agrowon editorial 
संपादकीय

कोरोनाला हरवायला हवी दुर्दम्य इच्छाशक्ती

कोरोना कितीही गंभीर पातळीपर्यंत गेला तरी तो बरा होतो, हेच ईस्माइल सय्यद या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

विजय सुकळकर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातील जनता धास्तावलेली आहे. आपल्या राज्यात तर ही महामारी फारच झपाट्याने पसरतेय. दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाने शहरांसह ग्रामीण भागालाही चांगलाच विळखा घातला आहे. देशभरात दररोज साडेतीन ते चार लाख कोरोना बाधित नवे रुग्ण आढळून येत असून, त्यापैकी आपल्या राज्यातील रुग्णांची संख्या ६५ ते ७० हजार आहे. राज्यात दररोज ७०० ते ८०० रुग्ण कोरोनाने मृत्यू पावत आहेत. हे सगळे चित्र अतिशय भयावह असे आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी ४० आणि एचआरसीटी स्कोअर २२ येऊनही तो रुग्ण बरा झाला तर! चमत्कारच म्हणावा लागेल ना? असाच चमत्कार लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. या जिल्ह्यातील ४२ वर्षे वयाच्या इस्माईल सय्यद या शेतकऱ्याने अतिगंभीर कोरोना आजाराला हरविण्याचे काम केले आहे.

एखाद्याला कोरोनाची लागण झाली की नाही याची खात्री आरटीपीसीआर चाचणीद्वारे करता येते. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी प्राथमिक लक्षणे दिसलेल्या रुग्णाची ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यास एचआरसीटी चाचणी करावी लागते. एचआरसीटीद्वारे कोरोनाचा संसर्ग नेमका किती आहे, हे कळते. याच चाचणीवरून डॉक्टर उपचाराची दिशाही ठरवतात. एचआरसीटी स्कोअर ० ते ७ सौम्य संसर्ग, ९ ते १८ मध्यम संसर्ग आणि १९ ते २५ अति संसर्ग समजला जातो. कोरोना संसर्गात रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. ऑक्सिजन पातळीदेखील खालावत जाते. ऑक्सिजन पातळी ९४ ते १०० चांगली, ९० ते ९३ कमी, तर ८० ते ८९ फारच कमी मानली जाते. यावरून इस्माईल सय्यद यांचा संसर्ग किती गंभीर होता, हे आपल्या लक्षात यायला हवे. परंतु आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यांनी अति गंभीर कोरोना आजारावर मात केली आहे. कोरोनासोबतच्या या लढ्यात त्यांना लातूर महापालिकेच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कोविड केअर सेंटरची योग्य उपचाराच्या रूपाने चांगली साथ लाभली आहे.

ग्रामीण भागात कोरोनाची भीती अधिक आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येईल म्हणून अनेक जण ताप, सर्दी, खोकला असे दुखणे अंगावर काढताहेत. डॉक्टरकडे जाण्याचे टाळताहेत. यामुळे स्वतःच्या आरोग्याबरोबर आपण इतरांच्या आरोग्याशी खेळतोय. कोरोनाचे निदान लवकर झाले तर योग्य वेळी योग्य उपचाराने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, शिवाय बाधित आणि त्यांच्या संपर्कातील सर्वांचे ताबडतोब विलगीकरण झाल्याने या महामारीचा संसर्गही कमी होईल. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरकडे जायला हवे. डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य ते तपासण्या करून घ्याव्यात. तपासण्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्‍यास घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना कितीही गंभीर पातळीपर्यंत गेला तरी तो बरा होतो, हेच ईस्माइल सय्यद या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. याउलट सौम्य लक्षणे आणि आजार असताना सुद्धा केवळ काळजी आणि धास्तीने अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. सय्यद यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयात व्हेंटिलेटर, तसेच रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्शनही दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत तेथील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचे फळही त्यांना मिळाले.

कोरोना संसर्ग काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे. बहुतांश कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होतोय. अशावेळी नैसर्गिकरीत्या सर्वांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या झाडांची संख्या राज्यात वाढली पाहिजेत. हा हेतू ठेवूनच या कोविड केअर सेंटरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ईस्माइल सय्यद यांना झाडाचे रोपटे देऊन घरी पाठविले. यातूनही बोध घेत आपल्या गावपरिसरात झाडांची संख्या वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न वाढवायला हवेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

Environmental Protection Order: तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाकडून स्थगिती

Banana Cultivation: खानदेशात केळी लागवड बंदावस्थेत

Farm Loan Waiver: चर्चा कर्जमाफीची, नोटिसा मात्र वसुलीच्या!

SCROLL FOR NEXT