Mechanical Ginning of Cotton : मागील काही वर्षांपासून शेतीमध्ये भयंकर मजूरटंचाई जाणवत आहे. शेतातील कामे करायला मजूरच मिळत नाहीत. मिळाले तर ते कष्टदायक काम करायला तयार होत नाहीत. तयार झाले तर मजुरीचे दर प्रचंड वाढलेले आहेत. कापसाच्या वेचणीसाठी तर हल्ली मजुरांना शेतावर आणणे आणि परत घरी सोडण्याची प्रथा अनेक भागांत पडलेली आहे.
१० रुपये प्रतिकिलोने सुरुवात झालेल्या कापूस वेचणीचा दर शेवटी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचते. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने अधिक दर देऊन कापूस वेचणी करून घ्यावी लागते. कापूस वेचणी हे काम खूपच कष्टदायक देखील आहे. कापूस वेचणीचे काम बहुतांश महिला करतात. झाडावरील एकएक बोंड वेचून काढणे, त्याचे ओझे पाठीवर वाहणे हे खूपच त्रासदायक देखील आहे.
आपल्या देशात कापसाच्या वेचणीत यांत्रिकीकरण आलेले नसल्यामुळे हे काम मजुरांकडूनच करून घ्यावे लागते. कापूस वेचणीत यांत्रिकीकरणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून उत्पादकांनी लावून धरलेली आहे. यांत्रिक कापूस वेचणीत आपल्याकडे तीन-चार वेचण्या कराव्या लागणाऱ्या जातीही अडसर ठरतात.
कापसाच्या यांत्रिक वेचणीसाठी एकाच वेळी काढणीस येणाऱ्या जाती लागतात. परंतु ही अडचण नागपूर येथील ‘सीआयसीआर’ने काही अंशी दूर केली आहे. यांत्रिक कापूस वेचणीमध्ये पानगळतीसाठी उपयुक्त ठरणारे डिफॉलिएंट या संस्थेने विकसित केले आहे. यांत्रिक कापूस वेचणीच्या दिशेने हे एक पाऊल म्हणावे लागेल.
आपल्याकडे लागवड होत असलेल्या बीटी संकरित तसेच सरळवाणांत या डिफॉलिएंटचा वापर करून यंत्राने एकाच वेळी कापसाची वेचणी करता येणार आहे. असे असले तरी सध्याची आपल्याकडील दोन-तीन बहर येणारी बीटी वाणं यांस फार अनुकूल आहेत, असे म्हणता येणार नाहीत.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन या कापूस लागवडीत आघाडीवरच्या देशांत यंत्रानेच कापसाची वेचणी होते. या देशांत एकाच वेळी वेचणीला येणारे वाण त्यांनी विकसित केले आहेत. कापसाची यांत्रिक वेचणी करण्यासाठी अशा जाती आपल्याला देखील विकसित कराव्या लागतील.
आपल्याकडे सध्या कापसाच्या लागवडीत दोन ओळी आणि दोन झाडांतील निश्चित असे अंतर शेतकरी ठेवत नाहीत. त्यामुळे देखील यांत्रिक वेचणीस अडचणी येतात. अशावेळी यंत्रास सुलभ असे ठरावीक अंतर कापूस लागवडीत ठेवावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर एकाच बहरात अधिकाधिक कापूस उत्पादित होईल, असे पीक व्यवस्थापन पण करावे लागणार आहे.
डिफॉलिएंटचा उत्पादक शेतकऱ्यांच्या पातळीवर वापर करायचा म्हटले तर नेमक्या कोणत्या वेळी, किती प्रमाणात आणि कसा वापर करायचा याबाबत योग्य मार्गदर्शन झाले पाहिजेत. नेमक्या कोणत्या वातावरणात याचा वापर अधिक प्रभावी राहील, हेही शेतकऱ्यांना सांगावे लागेल. उत्पादकांच्या पातळीवर डिफॉलिएंट वापरायचे म्हणजे त्याचा खर्चही कमीत कमी असायला हवा.
डिफॉलिएंट बाबतच्या संशोधनानंतर आता कापूस वेचणीस सुलभ यंत्रेदेखील विकसित करावी लागतील. त्या संशोधनाला व्यावसायिक रूप देऊन कापूस वेचणी यंत्रांचा वापर बहुतांश कापूस उत्पादकांकडून होईल, ही काळजी पण घ्यावी लागेल. आपल्याकडील कापसाचे काही सरळ वाण ही एकदाच वेचणीला येतात.
अशा वाणांची सघन पद्धतीने लागवड तसेच त्यात डिफॉलिएंटचा वापर करून यांत्रिक काढणी केली तर उत्पादकांना किफायतशीर ठरू शकते. याबाबतही कापूस उत्पादकांचे व्यापक प्रबोधन करावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर कापूस वेचणी करणाऱ्या महिला मजुरांचे कष्ट, त्यांना होणार त्रास वाचू शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.