Cotton Ginning Industry : संत्रा पट्ट्यात शेतकऱ्यांनी उभारला कापूस जिनिंग उद्योग

Success Story of Farmer : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील ज्ञानेशकन्या शेतकरी उत्पादक कंपनीने संत्रा पट्ट्यात कापूस जिनिंग प्रकल्प उभारणी केली आहे. त्यातून साडेआठ ते १२ कोटी रुपये वार्षिक उलाढालीपर्यंत मजल गाठली आहे.
Cotton Ginning Project
Cotton Ginning ProjectAgrowon
Published on
Updated on

Cotton Ginning Processing : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील तब्बल १५ हजार ८२१ हेक्‍टरवर संत्रा बागा आहेत. तालुक्‍यात तब्बल १८ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. सहकारी तत्त्वावरील कापूस जिनिंग प्रकल्प या भागात उभारला होता.

मात्र त्याची चाके कधीच फिरली नाही. कापूस उत्पादक पणन महासंघ, खासगी व्यक्‍तींनाही तो चालवण्यास घेतला. पण त्यात यश आले नाही. अशा पार्श्‍वभूमीवर चांदूबाजार येथील काही शेतकरी मंडळी एकत्र आली.

त्यांनी धाडस, हिंमत व एकी दाखवून आपला कापूस जिनिंग प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी ज्ञानेशकन्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या नावाने २९ ऑक्‍टोबर २०२० मध्ये नोंदणी केली.

सतीश मोहोड, राहुल म्हाला, अजय तायडे, राजेश सोलव, पंकज मोहोड, विक्रम कडू, तुषार पावडे, सचिन पिसे, सचिन पावडे आदी कंपनीचे संचालक आहेत. भागधारक ५१० आहेत. समभागाद्वारे पाच लाख रुपये व संचालकांच्या माध्यमातून पाच लाख रुपये अशाप्रकारे दहा लाख रुपये भागभांडवल गोळा झाले.

Cotton Ginning Project
Cotton Ginning : कापूस नसल्याने अर्धे जिनिंग रिकामे

स्वयंचलित प्रकल्प

तालुक्‍यातील मासोद येथे २१० बाय ११५ फूट शेड उभारून प्रकल्पाची उभारणी झाली. आमदार बच्चू कडू यांनी पाठबळ देण्यासह पावणेचार एकर जागा २९ वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर देण्यासाठी सहकार्य केले. २०२१ मध्ये जिनिंग- प्रेसिंगला सुरुवात झाली. प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे तो स्वयंचलित असून, केवळ चार व्यक्ती यंत्रणा चालवण्यासाठी पुरेशा ठरतात.

रुई व सरकी वेगळे करण्यासाठी २४ रेचे (डीआर) (प्रत्येकी १२ चा सेट) आहेत. त्यासाठी एका ट्रॉलीचा वापर करण्याचे ‘डिझाइन’ याच प्रकल्पात सर्वप्रथम करण्यात आल्याचे संचालक मोहोड सांगतात. रेच्यांमधील कापूस कमी होताच ‘सेन्सर’ आधारित ट्रॉलीच्या माध्यमातून तो त्यात पुन्हा पडतो. एका रेच्यापासून १२ व्या रेच्यापर्यंत जाणे व परत येणे यासाठी ट्रॉलीला केवळ अडीच मिनिटांचा कालावधी लागतो.

कापसाची खरेदी

शेतकऱ्यांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी अमरावती बाजारातील दरानुसार होते. पहिल्या वर्षी (२०२१-२२) १९ डिसेंबर ते ३१ मार्च कालावधीत प्रकल्प चालला. त्या वर्षी २१ हजार क्‍विंटल, पुढील वर्षी २२ हजार क्‍विंटल कापसाची खरेदी व प्रक्रिया झाली.

यंदा २६ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला. आजअखेरीस ४२०० क्‍विंटल कापसाची खरेदी व प्रक्रिया झाली आहे. यंदाचे उद्दिष्ट ५० हजार कापूस खरेदीचे आहे.

प्रकल्पाची क्षमता व कामकाज

प्रति आठ ते दहा तासांच्या शिफ्टमध्ये ५०० क्‍विंटल कापसावर प्रक्रिया. त्यापासून १०० गाठी तयार होतात. कापसातील रुईच्या प्रमाणाच्या आधारावर गाठी मिळण्याचे प्रमाण.

प्रति क्‍विंटल कापसापासून ३० ते ४२ किलोपर्यंत रुई मिळते. जमिनीचा पोत, वाण, भौगोलिक स्थिती आदी बाबी त्यामागे परिणामकारक.

युनिटला आग लागल्यास संपूर्ण यंत्रणा बंद पडते. जळालेला कापूस प्रकल्पाबाहेर फेकला जातो.

६० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ. ५५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्‍टर, ५० टन क्षमतेचा वजनकाटा.

Cotton Ginning Project
Cotton Ginning : जिनिंगचा हंगाम लांबला

बाजारपेठ, उलाढाल

व्यापाऱ्यांना थेट किंवा मध्यस्थांमार्फत गाठींची विक्री होते. पहिल्या वर्षी ४६००, दुसऱ्या वर्षी ४४०० गाठींची विक्री झाली. यंदाच्या हंगामात हे उद्दिष्ट १० हजार गाठींचे आहे. पहिल्या वर्षी कंपनीने १२ कोटी रुपये, त्या पुढील वर्षी साडेआठ कोटी रुपये वार्षिक उलाढाल केली. यंदा हे उद्दिष्ट दुप्पट म्हणजे २५ कोटींपर्यंत आहे. सरकीपासून तेलनिर्मितीचेही पुढील ध्येय आहे.

शेतीमाल अनामत योजना

शेतकऱ्याचा कापूस तारण ठेवण्याची अभिनव योजना कंपनीकडून राबविण्यात येत आहे. बाजारात दर कमी असलेल्या काळात कापूस आणावा. तो तीन महिन्यांपर्यंत तारण ठेवण्यात येईल.

या कालावधीत जो उच्चांकी दर असेल तो शेतकऱ्याला दिला जाईल अशी ही योजना आहे. मागील हंगामात १३० शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. यंदा ६०० क्‍विंटल कापूस ठेवण्यात आला आहे.

संचालकांनीच उभारले भांडवल

प्रकल्पाची एकूण गुंतवणूक सहा कोटी रुपये आहे. शेड उभारणी व अन्य बाबी त्यात आहेत. स्वयंचलित यंत्रणेची किंमत एक कोटी ६० लाख रुपये आहे. संचालक सतीश मोहोड म्हणाले की कोणतीही राष्ट्रीय वा खासगी बँक कर्जासाठी पुढे आली नाही.

जिजाऊ कमर्शिअल बॅंकेने साडेतीन कोटी रुपयांची महत्त्वाची मदत केली. उर्वरित रक्कम आम्हा संचालकांनी घरचे दागिने वा वस्तू गहाण ठेवून उभी केली. जिनिंग प्रकल्प उभारणारी आमची महाराष्ट्रातील पहिलीच शेतकरी कंपनी असावी असेही ते म्हणाले.

सतीश मोहोड, ९१३०६०६९५९, (संचालक, ‘ज्ञानेशकन्या’ शेतकरी कंपनी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com