संपादकीय 
संपादकीय

टोमॅटोची वाढवा लाली

आपल्या टोमॅटोला पाकिस्तान, बांगलादेश आदी शेजारील देशांकडून मोठी मागणी असते. अशावेळी या देशांमध्ये निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

विजय सुकळकर
टोमॅटोच्या दरात मागील वर्षभरापासून मंदी आहे. २०१७ च्या हंगामात राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे टोमॅटोचा पट्टा नाशिकसह सर्वत्रच टोमॅटोची लागवड वाढली होती. या वर्षीसुद्धा (२०१८) पावसाळ्याच्या सुरवातीच्या तीन महिन्यांत बऱ्यापैकी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा कल टोमॅटोकडेच होता. लागवड क्षेत्र आणि उत्पादकतेतही झालेल्या वृद्धीने बाजारात ठरावीक काळात टोमॅटोची आवक वाढत असून, दर कोसळत आहेत. मागील वर्षीचा हंगाम संपेपर्यंत राज्यात टोमॅटोला प्रतिकिलो एक ते पाच रुपये असाच दर मिळाला होता. या वर्षी नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचा हंगाम ऑगस्टपासून सुरू झाला असून, या वर्षी हंगामाची सुरवातच प्रतिकिलो एक ते दोन रुपयांनी झाली. आणि आता या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू असून, या टप्प्यात तरी अधिक दर मिळेल, अशी टोमॅटो उत्पादकांना आशा होती; परंतु महिनाभरापासून टोमॅटोस प्रतिकिलो चार ते पाच रुपये असाच दर मिळत आहे. टोमॅटो लागवडीमध्ये नाशिकसह राज्यभरातील शेतकरी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. रुंद सरी वरंबा पद्धत, पॉलिमल्च, ठिबकद्वारे पाणी-खतांचा अवलंब, कीड-रोग प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सातत्याने कराव्या लागणाऱ्या फवारण्या आणि तोडणी, वाहतूक या सर्व अत्यंत खर्चिक बाबी आहेत. या वर्षी तर नाशिक जिल्ह्यात शेतकरी-शेतमजूर यांच्यातील वादाने मजुरी दीडपटीने वाढली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अवलंबनातून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले तरी वाढता उत्पादन खर्च आणि त्यास मिळणाऱ्या अत्यंत कमी दराने टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटोचा उपयोग स्वतंत्र भाजीबरोबर इतरही बहुतांश भाज्यांमध्ये होतो. दक्षिण भारतासह आता सर्वत्रच करण्यात येत असलेल्या सांबारमध्ये टोमॅटो हा मुख्य घटक आहे. या सर्व अनुषंगाने भाजीपालावर्गीय पिकांमध्ये टोमॅटो हे सर्वाधिक मागणी असणारे पीक आहे. टोमॅटोला देशांतर्गत बाजारपेठांतून वर्षभर मागणी असते. आपल्या राज्यात, देशात टोमॅटो उत्पादनवाढीसाठी जसे प्रयत्न झाले तसे त्याच्या काढणीपश्चात प्रवासाबाबत मात्र झाले नाहीत. इतरत्र तर सोडा मात्र नाशिकसारख्या टोमॅटो उत्पादक मुख्य पट्ट्यामध्येसुद्धा टोमॅटोची शीत साठवणूक, शीत वाहतूक याबाबत पुरेशा सोयी उपलब्ध नाहीत. यामुळे हंगामनिहाय बाजारात टोमॅटोच्या वाढलेल्या आवकेची साठवणूक करता येत नाही. स्थानिक बाजारात दर कमी असेल तर दूरच्या बाजारपेठेत टोमॅटो पाठवितासुद्धा येत नाहीत. स्थानिक पातळीवर टोमॅटोची साठवणूक व शीत वाहतुकीच्या सोयी उपलब्ध झाल्याशिवाय वारंवार टोमॅटोचे दर पडण्याची समस्या सुटणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. टोमॅटो उत्पादकांनीसुद्धा आता देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठांचा नीट अभ्यास करूनच टोमॅटो लागवडीचे नियोजन करायला हवे. टोमॅटोवर प्रक्रिया करून सॉस, चटणी, केचअप, लोणचे आदी अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. उत्पादित टोमॅटोवर स्थानिक भागातच मोठ्या प्रमाणात प्रक्रिया झाली तर बाजारपेठेतील आवक घटून दर चांगले मिळतील. टोमॅटोवर प्रक्रियेसाठी प्रगतशील शेतकरी, शेतकऱ्यांचे गट-समूह, महिलांचे बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यावसायिकांनी पुढाकार घ्यायला हवा. अशा उद्योजकांना शासनाने नोंदणीपासून ते पुढे प्रक्रियायुक्त शेतमालाच्या निर्यातीपर्यंतच्या सर्व सोयीसुविधा विनाविलंब पुरवायला हव्यात. आपल्या टोमॅटोला पाकिस्तान, बांगलादेश आदी शेजारील देशांकडून मोठी मागणी असते. अशावेळी शेजारील देशांमध्ये निर्यात वाढविण्यासाठीसुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. असे झाले तर टोमॅटोचा लाल चिखल तर होणार नाही उलट त्याची लाली वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT