल! या दुर्घटनेवर तब्बल २६ पुस्तकं लिहिली गेली. शिवाय नऊ माहितीपट आणि चार चित्रपट निघाले. त्यापैकी १९९३ ला निघालेला ‘अलाइव्ह’ हा चित्रपट गाजला. या विमान दुर्घटनेला परवाच्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं माध्यमांनी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या दुर्घटनेत सापडलेला १८ वर्षांचा छोकरा कार्लोस पेझ आता ६८ वर्षांचा बाप्या झाला आहे. तो निष्णात डॉक्टर आहे. त्याची मुलाखत अनेक वृत्तपत्रांनी घेतली. तो म्हणाला, ‘आम्ही त्या वेळी जो संघर्ष केला तो कोणत्या हॉलिवूडपटाचा भाग व्हावा किंवा या घटनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त माध्यमांना मुलाखती द्याव्यात यासाठी नव्हताच मुळी! घरी परतून आई-वडिलांची गळाभेट घेण्यासाठी मी आसुसलो होतो. केवळ त्यासाठीच त्या अग्निदिव्यातून आम्ही बाहेर पडलो.’

लोकहो, संकटात आपली माणसंच आठवतात. त्यांचा आठवच आपल्याला संघर्षासाठी, जगण्यासाठी बळ देत राहतो. जगणं खरंच सुंदर असतं, पण ते सोपं मात्र नसतं. ते वेळोवेळी अनेक आव्हानं आपल्यापुढं उभी करतं. आपली कसोटी पाहतं. धीरोदात्तपणानं त्याला सामोरं जाता आलं, तर यश मिळो न मिळो लढून कटल्याचा आनंद तरी नक्की मिळतो.

नशिबावर भरवसा ठेवून राहणाऱ्यांचं या जगात काही भलं व्हायची शक्यता तशी कमीच. हातपाय हलवणाऱ्यांना मात्र भरभरून जगता येतं. अशा माणसाची जग कदर करतं. त्याला आदर मिळतो, सन्मान मिळतो. सत्तर दिवसांची ही कहाणी आपला जगण्यावरचा विश्‍वास दृढ करणारी ठरावी. माणूस प्रतिकूल परिस्थितीतही किती उत्तुंग कार्य करू शकतो, याचं भान जगाला आणून देणारा हा अपघात एकूण मानवजातीच्या संघर्षशील इतिहासातील मानाचं पान ठरावा.

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे

संपादक संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT