
Chhatrapati Sambhajinagar News: मका उत्पादनात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. वैजापूर तालुक्यातील परसोडा शिवारात पिकावर दहा ते पंधरा दिवसांत प्रादुर्भाव आढळून आल्याने क्षेत्र वाढलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील प्रयोगशील शेतकरी नारायण कवडे यांच्या शेतात मंगळवारी (ता. २४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार व वैजापूरचे तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांच्या संयुक्त पाहणीत हा प्रादुर्भाव प्रकर्षाने पुढे आला. पोषक वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव विस्तारत असल्याची माहिती या वेळी सहयोगी संचालक संशोधन डॉ. पवार यांनी दिली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात कपाशीला मोठ्या प्रमाणात टाळून शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिली, अशी माहिती वैजापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. ठक्के यांनी दिली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी समर्थनगर परिसरातही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांनी पहिल्या पंधरवड्यातच लष्करी अळी नियंत्रणासाठी एक फवारणी घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
यंदा खरिपात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मकाचे सर्वसाधारण २ लाख ५६ हजार ६५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक १ लाख ८५ हजार ६८२ हेक्टरसह जालना जिल्ह्यातील ४३८८० हेक्टर, तसेच बीडमधील १०,६३३, लातूर मधील ११९२, धाराशीवमधील १० हजार ६७, नांदेडमधील ८६८, परभणीतील ९८३ तर हिंगोलीतील ७२७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे तीनही हंगामात मका घेणाऱ्या शेतकऱ्यांनी खरिपात मकाला पुन्हा एकदा अधिकची पसंती देण्याचा मार्ग अवलंबिला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ७७ हजार ८८ हेक्टरवर मकाची पेरणी झाली आहे. आतापर्यंतच्या पेरणीत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये १ लाख ५९ हजार ६४४ हेक्टरवर म्हणजे सुमारे ८५.९८ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे.
मकाची पेरणी बघता यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मकाचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांमध्ये मकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत मकाची सुमारे ८५६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जालन्यात पेरणी कमी दिसत असली तरी येत्या काळात पेरणीचा टक्का हा सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.