Jal Jeevan Mission Agrowon
संपादकीय

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशन ः उपाय एक, लाभ अनेक

Pure water Supply : ‘जल जीवन मिशन’मुळे शुद्ध पाणी लोकांना उपलब्ध झाल्याने त्यांचे अनेक आजारांपासून संरक्षण झाले आहे. शुद्ध पाणी उपलब्ध झाले तर आरोग्य चांगले राहून उत्पादकता वाढ, आर्थिक उन्नती आणि सर्वांगीण प्रगती साध्य होते. जल जीवन मिशनमुळे हे सिद्ध होत आहे.

Team Agrowon

सुरेश कोडीतकर

Har Ghar Jal : ‘जल जीवन मिशन’मुळे शुद्ध पाणी लोकांना उपलब्ध झाल्याने त्यांचे अनेक आजारांपासून संरक्षण झाले आहे. शुद्ध पाणी उपलब्ध झाले तर आरोग्य चांगले राहून उत्पादकता वाढ, आर्थिक उन्नती आणि सर्वांगीण प्रगती साध्य होते. जल जीवन मिशनमुळे हे सिद्ध होत आहे.
...............
केंद्र सरकारने २०१६ मध्ये सुरू केलेल्या ‘राष्ट्रीय जल जीवन मिशन’चे लक्ष्य हे ग्रामीण भारतातील १९०.४० दशलक्ष घरांना बंद नळाद्वारे पुरेसे स्वच्छ पाणी पुरवणे हे आहे. आता साडेचार वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना देशातील ६२.८४ टक्के ग्रामीण भागातील घरांना नळजोड देण्यात आले असल्याचे अधिकृत वृत्त आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला जल जीवन मिशनचा अभ्यास करून आरोग्य सुधारणा आणि त्या अनुषंगाने संबंधित आर्थिक बचत यांची पडताळणी करण्याची विनंती केली होती. त्या अभ्यासाचे निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहेत. जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भारतात घरोघरी शुद्ध पाणी मिळाल्याने अतिसार या आजारामुळे होणारे संभाव्य चार लाख मृत्यू टाळले जाणार आहेत. ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधोपचार, आरोग्यसेवा यावर खर्च होतो. कामधंदा करता येत नाही. व्यक्ती मृत्युमुखी पडली तर संपूर्ण कुटुंब कोलमडून जाते. जल जीवन मिशनमुळे शुद्ध पाणी लोकांना उपलब्ध झाल्याने त्यांचे अनेक आजारांपासून संरक्षण झाले आहे.

शुद्ध पाण्यामुळे जुलाब, उलटी, विषमज्वर, कावीळ, हगवण हे आजार होतात. संपूर्ण देशभर दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक अक्षमतेमुळे आजारी लोकसंख्येची सरासरी १४ दशलक्ष आयुष्य वर्षे (एक आयुष्य वर्ष म्हणजे प्रतिव्यक्ती सकल घरगुती उत्पन्नाच्या तिप्पट रक्कम) वाया जातात. आजार आणि उपचार यामुळे वाया जाणारे संभाव्य उत्पादक दिवस आणि पैसा याचा १४ दशलक्ष आयुष्य वर्षे या संदर्भात अभ्यास केला तर जल जीवन मिशनमुळे १०१ अब्ज म्हणजे एक लक्ष आणि शंभर कोटी रुपयांची बचत झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जल जीवन मिशनच्या केलेल्या अभ्यासाचा हा निष्कर्ष ग्रामीण भारतात होणारा महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित करणारा आहे. टंचाई काळात पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागते. पाण्यासाठी त्यांचे अनेक मनुष्यतास वाया जातात. पाण्याचा भार महिलांनीच वाहायचा ही आपल्या येथील पद्धत आहे. परंतु जाता जल जीवन मिशनच्या घरोघरी नळ यामुळे संपूर्ण देशभरातील महिलांचे मिळून एका दिवसात वाया जाणारे सरासरी ६६.६ दशलक्ष मनुष्य तास वाचणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्यसह संनियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख रिचई जॉनस्टन यांनी जल जीवन मिशनच्या या अभ्यासाचे निष्कर्ष सादर करताना, जगाला पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रातील शाश्‍वत विकासाची उद्दिष्ट गाठणे हे केवळ भारतामुळे शक्य होणार आहे, असे गौरवोद्‍गार काढले आहेत. त्याची दोन प्रमुख कारणे त्यांनी विशद केली आहेत. त्यातील पहिले कारण आहे ते म्हणजे भारताची लोकसंख्या खूप जास्त असल्याने इथे जे घडून येते ते जगासाठी दखलपात्र असते. आणि दुसरे म्हणजे भारताने जे निश्‍चित केले ते सप्रयोग शक्य करून दाखवले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख संचालक डॉ. राजीव बहल यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या जल जीवन मिशनच्या अभ्यासाचे निष्कर्ष कौतुकास्पद असल्याचे म्हणाले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घरोघरी स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठ्याचे समग्र लाभाचे अनुमान अभ्यासणे, हे अद्याप पूर्ण होणे आहे. कारण शुद्ध आणि शाश्‍वत पाणीपुरवठ्याचे लाभ हे केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत. जलजन्य आजार हे शुद्ध पाणीपुरवठ्यामुळे रोखले जाणार आहेत. यामुळे कुपोषणसुद्धा रोखण्यास मदत होणार आहे. अशुद्ध पाणी, कमी पाणी यामुळे स्वच्छतेच्या अपुऱ्या सोयी आणि अनारोग्याला निमंत्रण मिळते. जल जीवन मिशनमुळे हे टाळले जाईल, त्याचे अप्रत्यक्ष लाभही होतील.

भारताच्या ग्रामीण भागात अधिकांश आजार हे पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित बाबींमुळे होतात, हे जाणून जागतिक आरोग्य संघटनेने अतिसार या आजारावर लक्ष केंद्रित केले होते. देशाच्या १२ नदी खोऱ्यांतील ८२० दशलक्ष लोकांना उच्च ते तीव्र अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, असे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठीचा संघर्ष हा ग्रामीण भारताला नवा नाही. राष्ट्रीय नमुना पाहणी संस्थेच्या माहितीनुसार पाणी मिळविण्यासाठी झारखंडमध्ये महिलांचे सरासरी ४० मिनिटे, बिहारमध्ये ३३ मिनिटे आणि ग्रामीण महाराष्ट्रात २४ मिनिटे खर्ची पडतात. म्हणजेच देशातील ग्रामीण महिलेचे सरासरी ४५.५ मिनिटे ही पाणी मिळविण्यासाठी वाया जातात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१८ मध्ये देशातील एकूण ३६ टक्के लोकसंख्या (४४ टक्के ग्रामीण लोकसंख्येसह) ही सुलभ पिण्याच्या पाणी स्रोतांपासून वंचित आहे. हे चित्र बदलण्यासाठी नळाद्वारे शाश्‍वत शुद्ध पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करणे अगत्याचे होते. जल जीवन मिशन त्यामुळेच आले आहे.

देशात ग्रामीण घरगुती नळ जोड टक्केवारी ही २०१९ मध्ये फक्त १६.६४ होती जी २०२३ च्या मे महिन्यापर्यंत ६२.८४ झाली आहे. म्हणजेच वार्षिक सरासरी वाढ ही १३.५ टक्के झाली आहे. आता डिसेंबर २०२३ पर्यंत ही टक्केवारी ८० टक्के होईल असे अनुमान आहे. कारण योजनांची महत्त्वाची उपांगे उभारून झाली, की वितरण व्यवस्था अंथरून घरगुती नळजोड करणे हे सोपे काम असते. त्यामुळे ही टक्केवारी २०२४ पर्यंत वाढणार आहे, हे निश्‍चित! ग्रामीण भागात जन जीवन मिशन घरोघरी शुद्ध पाणी पोहोचवत असताना लाभार्थ्यांनी ही संपूर्ण यंत्रणा सांभाळणे, टिकवणे अपेक्षित आहे. अन्यथा, यापूर्वीच्या इतर योजनांप्रमाणे जल जीवन मिशनची वासलात लागायला वेळ लागणार नाही.

पाणी म्हणजे जीवन. पाणी मिळविण्यासाठी करावे लागणारे कष्ट सोसावे लागणारी पीडा, वाया जाणारे अर्थ आणि आयुष्य याची गणतीच नाही. पाण्याचे मोल आपण जाणले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ‘उदक राखावे युक्तीने’ असे सांगितले आहे. आपण ते सुगम्यपणे आचरणात आणत नाही. परिणामी, पाण्याचे दुर्भिक्ष आणि अवर्षण, टंचाई हे आपल्या वाट्याला येते. स्वातंत्र्योत्तर काळापासून पाण्यासारखे पैसे खर्च करूनही ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा झाला नसल्याने ते जनतेची उत्पादकता क्रयशक्ती आणि आरोग्य यावर परिणाम करणारे ठरले आहे. शुद्ध पाण्यासाठी मेहनत फुकट खर्ची पडते आणि अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. या परिस्थितीत ग्रामीण भाग भरकटून निघत आहे. जल जीवन मिशनमुळे आता त्याला स्थिरता लाभेल. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासाचा तोच अन्वयार्थ आहे. पाण्यासाठी स्थलांतर आणि युद्ध, यानंतर हवामान बदलामुळे पाणी उपलब्धतेवर परिणाम हे संकट उभे ठाकले आहे. ते वेळीच ओळखून उपाययोजना नाही केली तर ते पुढील पिढ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे.


सुरेश कोडीतकर, ९५४५५२५३७५
(लेखक पाणीपुरवठा क्षेत्राचे अभ्यासक असून, मुक्त पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT