अकोला ः जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा म्हणून या हंगामात प्रतिलाभार्थी एक एकरासाठी लागणारे बीटी कापूस बियाणे ९० टक्के अनुदानावर देण्याबाबत घोषणा केली होती. यासाठी अर्ज मागविण्यात आले असून जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सुमारे २६ हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेसाठी १५ लाखांचे नियोजन असून त्यात जवळपास ११४१ लाभार्थी निवडले जाऊ शकणार आहेत. त्यामुळे आता लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना बियाण्यासाठी ९० टक्के अनुदानाची योजना जाहीर करण्यात आली होती. एक एकरासाठी बीटी कपाशी बियाण्याची दोन पाकिटे लागतात. शासकीय दरानुसार होणाऱ्या एकूण किमतीच्या ९० टक्के अनुदान जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल. सध्या अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, अकोट या तालुकांस्तरावर अर्जांची छाननी केली जात आहे.
प्राथमिक अंदाजानुसार २६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. सध्या पेरणी सुरू झाली असून शेतकरी बियाण्याची खरेदी करीत आहेत. ही खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून ज्यांनी पावती घेतली असेल अशांना ती सादर करावी लागेल. यानंतर ज्यांची निवड केली जाईल त्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच आगामी काळात प्रक्रिया सुरू होणार आहे.
कृषी समितीच्या सभेत आढावा शुक्रवारी (ता. १२) जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीची सभा सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कृषी विभागाच्या बियाणे वाटप योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांचे अर्ज, लाभार्थी निवडीबाबत चर्चा झाली. तसेच कृषी विभागाला कमी निधी मिळाल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीबाबत तडजोड करणार नसून येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न लावून धरू असा सूर सर्व सदस्यांनी मांडला. सभेला मोहित तिडके, संजय आढाऊ, अनंत अवचार, अर्चना राऊत, नीता गवई, गीता मोरे, दीपमाला दामधर समितीचे सचिव तथा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे उपस्थित होते.
अशी आहे योजना
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.