Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

Environment : जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर ७६ मोठ्या आरोग्य संघटनांनी गतवर्षीपासून ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली
Environment
EnvironmentAgrowon

डॉ. मधुकर बाचूळकर

सजीवांसाठी हवा, पाणी, जमीन, प्रकाश आणि ऊर्जा हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या घटकांशिवाय सजीव जगू शकत नाहीत. पण मानवाने हे सर्व उपयुक्त घटक प्रदूषित केले आहेत. यामुळेच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. बहुतांश पर्यावरणीय समस्या या मानव निर्मित आहेत.

यापैकी सर्वांत मोठी समस्या आहे, जागतिक तापमानवाढ आणि बदलते हवामान. अलीकडील काही वर्षांपासून फक्त आपल्या देशाचे नव्हे, तर संपूर्ण जगाचे, पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि यासाठी दोन महत्त्वाची कारणं आहेत, ओझोनचा ऱ्हास आणि हरितगृह वायूंच्या प्रमाणात होत असलेली वाढ.

आपल्या पृथ्वीच्या सभोवताली निसर्गनिर्मित ओझोन वायूचा थर आहे. हा थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. हा थर सूर्यापासून येणारी ४९ टक्के सौरऊर्जा अडवितो. यामुळे फक्त ५१ टक्के सौरऊर्जा पृथ्वीवर पोहोचते. त्यातील ७० टक्के सौरऊर्जा पृथ्वीवर राहते आणि ३० टक्के सौरऊर्जा परत अंतराळात परावर्तित होते.

या ओझोनच्या थरामुळेच पृथ्वीचे प्रखर सौरऊर्जेपासून संरक्षण होते. ओझोन थराची अजून एक महत्त्वाची भूमिका म्हणजे सौर प्रकाशात असणारे अतिनील किरण जे सजीवांसाठी हानिकारक असतात. ती अडवली जातात. यामुळे संरक्षण मिळते. पण अलीकडील काही वर्षांपासून ओझोनचा थर विरळ होत आहे. तो विरळ झाल्याने ओझोनच्या थरास मोठे भगदाड पडले आहे.

याचे कारण आहे, माणसाकडून होणारा क्लोरोफ्लुरोकार्बनचा अति वापर. जो ओझोनचा थर नष्ट करतो. क्लोरोफ्लुरोकार्बनचा वापर, प्रामुख्याने वातानुकूलित उपकरणे, रेफ्रिजरेटर आणि विमानात केला जातो. अग्निशमन द्रव्ये, फोम, रेक्झिन व बॉडी स्प्रे यामध्येही वापर करतात.

आधुनिक सुखसोयीच्या जीवनशैलीत या सर्व उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, क्लोरोफ्लुरोकार्बनच्या उत्सर्जनात फार मोठी वाढ झाली आहे आणि तापमानवाढीचे संकट आपण ओढवून घेतले आहे. ओझोनचा थर नष्ट झाल्याने, सौरऊर्जा न अडता, थेट पृथ्वीवर येऊ लागली आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. सौर प्रकाशातील अतिनील किरणे विना अडथळा आता थेट पृथ्वीवर येऊ लागली आहेत.

हरितगृह वायू आणि जागतिक तापमानवाढ

जागतिक तापमानवाढीचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे हरितगृह वायूंच्या प्रमाणात झालेली वाढ. कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड्‍स या वायूंना ‘हरितगृह वायू’ असे म्हणतात. अलीकडील काळात या वायूंच्या उत्सर्जनात प्रचंड वाढ झाली आहे. कार्बन डायऑक्साइड हा वायू पेट्रोल, डिझेल, कोळसा, लाकूड, दगडी कोळसा यांच्या ज्वलनातून आणि सजीवांच्या श्‍वसनातून बाहेर पडतो.

अलीकडील काळात वाहने आणि कारखान्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये इंधनासाठी पेट्रोल, डिझेल, दगडी कोळसा, लाकूड यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. यामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वीपेक्षा ३३ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. जागतिक तापमानवाढीत एकट्या कार्बन डायऑक्साइडचा ७२ टक्के वाटा आहे.

हरितगृह वायूमधील दुसरा महत्त्वाचा वायू आहे मिथेन. कचरा कुजताना, जनावरांच्या शेणातून, रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या उच्छ्वासातून, भात शेतीतून, जिवाणूंच्या जैविक प्रक्रियेतून तसेच दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंच्या खाणीतून हा वायू बाहेर पडतो. या वायूचे प्रमाण पूर्वीपेक्षा आज १५१ ते १५४ टक्क्यांनी वाढले असून, जागतिक तापमानवाढीमध्ये याचा १८ टक्के वाटा आहे.

तिसरा हरितगृह वायू आहे, नायट्रस ऑक्साइड्‍स. हा वायू पेट्रोल, डिझेलच्या ज्वलनातून बाहेर पडतो. या वायूचे प्रमाण पूर्वीपेक्षा १७ टक्क्यांनी वाढले असून, जागतिक तापमानवाढीत या वायूचा ६ टक्के वाटा आहे. आपण उत्सर्जित केलेल्या या हरितगृह वायूंचा दाट थर पृथ्वीभोवती तयार झाला आहे. हा थर सौरऊर्जा जास्तीत जास्त शोषून घेऊन पृथ्वीवर पाठवितो.

पृथ्वीवरून परावर्तित होणारी सौरऊर्जा अडवितो. यामुळेच पृथ्वीचे तापमान वाढत आहे. गेल्या दहा हजार वर्षांपासून १९५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात ०.१ अंश सेल्सिअसच्यावर वाढ झाली नव्हती. पण गेल्या ७० वर्षांत जागतिक तापमानात १.५ ते १.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

शीत कटिबंध प्रदेशात असणाऱ्या युरोप खंडात तापमान ४० अंश सेल्सिअस, तर अमेरिका देशात ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. उष्ण कटिबंध प्रदेशातील देशांत तर तापमान ५८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. आपल्या देशातही थोड्या फरकाने तशीच स्थिती आहे.

२०३० पर्यंत जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, असा पूर्वीचा अंदाज होता. पण हा अंदाज खोटा ठरला असून, सन २०२० मध्येच, ही तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेली आहे. आपण याबाबत खबरदारी न घेतल्यास, योग्य उपाययोजना न केल्यास सन २१०० मध्ये तापमानवाढ ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचणार आहे.

हल्ली १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ झाली आहे, तर आपण अनेक संकटांनी त्रस्त झालो आहोत. जशी तापमानात वाढ होत जाईल, तसे आपणांस पृथ्वीवर जगणे असह्य होणार आहे. डॉ. स्टिफन हॉकिंग या थोर शास्त्रज्ञाने दहा वर्षांपूर्वीच असे भाकीत केले होते, की पुढील शंभर वर्षांपर्यंत मानव पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट होईल. कारण त्यास जगण्यासारखी स्थितीच पृथ्वीवर असणार नाही. असे असले तरी आपण हे विधान, हे भाकीत गांभिर्याने घेतलेले नाही.

समुद्र पातळीत वाढ

पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने, ध्रुव प्रदेशातील सर्व बर्फ, हिमनग वेगाने वितळून तेथील बर्फ संपण्याच्या मार्गावर आहे. ग्रीन लॅण्ड व हिमालय पर्वतावरील हिमनगही वेगाने वितळत आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आज समुद्राच्या पाण्याची पातळी ४० सें.मी. पर्यंत वाढली आहे.

पुढील काही वर्षांत ही ९० ते १२० सें.मी. पर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे पुढील ५० ते ७० वर्षांत पृथ्वीतलावरील २७ देश पाण्याखाली पूर्णपणे बुडणार आहेत. अनेक लहान-मोठी बेटे पाण्याखाली जाणार आहेत. उष्ण कटिबंधातील देशांना याचा सर्वांत जास्त धोका आहे.

मालदीव, बांगलादेश, मादागास्कर, मॉरिशस, श्रीलंका, जपान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड हे काही प्रमुख देश आहेत, जे पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत. भारतातील किनारी प्रदेशात असणारी अनेक गावे, शहरे यांनाही धोका आहे.

प्रामुख्याने मुंबई, चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम यांसारखी काही मोठी शहरे, गोवा, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप ही राज्ये समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने, धोकाग्रस्त बनली आहेत. मुंबईचा ३५ टक्के भूभाग पुढील ५ ते १० वर्षांत पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे.

पर्यावरणावर परिणाम

जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल झाले आहेत आणि होत आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. याबाबतचे अंदाज बांधणेही आता अशक्य बनले आहे. याचे दुष्परिणाम मानवी जीवन आणि जैवविविधतेवर प्रखरतेने होऊ लागले आहेत.

बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्रात मोठे बदल झाले आहेत. नैसर्गिक ऋतुमान बदलले आहे. उष्णतामान वाढले आहे. थंडीचे दिवस घटले आहेत. पूर्वी प्रत्येक ऋतूचे दिवस व कालावधी ठरलेला असे. आता वेळी-अवेळी कधीही पाऊस पडतो. हिवाळ्यातही प्रखर उकाडा जाणवतो. चक्रीवादळाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दोन-चार वर्षांत एखादे चक्रीवादळ येत असे. आता एका वर्षात चार-पाच चक्रीवादळे येत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण फार वाढले आहे. त्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. जगभरात अनेक ठिकाणी व आपल्या देशातही अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र पूर, महापुराचे प्रमाण वाढले आहे. अगदी वाळवंटी व कोरड्या प्रदेशांतही महापूर येऊ लागले आहेत. अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

पूर्वी ढगफुटीचे प्रमाण नगण्य होते, हिमालय पर्वतरांगापुरते मर्यादित होते. पण हल्ली ढगफुटीचे प्रमाण फार वाढले आहे. थोड्याच वेळेत, अगदी कमी कालावधीत, प्रचंड पाऊस पडतो. या प्रचंड पावसाला सामावून घेण्याची क्षमता आता जमिनीत राहिलेली नाही. यामुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. डोंगर व टेकड्या, त्यावर असणाऱ्या जंगलांसहित खाली येऊन भुईसपाट होऊ लागल्या आहेत.

अति उष्ण वर्षात वाढ

जागतिक तापमानवाढीमुळे उन्हाळा प्रखरपणे जाणवू लागला आहे. सन १९८० पासूनची सर्व वर्षे ‘उष्ण वर्षे’ म्हणूनच नोंदवली गेली आहेत. प्रत्येक वर्षी तापमानात वाढ होत असल्याने, प्रत्येक वर्ष ‘अति उष्ण वर्ष’ म्हणून गणले जात आहे.

बदलत्या हवामानामुळे वातावरणातही परस्पर विरोधी चित्र निर्माण होऊ लागल्याने, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर काही ठिकाणी पाऊसच न पडल्याने कोरडा दुष्काळ आणि तीव्र पाणी टंचाई अशी स्थिती आहे.

उष्णतामान वाढल्याने आणि अनियंत्रित बेसुमार पाणी उपशामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण घटत चालले आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षांत जग आणि भारतातील निम्म्या लोकसंख्येला पाणी व अन्न टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी पूर्वसूचना पर्यावरणतज्ज्ञांनी दिली आहे.

तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या ‘अल निनो’मुळे आपल्या मॉन्सूनवर परिणाम होतो. ज्या वर्षी अल निनो परिणाम जाणवतो, त्या वर्षी भारतात पाऊस कमी पडतो. कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होते.

बदलत्या हवामानामुळे थंडीचा कालावधी जरी कमी झाला असला तरी थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडीच्या तीव्र लाटांचे प्रमाण वाढले आहे. सन १९५० ते २०२० या काळात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.

Environment
Climate Change : बदलांकडे गांभिर्याने पाहा...

जैवविविधतेवरील परिणाम

जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळल्याने पेंग्वीन, सील, पांढरी अस्वले यांसारख्या बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने समुद्र किनाऱ्यालगतच्या जमिनी खारट बनल्याने त्या नापीक बनल्या आहेत. नापीक जमिनीचे प्रमाण वाढले आहे. तापमानवाढीमुळे निर्माण होणारी बहुतांश उष्णता समुद्र, महासागर शोषून घेतात. यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढू लागले आहे.

पाण्याचा खारटपणा कमी होऊन ते आम्लधर्मी बनू लागले आहे. तसेच पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे, या सर्व बदलांमुळे समुद्रातील जलचरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मासे व इतर सागरी जलचरांची संख्या कमी होऊ लागली आहे.

यामुळे मासेमारी उद्योग संकटात आला आहे. सागरी परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘फायटोफ्लॅक्टोन्स’. सागरी पाण्याचे गुणधर्म बदलल्याने फायटोफ्लॅक्टोन्सची संख्या व प्रमाण कमी झाल्याने त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्राणवायूच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे.

जिवाणूंच्या विविधतेवर परिणाम

तापमानवाढ आणि बदलत्या हवामानामुळे वनस्पतींच्या फुले-फळे येण्याच्या हंगामात, कालावधीत बदल होऊ लागले आहेत. बहावा, पळस, काटेसावर, गणेर, गुलमोहोर यांसारख्या वृक्षवर्गीय वनस्पतींना फुलांचा बहर नैसर्गिक नियोजित वेळेपेक्षा लवकर येत आहे.

डास, माश्‍या, झुरळ, मुंग्या यांसारख्या उपद्रवी कीटकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे कीटकजन्य आजार वेगाने फैलावू लागल्याने मनुष्य, जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. चिकुन गुनिया, स्वाइन फ्लू, मलेरिया, डेंगू, बर्ड फ्लू, यांसारख्या कीटकजन्य आजारांची व्याप्ती वाढत आहे.

जिवाणूंची विविधता, त्यांची संख्या आणि त्यांचे कार्य यावर तापमानवाढीमुळे विपरीत परिणाम होऊ लागले आहेत, असा गंभीर इशारा सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी दिला आहे. सजीव सृष्टी विकसित होण्यात आणि टिकविण्यात जिवाणूंचा सर्वांत मोठा वाटा आहे.

वनस्पतींचे पोषण, त्यांची अन्न बनविण्याची प्रक्रिया यापासून ते आपण खाल्लेले अन्न पचविण्यापर्यंतची प्रत्येक प्रक्रिया जिवाणूंशिवाय अशक्य आहे. तसेच कचरा, पालापाचोळा कुजविणे, जमिनीची सुपीकता वाढविणे या प्रक्रियाही जिवाणूंमुळेच होतात.

अशा महत्त्वपूर्ण जिवाणूंच्या नैसर्गिक कार्यातही तापमानवाढीमुळे बिघाड निर्माण होऊ लागले आहेत. अशा महत्त्वपूर्ण जिवाणूंचे कार्य बिघडणे म्हणजे मनुष्यासहित लाखो सजीव असणाऱ्या सजीव सृष्टीचा अंत हे त्रिवार सत्य आहे.

मानवी जीवनावर परिणाम

सौर प्रकाशातील अतिनील किरणांमुळे माणसांमध्ये त्वचेचा कर्करोग आणि मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण आणि लहान मुलांना मोतीबिंदू होऊ लागले आहेत. डोळ्यांची जळजळ वाढली आहे. नवीन जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये जैविक जनुकीय बदलांमुळे शारीरिक व मानसिक व्यंग विकृती, निर्माण होऊ लागल्या आहेत.

तापमानवाढीमुळे ध्रुव प्रदेशावरील बर्फ वितळल्याने वर्षानुवर्षे बर्फाखाली असलेले जिवाणू, विषाणू, बुरशी आणि मिथेनचे साठे मुक्त होऊ लागले आहेत. हे सर्व सूक्ष्मजीव, ज्ञात असलेल्या सूक्ष्मजीवांपेक्षा अनेक पटीने घातक असून, प्रचलित औषधांना दाद न देणारे आहेत.

यामुळे भविष्यकाळात माणसासमोर अतिगंभीर धोकादायक संकट उभे राहणार आहे. यामुळे विविध आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे आपण वेळीच सावध होऊन तापमानवाढ रोखणे आवश्यक आहे.

पक्ष्यांच्या जीवनावर परिणाम

आपल्याकडे विदेशातून आगमन व स्थलांतरित होण्याच्या पक्ष्यांच्या वेळेत बदल होत आहे. नाइट हैरॉन हा पक्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीस झाडांवर घरटी बांधण्यास सुरुवात करतो. पण गेल्या काही वर्षांपासून हे पक्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच झाडांवर घरटी बांधू लागली आहेत.

आपल्याकडून विदेशात स्थलांतरित होणारे पोपट मार्चच्या सुरुवातीस स्थलांतरित होत असत. पण हल्ली त्यांचे स्थलांतर कमी झाले आहे. तापमानवृद्धीमुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल होत आहेत.

Environment
Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

जागतिक आरोग्य आणीबाणी

जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर ७६ मोठ्या आरोग्य संघटनांनी गतवर्षीपासून “जागतिक आरोग्य आणीबाणी” जाहीर केली आहे. निसर्गाची सर्व कार्यपद्धती बिघडल्याने काय भयंकर घडेल, याचा अंदाजही न बांधू शकणाऱ्या जगात आपण प्रवेश केला आहे, असे जगातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे. यावरून संकट किती गंभीर आहे, हे लक्षात येते.

पाणी, शेती परिसंस्थेवर परिणाम

तापमानवृद्धीमुळे ऋतुचक्रात मोठे बदल होऊन चक्रीवादळे, ढगफुटी, पूर, महापूर, भूस्खलन, व अतिवृष्टी यामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ, तर दुसरीकडे पावसाच्या कमतरतेमुळे कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती आहे.

वाढत्या तापमानात पाण्याच्या अति गैरवापरामुळे, अमर्यादित पाण्याच्या उपशामुळे पाणीटंचाई जाणवू लागली. चेन्नई, बंगळूर, गाझियाबाद शहराच्या भूगर्भातील पाणी संपले आहे. अशीच परिस्थिती पुढील काही वर्षांतच पुणे, कोल्हापूरसारख्या इतर शहरांतही उद्‍भवणार आहे.

पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसेल तर शेतीसाठी पाणी कोठून आणणार, हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे भात पिकाच्या लागवडीचा काळ बदलत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भात पेरण्या पूर्ण होत असत. पण हल्ली हवामान बदलामुळे भात पेरणीचा कालावधी जुलैपर्यंत पुढे गेला आहे.

आपल्याकडे दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर थंडी पडण्यास सुरुवात होत असे. पण हवामान बदलामुळे थंडी सुरू होण्याचा कालावधी पुढे गेला आहे. या बदलांचा परिणाम आंबा, काजू तसेच रब्बी पिकांवर होत असल्याने घट होत आहे. पिकांच्या गुणवत्तेवरही परिणाम दिसून येत आहेत. हवामान बदलामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

अवेळी पडणाऱ्या पावसामुळे, ढगफुटीमुळे आणि गारपिटीमुळे पूर, महापुरामुळे फळबागा आणि हंगामी पिकांचे नुकसान होत आहे. तापमानवाढीमुळे उपद्रवी कीटकांची संख्या वाढत आहे.

यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होत असून, उत्पादन खर्च वाढत चालला आहे. वाळवी, हुमणी या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, आर्थिक नुकसान वाढले आहे. वाढणारे तापमान, वाळवीचे प्रजनन तसेच वाळवीच्या खाण्याचा वेग वाढवते, असे दिसून आले आहे.

जर तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले तर वाळवीची संख्या दीड पटीपेक्षा जास्त वाढते. तसेच वाळवीच्या वाढत्या प्रजननामुळे मिथेन वायूच्या उत्सर्जनातही वाढत होते, हे संशोधनाद्वारे सुस्पष्ट झाले आहे.

उष्ण हवामानात टोळांची उत्पत्ती अत्यंत वेगाने होते. राजस्थान, सिंध, गुजरात तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान यांसारख्या अति उष्ण प्रदेशात दरवर्षी टोळधाडीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. तापमानवाढीमुळे सर्वच ठिकाणी उष्णतामान वाढू लागल्याने टोळधाडीच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.

तापमानवृद्धी आणि हवामान बदलाचा जैवविविधतेवर परिणाम होऊ लागल्याने सजीवांच्या अनेक जाती, प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. मे-२०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील दहा लाख सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, नैसर्गिक अन्नसाखळी विस्कळीत होऊ लागली आहे. शेती उत्पादन, सागरी अन्न आणि सर्व जीवन धोक्यात आले आहे.

वाढत्या तापमानामुळे मधमाश्‍या व उपयुक्त मित्र किडींची संख्या कमी होत आहे. मधमाश्‍यांची संख्या कमी होत असल्याने, पिकांमध्ये बीज व फळधारणेचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. बदलत्या हवामानामुळे मधमाशांमध्ये ‘सॅक ब्रुड डिसिस’ ‘अमेरिकन फौल ब्रुड डिसिस’ यांसारखे रोग वाढत आहेत.

मेणावरील पतंग (वॅक्स वर्म) आणि कोळी कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मधमाश्‍यांच्या वसाहती वेगाने कमी होत आहेत. हवामान बदलामुळे २१०० पर्यंत जगातील निम्म्या लोकांना पाणी व अन्नटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

वनस्पतींच्या वाढीवर परिणाम

आजही आपली शेती मॉन्सूनवरच अवलंबून आहे. पूर्वी पाऊस वेळेवर, नियमित पडत होता. माणूस आणि निसर्ग यांच्यात समन्वय होता. जमिनीस वृक्षांचा, जंगलांचा आधार होता. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत होतं.

पण नंतरच्या काळात शेती, कारखानदारी, लोकसंख्येचे प्रमाण वाढले. जंगले-वने कमी झाली. तापमानात वाढ होऊ लागली. यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. भूगर्भातील पाण्याची पातळी घटली आणि कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या.

म्हणूनच आज तापमान वाढीबरोबर जलसंकटांनीही अनेक ठिकाणी गंभीर स्वरूप धारण केले आहे. पिकांची, वनस्पतींची प्रकाश संश्‍लेषण प्रक्रिया ४५ अंश सेल्सिअसनंतर मंदावण्यास सुरुवात होते.

वनस्पती व पिकांमध्ये अन्न निर्मिती करण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो. या कारणामुळे पीक उत्पादनात घट होऊ लागते. हवामान बदलामुळे यापुढे भारतातील शेती उत्पादन १८ टक्क्यांनी घटणार असल्याचा अहवाल अभ्यासकांनी दिला आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर, ९७३०३९९६६८

(लेखक कोल्हापूर येथील वनस्पती व पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com