Minister Political Drama: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची चर्चा रंगली होती. वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी किंवा खातेबदल निश्चित मानला जात होता. तसेच घरातील नोटांच्या बॅगेची चित्रफीत व मुलाच्या हॉटेल खरेदी प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले संजय शिरसाट, डान्सबारफेम गृहराज्यमंत्री योगेश कदम, जलसंधारण खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत आलेले संजय राठोड, वादग्रस्त ठरलेले भरत गोगावले आदी मंत्री डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात होते.
परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात योगेश कदम यांना प्रशस्तिपत्र देत त्यांचा भक्कम बचाव केला. आपल्या मंत्र्यांवर कारवाई करणार नाही आणि करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिंदे यांनी घेतला. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फावले.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पराक्रमाशी तुलना करता कोकाटे यांचा प्रमाद आत्यंतिक सौम्य असल्याचे अधोरेखित करत आधी शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई करा, अशी भूमिका पवार यांनी घेतली. तसेच कोकाटे यांचा राजीनामा घेतला असता तर त्याचे श्रेय विरोधकांना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना, मिळाले असते. तसेच धनंजय मुंडे यांच्या रूपाने आधीच एक विकेट गेलेली असताना कोकाटेंचाही कार्यक्रम झाला असता तर पक्षाची छीःथू झाली असती. त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली खरी परंतु त्यांचे मंत्रिपद वाचवले आणि खातेही कायम ठेवले.
हे नाट्य घडून गेल्यावर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त मंत्र्यांची शाळा घेतली. खरे म्हणजे शाळकरी मुलांप्रमाणे त्यांना केवळ समज, तंबी देऊन सोडले. त्यातून पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या फडणवीस यांची हतबलताच उघड झाली. २०२९ मध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार असला तरी सद्यःस्थितीत भाजपला मित्रपक्षांची गरज आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपला विधानसभेत घवघवीत यश मिळाले. पण त्यात भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणापेक्षा लाडकी बहीण योजना आणि मित्र पक्षांच्या ताकदीचा वाटा मोठा होता. शिवाय अलीकडच्या काळात शिंदे आणि पवारांनी थेट अमित शाह यांच्याशी धागा जुळवल्याने या दोघांना दुखावणे फडणवीस यांच्यासाठी अवघड जागेचे दुखणे ठरले असते. त्यामुळे फडणवीस यांना मंत्र्यांना केवळ कोरडा दम देण्यावर समाधान मानावे लागले.
वास्तविक केवळ मित्रपक्षांच्या मंत्र्यांवर आरोप होतील याची तजवीज करून त्यांची बदनामी करण्याची खेळी भाजपने केली असल्याचा संशय आहे. कारण भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप होऊनही ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेच नाहीत. खरे तर ‘हमाम में सब नंगे’ असल्यामुळे कोण कुणावर कारवाई करणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे कोणालाच शिक्षा न देता सामूहिक अभयदान योजना राबविण्यात आली.
या सगळ्या गाठी-निरगाठींमुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे बालंबाल बचावले. क्रिकेटमध्ये धावचीत किंवा झेलबाद होताना जीवदान मिळालेल्या फलंदाजाने नंतर शतक झळकावल्याची उदाहरणे आहेत. कोकाटे यांना मात्र आपल्याला कोणी बाद करण्याची वाट न पाहता स्वतःच यष्टीवर बॅट फेकून स्वयंचित होण्याची अवदसा आठवली. त्यातून त्यांना महत्प्रयासाने जीवदान मिळालेले असल्याने त्यांनी त्याचे सोने करून कृषी खात्याला सक्षम आणि दिशादर्शक नेतृत्व द्यावे, हीच अपेक्षा!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.