संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

ज्वारीचे श्रीमंती मूल्य

विजय सुकळकर

मागील दोन दशकांत पीक पद्धतीत झालेला मोठा बदल, वाहतुकीच्या सोयीसुविधांनी देशातील इतर भागांतील धान्ये तसेच परदेशातील फळे-भाजीपाला सहज उपलब्ध होत असल्याने आपला आहार बदलला आहे. ज्वारी हे राज्याचे मुख्य अन्न असायला हवे. राज्यात ज्वारी हे पीक तिन्ही हंगामांत येत असून, या भागातील माती आणि हवामानसुद्धा ज्वारीस अनुकूल आहे. पूर्वी मराठवाडा, विदर्भातील जिरायती क्षेत्रात खरीप हंगामात ज्वारी हे मुख्य पीक होते. पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण विभागात रब्बीत ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. आता मराठवाडा, विदर्भात खरीप ज्वारी दिसतच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. ज्वारीचे मिळणारे कमी उत्पादन, बाजारातून घटत असलेली मागणी आणि मिळणारा कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा कल ज्वारीएेवजी इतर पिकांकडे दिसून येतो. तिन्ही हंगामातील ज्वारीच्या घटलेल्या क्षेत्रामुळे आपल्या ताटातून भाकरीही गायब होत आहे. आपल्या आहारात ज्वारीच्या भाकरीएेवजी गव्हाची पोळी आली अन आरोग्याच्या नवनव्या समस्या सुरू झाल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पाैष्टीक, पचनास हलक्या ज्वारीचा पाैष्टीक धान्य म्हणून प्रचाराचे काम कृषी विभागाने यापूर्वी कधी केलेच नाही. आता उशिरा का होईना, राज्यात कृषी विभाग पाैष्टीक पीक म्हणून ज्वारीचा प्रसार करणार आहे, त्याचे स्वागत करायला हवे.

आपल्या राज्यातच नाही तर देशपातळीवर ज्वारीचे क्षेत्र आणि उत्पादन घटत असून अन्नसुरक्षेच्या दृष्टीने हे घातक आहे. यामुळेच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ज्वारीला पाैष्टीक अन्न म्हणून पुढे आणण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. देशात अमेरिकेच्या सहकार्याने १९६२ मध्ये ज्वारी संशोधनाला सुरवात झाली. परंतु, १९६५ ते २००५ या कालावधीत ज्वारीच्या उत्पादकतेत तसेच पोषणमूल्य वाढीत फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यानंतरच्या काळात ज्वारीच्या उत्पादकता वाढीला थोडी गती लाभली असून अलीकडे पोषणमूल्य असलेली वाणंही आली आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांनी ज्वारीच्या अधिक उत्पादनाचे तंत्र विकसित केले. परंतु त्याचा शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अवलंब झालेला नाही. राज्यात ज्वारीचे क्षेत्र वाढवायचे असेल तर या पिकाची उत्पादकता वाढवावी लागेल. ज्वारीचे उत्पादन वाढल्यानंतर दर कोसळू नयेत म्हणून गहू, तांदळाप्रमाणे ज्वारी हमीभावाने खरेदी करून सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत पुरवठ्याचे धोरण अवलंबायला हवे. आहारात ज्वारीच्या भाकरीचे प्रमाण वाढविण्यासाठी याच्या सेवनाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात, रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते, हृदयासंबंधीत आजारातही ज्वारी उपयुक्त आहे. ज्वारीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादनाचे विकारही कमी होतात. ज्वारीचे नवीन पोष्टीक वाणं मुलं, महिलांचे कुपोषण कमी करण्यासही हातभार लावतात. ज्वारी सेवनाचे हे सर्व फायदे लोकांना पटवून द्यावे लागतील. ज्वारीपासून धान्याबरोबर जनावरांना चाराही मिळतो. ज्वारीपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. ज्वारीच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना देश-विदेशातून मागणी वाढत आहे. गावातील बेरोजगार तरुण, महिलांना ज्वारीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन त्यांना या उद्योगात उतरविण्यासाठी आर्थिक मदतही करावी लागेल. गरिबाचे धान्य ज्वारीची प्रक्रिया आणि पोषणमूल्यातील श्रीमंती कळाल्याशिवाय या पिकाला चांगले दिवस येणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT