Agriculture Agrowon
संपादकीय

आम्हीच अम्हास पुन्हा पाहावे!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते शताब्दीपर्यंतच्या प्रवासात आपल्याला लाभलेली एक अनुकूल गोष्ट म्हणजे ‘लोकसंख्या लाभांश’. मोठ्या संख्येने उपलब्ध होणाऱ्या तरुणवर्गाची शक्ती उत्पादकतावाढीसाठी वापरायची आहे.

टीम ॲग्रोवन

व्यक्ती असो, संस्था असो वा एखादा देश. एकूण वाटचालीत असा एखादा टप्पा येतो, की ज्या वेळी चिकित्सकपणे मागे वळून पाहायचे असते आणि पुढच्या प्रवासाची दिशाही ठरवायची असते. स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतासाठी हा असा टप्पा आहे. परकी राजवट आपण हटविली त्या वेळची परिस्थिती आणि आजची यांत महदंतर आहे. प्रत्यक्ष भूमी पादाक्रांत करून तिथे ठाण मांडणारा साम्राज्यवाद आता फारसा दिसत नसला तरी कुरघोडी करणे, दुसऱ्या देशाला दडपणे, त्याच्या साधनसंपत्तीवर डोळा ठेवणे, ती आपल्याकडेच एकवटावी यासाठी प्रयत्न करणे, माहितीयुद्ध करणे, कर्जवाटप करून देशांना अंकित करणे, परक्या भूमीवरील संघर्षांना चिथावणी देणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानातील क्रांतीने सामर्थ्यशाली अशी आयुधे पुढ्यात आणून ठेवल्याने त्यांचा वापर या अनिष्ट उद्दिष्टांसाठीही होत आहे.

म्हणजेच आजची आव्हाने वेगळी आणि गुंतागुंतीची आहेत. त्यातून देशाची नय्या सुखरूप बाहेर काढत राष्ट्रीय उद्दिष्टांचा मुक्काम गाठायचा आहे. त्यासाठी पहिली नि मूलभूत गोष्ट म्हणजे देश म्हणून आधी स्वतःला ओळखणे. एखाद्या देशाला त्याचा असा चेहरा प्राप्त होतो, तो परंपरेमुळे. प्राचीन संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या भारत देशासाठी गरज आहे ती या परंपरेकडे सजगपणे पुन्हा पाहण्याची. ‘जुने जाऊद्या मरणालागुनि’, असे म्हणताना कवीचा रोख जीर्ण झालेल्या कालबाह्य गोष्टी टाकून देण्याकडे आहे. पण कितीतरी विचार, तत्त्वे, आदर्श यांच्यात नित्यनूतन राहण्याची क्षमता असते. परंपरेतील अशा गोष्टींचा शोध घेणे, त्यातील मर्म जाणणे, या सगळ्याची कालानुरूप मांडणी करणे अशा मूलभूत वैचारिक आव्हानाला सामोरे जाण्याचा हा काळ आहे. त्याची एक चळवळच आकाराला यायला हवी. त्यातून राष्ट्रीय आत्मविश्‍वास जागा करता येईल. ‘आम्हीच आम्हास पुन्हा पाहावे, काढुनि डोळ्यावरला चष्मा’, हे वाटते तेवढे सोपे नाही. पण ते करावे लागेल. देशातील तमाम नागरिकांचे एक कर्तव्य आणि हक्क म्हणून याकडे पाहिले पाहिजे. भारतीयांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीशी याचा संबंध आहे.

या दोन्ही बाबतींत गेल्या पंचाहत्तर वर्षांत आपण काहीच साध्य केले नाही, असे म्हणणे स्वतःवरच अन्याय केल्यासारखे होईल. पण जे साधले, त्या पलीकडे खूप काही राहिलेही आहे. एकीकडे आर्थिक समृद्धीची बेटे तयार झाली असली, तरी वंचिततेचे वाळवंटही समोर पसरलेले दिसते. ही दरी सांधणे सोपे नसले तरी ते एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्दिष्ट मानले पाहिजे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न असो अथवा आर्थिक महासत्ता बनण्याचे. त्यासाठीची पूर्वअट म्हणजे रोजगारनिर्मिती, असे म्हणावे लागेल.

त्यासाठी कल्पक नि व्यापक उपाययोजना करावी लागेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते शताब्दीपर्यंतच्या प्रवासात आपल्याला लाभलेली एक अनुकूल गोष्ट म्हणजे ‘लोकसंख्या लाभांश’. मोठ्या संख्येने उपलब्ध होणाऱ्या तरुणवर्गाची शक्ती नवनिर्मितीसाठी, उत्पादकतावाढीसाठी वापरायची आहे. नितांत गरज आहे ती त्यासाठीच्या योजकतेची. असा योजक तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा समाजात सलोखा असेल. नवनिर्माणासाठी ‘विचारकलह’ हवा, पण सध्या आपल्याकडे सुरू आहेत ते विचारांपेक्षा विकारांनी माजलेले कलह. राष्ट्रीय ऐक्यभावनेतील हा अडसर दूर करण्यासाठीही प्रयत्नांची गरज आहे. कधीतरी लख्खन वीज चमकून जावी, तसे भारतीयांचे यश

जागतिक क्षितिजावर उमटून जाते, हे अनेक वेळा आपण अनुभवले आहे. जगानेही त्याला दाद दिली आहे. परंतु अशा गोष्टी अपवादभुत न राहता तो नियमच व्हायला हवा. थोडक्यात, अशी शिखरे गाठणे हे या देशाच्या अंगवळणी पडायला हवे. तसे भव्य स्वप्न स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जागेपणी पाहूया आणि तेवढ्याच डोळसपणे ते साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT