Fall Armyworm in Crop: राज्यात सध्या सततचे ढगाळ वातावरण आणि पावसाची उघडझाप सुरू आहे. असे वातावरण प्रामुख्याने अळीवर्गीय किडींच्या प्रादुर्भावासाठी फारच पोषक मानले जाते. मराठवाड्यातील मका लागवडीत आघाडीवरच्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांत मका पिकावर लष्करी अळीने हमला केला आहे. मका पीक लहान असताना पाऊस पडून उघडल्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो. मका पिकाची वाढ जसजशी होत जाईल, तसा या किडीचा प्रादुर्भावही वाढत जातो.
शिवाय नियंत्रणासाठी अत्यंत कठीण ही कीड असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे २०१८ मध्ये देशात दाखल झालेल्या या किडीच्या नियंत्रणाबाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये चांगले प्रबोधन झालेले दिसत नाही. केवळ रासायनिक कीडनाशकांची फवारणी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फारशी परिणामकारक दिसून येत नाही. असे असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला की कीडनाशकांची फवारणी या उपायाचाच अवलंब शेतकरी करताना दिसतात. आताही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने पहिल्या पंधरवाड्यातच लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीडनाशकाची फवारणी केली आहे.
अमेरिकन लष्करी अळी ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचे आवडीचे खाद्य मका असले तरी जवळपास ८० पिकांवर ही कीड आपली उपजीविका भागवू शकते. यांत प्रामुख्याने अन्नधान्ये तसेच नगदी पिकांचा समावेश आहे. परंतु आपल्या राज्यात मका आणि ज्वारीवरच या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. लष्करी अळीचे प्रजनन आणि प्रसार फार झपाट्याने होतो. ही कीड पिकांवर रात्री हल्ला करून त्यांचा फडशा पाडते. दिवसा ही कीड सहसा दृष्टीस पडत नाही.
वातावरणातील बदलास सामोरे जाण्याची लष्करी अळीची क्षमता कमी असल्याने एका रात्रीत दूरपर्यंत प्रवास करते. मराठवाड्यातील सध्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या किडीची ओळख, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपायांबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृतीची मोहीम राज्यभर राबविणे हिताचे ठरणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या सर्वांबाबत तोंडी, लेखी माहिती देऊन चालणार नाही, तर किडीच्या ओळखीपासून ते नियंत्रणापर्यंत प्रात्यक्षिकांचे आयोजन करायला पाहिजे.
अशा प्रात्यक्षिकांच्या आयोजनामध्ये कृषी विभाग, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे. शेतात प्रादुर्भाव दिसल्यानंतर नाही तर पीक पेरणीपूर्वीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रबोधन वाढवावे लागेल. त्यात प्रामुख्याने शेताची मशागत, पीक फेरपालट, बीजप्रक्रिया, आंतरपिके, सापळा पिके यांचे महत्त्व सांगावे लागेल. पीक पेरणीनंतर शेतात कामगंध सापळे, पक्षी थांबे, पानावर दिसणारे अंडीपुंज गोळा करून नष्ट करणे हे उपाय किडीचा प्रादुर्भाव ओळखणे, प्रादुर्भाव झाला तरी तो आर्थिक नुकसान पातळीखाली ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
लष्करी अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यावरच नियंत्रणात्मक उपायांचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा. या किडीची आर्थिक नुकसान पातळी १० टक्के आहे. अर्थात, २० पैकी दोन झाडे प्रादुर्भावग्रस्त असतील तरच फवारण्यांचा विचार शेतकऱ्यांनी करावा. त्यातच आधी वनस्पतिजन्य, जैविक आणि शेवटी रासायनिक कीडनाशकांचा वापर करायला हवा. महत्त्वाचे म्हणजे प्रादुर्भावग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या नियंत्रण केले तरच लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण होते हेही लक्षात घेतले पाहिजे.
घातक लष्करी अळीच्या हल्ल्याने आशिया खंडातील प्रामुख्याने भारतातील अन्नसुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा ‘एफएओ’ने आधीच दिला आहे. या किडीची ‘होस्ट रेंज’ (उपजीविका करणारी पिके) पाहिली आणि त्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही तर देशात केवळ अन्नसुरक्षाच नाही तर इंधन सुरक्षा शिवाय पशु-पक्षिखाद्य, साखर, कापड हे उद्योगही धोक्यात येऊ शकतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.