Agriculture Development  Agrowon
संपादकीय

Artificial Intelligence : भवितव्य कृत्रिम बुद्धिमत्तेचे!

विजय सुकळकर

Agriculture Development : कापूस या पिकात गुलाबी बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता या किडीचे सर्वेक्षण, निरीक्षण, विश्लेषण आणि नियंत्रणासाठी पहिल्यांदाच ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर पंजाब राज्यात करण्यात येत आहे. याद्वारे गुलाबी बोंड अळीचा शेतात नेमका कधी, किती प्रमाणात प्रादुर्भाव झाला याची अचूक नोंद घेऊन प्रभावी प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रणात्मक उपाय योजना करता येतील.

आपल्या देशात थोड्या उशिराने का होईना पण शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर संशोधन सुरू झाले आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणक, मोबाईल किंवा मशीनला स्वतःचे नियोजन आणि समोर आलेल्या समस्यांची उकल करून एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून समस्या सोडविण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानसाचा मेंदू जसा आणि जितका विचार करेल, तसा मशीनने करणे किंबहुना मानवी मेंदूला न झेपणारे किचकट गणिती प्रश्न सोडवणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! त्यामुळे पुढील काळात शेतीची मशागत, पेरणी, आंतरमशागत, मातीतील ओलावा लक्षात घेऊन पिकांना अगदी गरजेपुरतेच पाणी देणे, मातीतील तसेच पानांतील अन्नद्रव्यांचे विश्लेषण करून आवश्यक तेवढ्याच अन्नद्रव्याचा पुरवठा,

अचूक कीड-रोग निदान करून उपाययोजना, कापसाची वेचणी, फळे-भाजपाल्यासह इतरही पिकांची काढणी-मळणी ही सर्व कामे यंत्रमानवाद्वारे झाली तर नवल वाटायला नको. यातील काही कामे तर सध्याही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून आत्ताही होताहेत. एवढेच नाही तर हवामानाच्या अचूक अंदाजातून म्हणजे कोणत्या गावात, कधी, किती पाऊस पडेल हे सांगता येईल.

अशा प्रकारच्या तंत्रज्ञान वापराने निविष्ठांचा अगदी काटेकोर वापर होत असल्याने मातीचा पोत कायम राहून उत्पादकता वाढीस हातभार लागणार आहे. पिकांचे नुकसान टाळता येईल. शेतीत मजूर टंचाई जाणवतेय, असे पुढील पाच-दहा वर्षांत कोणी म्हणणार नाही. हे सर्व स्वप्नवत वाटत असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे वास्तवात उतरणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत सध्या वापर थोडा महाग वाटत असला तरी जसजसे यात संशोधन होईल, तंत्रज्ञान वापर वाढेल, तसतसे हे तंत्र शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होईल. असे असले तरी आपल्या देशात उद्योग-व्यवसाय-सेवा-वैद्यकीय-अभियांत्रिकी या क्षेत्राच्या तुलनेत शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन कमी आहे.

सेन्सॉर बसविलेली एपीआय बग्गी म्हणजे अॅटोनॉमस प्लॅन्ट इन्सपेक्शन प्रणाली असलेली बग्गी शेतात सोडून रोपांना धक्का न लावता तण, माती, पाने यांची तपासणी करणारी यंत्रणा डेन्मार्कमध्ये मागील पाच वर्षांपासून काम करते आहे. अमेरिकेसह इतरही प्रगत देशांत स्ट्रॉबेरी, द्राक्षे, सफरचंदांच्या बागांमध्ये स्वतःहून फळतोडणी करणारे रोबोट्स आलेले आहेत.

आपल्यालाही शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेची गती आणि व्याप्ती वाढवावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र अवलंबण्यास सर्वांत जास्त क्षमता शेतीमध्ये आहे. भारतीय शेती तर अनेक प्रकारे केली जात असून त्यात वैविध्यता खूप आहे. ह्या सर्व क्षमता लक्षात घेऊन देशात कृत्रिम बुद्धिमत्तेत संशोधन आणि प्रत्यक्ष तंत्रज्ञान वापर वाढवावा लागेल. पुढील काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा असल्याने याला डावलून आपल्याला पुढे जाताच येणार नाही.

हे लक्षात घेऊनच ‘आयसीएआर’कडे शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेत शेतीच्या वापरासंबंधीच्या स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव आहे. या संशोधन केंद्राला तत्काळ मंजुरी मिळून ते कार्यरत झाले पाहिजेत. देशातील प्रत्येक कृषी विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधनासाठी स्वतंत्र केंद्राची स्थापना झाली पाहिजेत. कृषी यांत्रिकीकरणासारखे कृत्रिम बुद्धिमत्तेचे होऊ नये. कृत्रिम बुद्धिमत्तेत पूर्णपणे देशी संशोधन आणि त्यावर आधारीत यंत्रमानव देशात विकसित झाले तरच त्याचा या देशातील शेतकऱ्यांना अधिक लाभ होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमधील वाढ कायम

Crop Insurance : पीकविम्याच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

Vegetables Rate : कांदा सत्तरीत, तर बटाटा चाळिशीत, कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलचेल

Rakesh Tikait : राकेश टिकैत सोयाबीन आंदोलनात सहभागी, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठी हा संघर्ष...

Dharshiv DCC Bank : दोन लाख शेतकऱ्यांना सभासद करून घेणार

SCROLL FOR NEXT