Rural Healthcare Agrowon
संपादकीय

Snakebite Awareness: सर्पदंशावर उतारा

Save Farmers Lives: सर्पदंशावर प्रति सर्पविष हेच एक औषध असल्याने रुग्णाला तत्काळ जवळच्या दवाखान्यात नेणे हा एकमेव उपाय शेतकरी-शेतमजुरांनी लक्षात ठेवायला हवा.

विजय सुकळकर

Rural Healthcare Matters: गडचिरोली जिल्ह्यात शेतात काम करताना विषारी सापाच्या दंशाने एका शेतकऱ्याचा नुकताच मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात पेरणीपासून ते आंतरमशागत अशा कामांना वेग आलेला असतो. शेतात पिकांबरोबर तणही वाढलेले असते. पावसाळी हंगामात सापाची बिळे पाण्याने भरलेली असल्याने त्यांचा वावर वरच असतो. परिणामस्वरूप पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. रब्बी हंगामात भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यावे लागते. त्यामुळे हिवाळ्यातही सर्पदंश वाढले आहेत.

शेतकरी-शेतमजुरांचे सर्पदंशाने होणारे अपघाती मृत्यू हे दुर्दैवी आहेत. दुसरीकडे साप पिकांना नुकसानकारक उंदीर-घुशींसह इतरही किडेकिटूक खाऊन पीक संरक्षणात शेतकऱ्यांना हातभार लावत असल्याने त्याला शेतकऱ्यांचा मित्र मानतात. आता नागपंचमीचा सण पुढे आला आहे. या दिवशी वारुळासह नाग (साप) पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. साप डुख धरतो, नागाच्या डोक्यावर नागमणी असतो, सापाचे विष हे मंत्रातंत्राने उतरविता येते असे अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा सापाबाबत आहेत.

नाग, घोणस, फुरसे, मण्यार अशा काही मोजक्या सापांच्या जाती सोडल्या, तर इतर बहुतांश जाती बिनविषारी आहेत. अनेक वेळा बिनविषारी साप चावून केवळ घाबरून गेल्याने अथवा अघोरी उपाय केल्याने अनेकांचा जीव गेला आहे. याउलट विषारी साप चावल्यानंतर वेळेत योग्य शास्त्रीय प्रथमोपचार-उपचार झालेले अनेक रुग्ण वाचले देखील आहेत. सर्पदंशावर प्रति सर्पविष हेच एक औषध असल्याने बाकीचे उपाय करत वेळ घालवत बसण्यापेक्षा रुग्णाला तत्काळ जवळच्या दवाखान्यात नेणे हा एकमेव उपाय शेतकरी-शेतमजुरांनी लक्षात ठेवायला हवा.

काही वेळा विषारी साप चावल्यानंतर त्यासंबंधी उपचारासाठीचे इंजेक्शन तसेच इतर पूरक औषधे ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने देखील अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्पदंशाच्या घटना राज्यात वाढत असताना शास्त्रशुद्ध प्रथमोपचाराबाबत शेतकरी-शेतमजुरांना सजग करावे. त्याचबरोबर तालुका तसेच मोठ्या गावांच्या ठिकाणी असलेल्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशांवरचे औषध आणि अद्ययावत सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, ही काळजी घ्यायला हवी.

हे करीत असताना सर्पदंशाबाबतचे सर्व गैरसमज, अंधश्रद्धा याबाबत व्यापक प्रबोधनातून दूर करायला हव्यात. दिसला साप की मारण्यापेक्षा त्याला प्रशिक्षित सर्पमित्राच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचविता येईल, हे पाहावे. सर्पदंश कसा टाळायचा याचेही धडे शेतकरी-शेतमजुरांना द्यायला हवेत. नागपंचमीला सापांची पुजा करण्याची प्रथा असली तरी हळदी-कुंकवासह इतर पूजा साहित्याने सापाच्या त्वचेला इजा होतात. अशावेळी जिवंत सापांची पूजा करण्याऐवजी प्रतीकांची पूजा करून हा सण साजरा करू शकतो.

सर्पदंशाने शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून केवळ दोन लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळते. ही भरपाई तुटपुंजी आहे. वन्यजीव हल्ल्यात जखमी झालेली व्यक्ती आणि मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला अनुक्रमे पाच लाख आणि २५ लाख रुपये शासकीय मदत दिली जाते.

अशा प्रकारची मदत साप चावल्यानंतर मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला मिळावी, अशी शेतकरी-शेतमजुरांची मागणी आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण अपघाती मृत्यू हा वन्यप्राणी हल्ल्याने झालेला असो, की सर्पदंशाने - त्याचे परिणाम तर कुटुंबाला सारखेच भोगावे लागतात. अशावेळी सर्प हा वन्यजीव नाही म्हणून शासकीय मदत टाळणे उचित ठरत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT