Forest Fire  Agrowon
संपादकीय

Forest Fire In Maharashtra : वणव्याच्या झळा कशा आटोक्यात आणायच्या?

पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी.

Team Agrowon

Satara Forest Fire : दिनांक ३१ मार्चच्या ॲग्रोवनमध्ये सातारा जिल्ह्यातील सांगवी तर्फ मेढा येथील वाघाची जाळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंगलाला वणवा लागून हा निसर्गरम्य आणि विपुल जैवसंपदा असलेला परिसर धुराने भरून गेल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले.

या छायाचित्रातून वणव्यामुळे या जंगल परिसराची झालेली हानी स्पष्ट होते. फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्याच्या काळात वणवे लागतात. या दिवसांत बहुतांश वन कुरणे वाळलेली असतात. जंगलांतील झाडांची पानझड झालेली असते.

वाळलेला पालापाचोळा सर्वत्र पसरलेला असतो. मार्च- एप्रिलमध्ये जोरदार वारे- वावटळीचे प्रमाण अधिक असते. अशा वातावरणात एका ठिणगीचे रूपांतर वणव्यात होते. या वणव्यात चराऊ कुरणे, जंगलातील साग, साल, खैर, बांबू आदी मौल्यवान वनवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होते.

वन्य जीव, पशुपक्षीही वणव्यातून आपले प्राण वाचवू शकत नाहीत. एवढेच नव्हे, डोंगर उतारावर केली जाणारी शेती, जंगलालगतच्या जमिनीला वणव्याच्या झळा बसतात. शेतातील पिके, फळझाडे, गोठ्यातील जनावरे वणव्याच्या आगीत होरपळतात.

त्यामुळे वनांच्या बरोबरीने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अनेक ठिकाणी वणव्यामुळे जंगल क्षेत्र घटले आहे. वणव्यामधून बाहेर पडणाऱ्या कार्बनडाय ऑक्साइडसह इतरही घातक वायुमुळे पर्यावरण प्रदूषण वाढते.

वणवे पेटण्याची कारणे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आहेत. नैसर्गिकरीत्या जंगलाला आग लागण्याचे प्रमाण केवळ १५ टक्के आहे, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण ८५ टक्के आहे.

जोराच्या वादळात झाडांच्या फांद्याचे एकमेकांना घर्षण होऊन अथवा वीज पडून नैसर्गिकरीत्या वणवा लागतो. अलीकडे जागतिक तापमानवाढीने देखील वणवे लागत आहेत. असे असले तरी बहुतांश वणवे हे मानवाच्या चुकीमुळे लागतात अथवा जाणीवपूर्वक लावले जातात.

गवताळ कुरणे पेटवून दिल्याने पुढे त्यात चांगले गवत येते, अशी एक चुकीची धारणा आहे, त्यातून जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. जंगलात शेळ्या- मेंढ्या, गुरे- ढोरे चारणारे गुराखी, पर्यटक, जंगलातील वाटसरू यांनी फेकलेल्या विडी- सिगरेटच्या थोटकावरून वणवे लागण्याचे प्रमाणही राज्यात अधिक आहे.

एवढेच नव्हे तर जंगलमाफीयांकडूनही मुद्दाम आगी लावल्या जातात. वणवा विझल्यानंतर त्यातील झाडांची तस्करी करणे, वनातील जागा बळकावणे हा जंगलमाफीयांचा वणवे लावण्यामागचा उद्देश असतो.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलांचे प्रमाण हे ३३ टक्के असावे लागते. आपल्याकडे हे प्रमाण जेमतेम २० टक्के आहे. दुसऱ्या बाजूला वाढते औद्योगीकरण, शहरीकरण त्याचबरोबरीने डोंगरउतारावर वाढलेले शेतीचे प्रमाण यातून एकूण जंगलक्षेत्रात घट होत आहे.

अशावेळी चुकीने किंवा अनवधानाने लागलेल्या वणव्यातून होत असलेल्या जंगलाचा नाश आपल्याला थांबवावाच लागेल. पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी.

वणव्याबाबत असलेल्या चुकीच्या धारणांबाबत शेतकरी, पशुपालक यांचे प्रबोधन वाढवावे लागेल. असे केल्यास वणवे लावण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. चोरी-तस्करीसाठी जाणीवपूर्वक लावण्यात येत असलेल्या वणव्यांबाबत मात्र संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजेत.

याकरिता वनविभागाने पुढाकार घ्यायला हवा. राज्यात प्रत्येक वनक्षेत्राचा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपायांवर आधारित सुधारित आग संरक्षण आराखडा तयार करायला हवा. याकरिता स्थानिक लोकांची सुद्धा मदत घ्यायला हवी.

अशा आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून वणव्याचे प्रमाण घटू शकते. आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या युगात आपण आहोत. अशावेळी आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे राज्यातील प्रत्येक वनक्षेत्रात उभारून कमी खर्चात आगीची माहिती तत्काळ मिळवून ती लगेच आटोक्यात आणली जाऊ शकते. असे केल्याने वणव्यात भस्म होणारी जैवविविधता आपण वाचवू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT