Farm Pond Agrowon
संपादकीय

Farm Pond Accident : उशिरा सुचलेले शहाणपण

विजय सुकळकर

Indian Agriculture : शेततळ्यात बुडून अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर जागे झालेल्या कृषी विभागाने त्यातील दुर्घटना रोखण्यासाठीच्या चार उपाययोजना नुकत्याच स्वीकारल्या आहेत. खरे तर हे राज्य शासनासह कृषी विभागाला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना प्लॅस्टिक आच्छादित शेततळ्यांत घडल्या आहेत. शेततळ्यातील प्लॅस्टिक सतत पाणी साचून असल्यामुळे शेवाळते, शिवाय अशा शेततळ्यात कडेला धरण्यास, वर चढण्यास काहीही आधार नसतो.

त्यामुळे चांगले पोहणारे देखील वर चढू शकत नसल्यामुळे शेततळ्यातील पाण्यात बुडून मरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक आच्छादित शेततळे आले तेव्हापासूनच यात बुडून मृत्यू होण्याचे धोके लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते.

एवढेच नाही तर यातील पहिल्या एक-दोन दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या असत्या, त्या शेततळे करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या असत्या, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते. परंतु आपल्या देशात, राज्यात दुर्घटना रोखण्यासाठी त्यात आधी काही लोकांचे जीव जावे लागतात त्यानंतर मग शासन-प्रशासनाला जाग येते. शेततळ्यांतील मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाय योजनांबाबतही तसेच घडले आहे.

अलीकडे शेततळ्यांत बुडून मरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले होते. मागील वर्षभरात जालना, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यांत शेततळ्यात बुडून तब्बल २१ जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये शाळकरी मुलांसह सख्या भावाबहिणींची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील हा मृतांचा आकडा नोंद झालेला आहे. याशिवाय राज्यभर इतरही अनेक जणांचे मृत्यू शेततळ्यात बुडून झालेले असून त्यांची कुठे नोंददेखील झालेली नाही.

राज्य शासनाची मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना आहे. शिवाय मागेल त्याला शेततळे, शेत तिथे शेततळे या संकल्पनेतूनही राज्यात झपाट्याने शेततळे करण्याचे काम सुरू आहे. कारण पावसात अनियमिततेचे प्रमाण वाढले आहे. कमी पाऊसमान काळात उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवतेच, शिवाय पावसाळ्यात पावसाचे खंड पडण्याचे प्रमाण वाढत आहे.

अशावेळी अनेक शेतकरी शेततळे करून खरीप हंगामातील पिके संरक्षित सिंचनाने वाचविण्याबरोबर वर्षभर नियमित सिंचनाद्वारे दुष्काळी भागात फळे-भाजीपाल्याचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेत निधीसह इतरही अनेक अडचणी असताना राज्यात आतापर्यंत दीड लाख शेततळी झाली आहेत.

पिकांना जीवदान देऊन शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारे प्लॅस्टिक आच्छादित शेततळे काही जणांसाठी मात्र मृत्यूचे सापळे ठरले आहेत. शेततळ्यात पडून मृत्यूचे प्रमाण वाढत असताना जुन्नर येथील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने दुर्घटना रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत कृषी आयुक्तालयाकडे दोनदा पत्रव्यवहार केला.

‘ॲग्रोवन’ने देखील सातत्याने हा विषय लावून धरल्यावर शेवटी उशिरा का होईना कृषीच्या मृद्संधारण विभागाने शेततळ्यातील दुर्घटना रोखण्यासाठीचे उपाय स्वीकारले आहेत. मृद्‍संधारण विभागाच्या संचालकांनी तसे परिपत्रक सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

जलतरण तलावात वापरल्या जाणाऱ्या ट्यूब शेततळ्याच्या आकारानुसार त्यात ठेवाव्यात, शेततळ्याच्या चारही बाजूंनी गाठी मारलेले दोरखंड लावावे, प्लॅस्टिक कागदावर पाण्याच्या उताराच्या बाजूने दोरखंडाची चौकोनी जाळी लावावी, शेततळ्याच्या चारही दिशेने लाइफ जॅकेट कायमस्वरूपी ठेवावे अशा या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहज करता येणाऱ्या उपाययोजना आहेत.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन करीत मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, हे पाहावे. असे झाल्यास राज्यात शेततळ्यात बुडून मृत्यूच्या दुर्घटना थांबायला वेळ लागणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT