Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Modern Agriculture : सीमोल्लंघन शेतकऱ्यांचे!

शेतकऱ्यांनी शेताच्या सीमा ओलांडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन-प्रक्रिया, तसेच थेट विक्री व्यवस्थेत उतरायला हवे. हे त्यांचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असणार आहे.

टीम ॲग्रोवन

आज दसरा... नवरात्रीच्या नऊ शक्तिरूपांची केलेली आराधना विनम्रपणे आत्मसात करण्याचा हा दिवस. पूर्वापार काळापासून या दिवसाला विजयाची साक्षही लाभल्याने याला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात. आजही दसऱ्याला आवर्जून सीमोल्लंघन केले जाते. शमी वृक्षाचे पूजन केले जाते, आपट्याची पाने सोने म्हणून लुटली जातात. पूर्वी दसऱ्याला शस्त्रपूजन करून स्वाऱ्या लढण्यासाठी बाहेर पडायचे.

आज लढाया, स्वाऱ्यांची प्रथा नाही... मग सीमोल्लंघन कशाचे, असा अनेकांना प्रश्‍न पडू शकतो. ‘दृष्ट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय’ हा या सणामागचा मूलभूत विचार स्मरणात ठेवल्यास आजही आपल्याला अनेक गोष्टीचे सीमोल्लंघन करता येते. कालबाह्य होत असलेली एकत्र कुटुंब पद्धती, माणसामाणसांतील तुटत चाललेला संवाद, वाढती सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, नव्या पिढीतील जीवघेणी स्पर्धा, वाढती निरक्षरता, जातीयवाद, धर्मांधता, व्यसनांधता भ्रष्टाचार अशी आताही सीमोल्लंघनाची यादी कितीतरी मोठी होऊ शकते.

भारतीय संस्कृतीत शेती आणि सण यांचा फार जवळचा संबंध आहे. नवरात्र तसेच विजयादशमी हा खरेतर शेतीमधील संक्रमण काळ म्हणता येईल. वर्षा ऋतूतून शरद ऋतूत प्रवेश होतो. पाऊस कमी होऊन थंडीची चाहूल लागू लागते. खरीप पिकांची काढणी तसेच रब्बीच्या पेरणीची लगबग याच काळात चाललेली असते. अत्यंत व्यस्त अशा काळातही शेतकरी वेळ काढून विजयादशमी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.

नवरात्रीच्या घटस्थापनेला अधात्माबरोबरच विज्ञानाची देखील जोड आहे. पारंपरिक पिके, त्यांचे बियाणे संवर्धनाबरोबर घटस्थापनेतून बियाण्यांची उगवणक्षमता तपासणीचे काम केले जाते. यातून रब्बीमध्ये कोणती पिके घ्यायची, त्यांचे वाण, बियाणे कोणते वापरायचे याचा एकप्रकारे संदेश शेतकऱ्यांना मिळतो. शस्त्रपूजनाऐवजी आता आधुनिक शस्त्रांचे, अर्थात शेतीत वापरली जाणारी यंत्रे-अवजारे, तसेच सर्व लोखंडी साहित्य यांची पूजा करून त्यांना रब्बी पेरणीसाठी सज्ज केले जाते.

आज आपण पाहतोय शेती करणे खूपच कष्टदायक आणि खर्चीक झाले आहे. कष्ट, खर्च करूनही हाती काही पडेल की नाही, याची देखील शाश्‍वती नाही. असे असले तरी अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच असल्यामुळे त्यांना ती करावीच लागते. शेतीत उत्पादकता वाढीसाठी बराच वाव आहे, त्यासाठी प्रयत्न हे झालेच पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन शेतीत पिकवायचे अन् खेडा खरेदीत शेतातच किंवा गावातील व्यापाऱ्यांना अंगणातच विकायचे, या मानसिकतेतून शेतकऱ्यांना बाहेर पडावे लागेल.

खेडा खरेदी असो, की बाजार समितीत जाऊन शेतीमाल विक्री असो, यांत शेतकऱ्यांची प्रचंड लूट होते. शेतीत चार-सहा महिने कष्ट करून शेतकरी जेवढे कमवत नाही, त्यापेक्षा अधिक व्यापारी शेतीमाल खरेदी-प्रक्रियेतून कमावतात. शेतीमालाची प्रक्रिया आणि विक्रीत शेतकरी वाटेकरी नसल्यामुळे यातील नफ्याचा मोठा हिस्सा त्यांच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या सीमा ओलांडून उत्पादित मालाचे मूल्यवर्धन-प्रक्रिया तसेच थेट विक्री व्यवस्थेत उतरायला हवे. हे त्यांचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असणार आहे. शेतीपूरक व्यवसायाबाबतही असेच सीमोल्लंघन अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, थेट विक्रीत उतरायला पाहिजे, हे सोपे काम नक्कीच नाही. परंतु शेतकरी एकत्र आले तर ते हे सहज करू शकतात, हेही तेवढेच खरे आहे. शेतीत छुपी बेरोजगारी खूप आहे. अशा छुप्या बेरोजगारांनी (खासकरून शेतकऱ्यांची तरुण पिढी) शेतीतून बाहेर पडून शेतीमाल प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन सांभाळावे. आपल्या क्षमता वाढवणे, कामाचा-विचारांचा परीघ वाढवणे असाही सीमोल्लंघनाचा अर्थ शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. य-्थाने शेतकऱ्यांना सीमोल्लंघनाच्या नवनव्या वाटा सापडतील. आजच्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शेतीतील या नव्या वाटा शोधून त्यावर मार्गक्रमणाचा संकल्प करूया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT