केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (MPCC) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपल्या, मते घेतली, निवडून आले आणि लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटर महाग झाले आहे तर एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे.
व्हिडीओ पहा-
काही ठिकाणी एलपीजी सिलिंडर १००० ते ११०० रुपये एवढ्या किमतीला घ्यावा लागत आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून १ एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही.
मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयी महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिल रोजी मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे. ह्या आंदोलनात काँग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील सर्वसामान्य जनतेने, स्वयंसेवी संघटनानी रिक्षा टॅक्सी असोसिएशन यांनीही या आंदोलन सहभागी होऊन केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या दरोडेखोरीविरूद्ध आवाज उठवावा, असे आवाहनही पटोले यांनीही केले आहे.
संघटीत व असंघटीत कामगारांच्या समस्या व मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे, या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.