संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परता

विजय सुकळकर

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर कोसळल्याने दुधाचे दर १७ ते १८ रुपये प्रतिलिटरवर आणण्यात आले होते. सुमारे एक-दीड वर्षापासूनच्या दुधाच्या एवढ्या कमी दराने तोट्यात चाललेला व्यवसाय अनेक शेतकरी बंद करीत होते. राज्यातील दूध व्यवसाय उद्ध्वस्त होईल म्हणून उत्पादक रस्त्यावर उतरला होता. त्या वेळी सरकारने ऑगस्ट २०१८ पासून प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा निर्णय घेतला होता. दूध संघांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर द्यावा, असेही निश्चित झाले होते. परंतू बहुतांश दूध संघांनी सुरवातीच्या काळात हा दर दिलाच नाही. फॅट, एसएनएफच्या घोळात काही दिवस गेले. बऱ्याच ठिकाणी हा घोळ अजूनही चालू आहे. त्यानंतर शासनाकडून अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक दूध संघांनी १८ ते २० रुपये लिटरवरच शेतकऱ्यांची बोळवण केली. काही दूध संघांनी तर उत्पादकांच्या पेमेंटची पावती २५ रुपयांची करून त्यातून पाच रुपये अनुदानाचे (अनामत रक्कम) कापून घेतले. शासनाकडून अनुदान मिळाल्यावर अमानत रक्कम तुम्हाला परत करू असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत होते. अनुदान मिळाल्यावर खरंच किती संघांनी अनुदान परत केले, अथवा ते करणार आहेत, हा वेगळा संशोधनाचा विषय ठरु शकतो.

गंभीर बाब म्हणजे आता दूध भुकटी आणि बटरचे दर वाढले आहेत. १२० रुपये प्रतिकिलोवर गेलेले भुकटीचे दर आता २२० रुपयांवर पोचले आहेत. ज्या कारणांमुळे दूध दर कमी केले होते, ते कारण उरले नसताना दूध उत्पादकांकडून आजही कमी दराने म्हणजे जेमतेम २० ते २२ रुपये प्रतिलिटने दुधाची खरेदी चालू आहे. खरे तर दूध भुकटीचे दर कमी झाल्यावर दुधाचे दर कमी करण्यात संघांनी जी तत्परता दाखवली ती आता भुकटीचे दर वाढल्यावर दुधाचे दर वाढविण्यासाठी दाखवायला पाहिजे, परंतू तसे होत नाही. पाच रुपये अनुदानाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. भुकटीच्या वाढीव दराबरोबर अनुदानाचा लाभही संघ घेताना दिसतात. दूध उत्पादक मात्र या लाभापासून वंचितच आहेत.

राज्यात संघटित क्षेत्रातून जवळपास एक कोटी ३० लाख लिटर दुधाचे संकलन होते. यापैकी बहुतांश म्हणजे ९० लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगद्वारे घरगुती वापरासाठी वितरित होते. केवळ ४० लाख लिटर दुधापासून भुकटी व दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. या ४० लाख लिटरपैकी केवळ २२ लाख लिटर दूध भुकटीच्या कमी झालेल्या दरामुळे प्रभावित झाले होते. पाऊच पॅकिंगद्वारा ग्राहकांना विक्री होणाऱ्या दुधावर याचा काहीही परिणाम झालेला नव्हता. ग्राहकांसाठीचे विक्री दर कमी झाले नव्हते. उत्पादक आणि ग्राहकांच्या दूध दरात जवळपास दुपटीने फरक हा नेहमी असतो. अशा परिस्थितीत संकलित होणाऱ्या सर्व दुधाचे दर पाडण्यात आले. मागील वर्षभरापासून प्रतिलिटर १० ते १२ रुपये उत्पादकांची सर्रास लूट चालू आहे. आता भुकटीचे दर वाढले तरी आमचा केवळ तोटा भरून निघाला, नफ्यात आम्ही आलो नाहीत, असे दूध संघ सांगतात. ज्या उत्पादकांवर आपला व्यवसाय अवलंबून आहे, तो जगला नाही तरी चालेल, पण आपला नफा कमी होता कामा नये, ही मानसिकता मुळीच रास्त नाही.

दुष्काळामुळे जनावरांना चारा आणि पाण्याची सोय करताना दूध उत्पादक मेटाकुटीस येत आहेत. त्यातच चारा, भुसा, पेंड, मजुरी, वाहतूक या सर्वांचेच दर वाढल्याने दूध उत्पादन खर्च वाढतोय. दुधाचे दर वाढत नसल्याने दूध उत्पादकांपुढील संकटे मात्र वाढत आहेत. दूध संघ, कंपन्या यासह शासनाचेही याकडे लक्ष दिसत नाही. सद्य परिस्थितीमध्ये शासनाने त्वरीत हस्तक्षेप करून दुधाचे दर उत्पादकांना परवडतील असे वाढवायला हवेत. जानेवारीअखेर अनुदानाची मुदत संपत असली तरी ती पुढेही चालू ठेवावी. मात्र आता अनुदान दूध संघांऐवजी थेट उत्पादकांना मिळायला हवे. असे झाले तरच राज्यात दुग्ध व्यवसाय टिकेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT