‘आयएसओ` पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळाली गती
‘आयएसओ` पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळाली गती  
मुख्य बातम्या

‘आयएसओ` पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळाली गती

Chandrakant Jadhav

जळगाव : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या सेवांमध्ये गणल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेसंबंधी गतिमान, तत्पर कार्यवाही व्हावी, यासोबत दवाखान्यांमध्ये औषधांची उपलब्धता, रेकॉर्ड अद्ययावत असणे याबाबत कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी ‘आयएसओ` पशुवैद्यकीय दवाखान्यांचा उपक्रम मागील वर्षभरापासून राबविला जात आहे. त्यात ४२ दवाखाने मागील वर्षी ‘आयएसओ` झाले. यंदा ४० दवाखाने ‘आयएसओ` करण्यासंबंधीची प्राथमिक तयारी सुरू आहे. या उपक्रमात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शक्‍य तेथे आर्थिक मदतही केली आहे. शासनाकडून कुठलीही मोठी मदत न घेता यांसंदर्भात कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात १५२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुवैद्यकीय विभाग तसा दुर्लक्षितच असतो. यातच राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडे अनेक योजना राबविण्यासाठी दिल्याने जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागाकडील योजनांसंबंधीची कार्यवाही कमी होत आहे. परंतु, पशुवैद्यकीय सेवेचा ताण मात्र वाढत आहे. मागील काळात झालेल्या पशुगणनेनुसार सद्यःस्थितीत जेवढे दवाखाने आहेत, ते पुरेसे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दवाखान्यांची संख्या होती तेवढीच आहे. जे दवाखाने २५ ते ३० वर्षांपूर्वी उभारले होते, त्यांची दैनावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रेकॉर्ड अस्ताव्यस्त असणे, औषधे ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे, शीतकरण यंत्रणांचा अभाव, पुरेशी औषधी नसणे, पशुवैद्यकीय उपचारांसंबंधी आवश्‍यक साहित्य, सामग्रीची दुरवस्था, पुरेसे कर्मचारी नसणे आदी अडचणींचा सामनाही या विभागाला करावा लागत होता. तर अनेक ठिकाणी दवाखान्यातील वीजपुरवठा यंत्रणेची दैना, गळक्‍या इमारती आदी समस्याही होत्या. नव्या इमारती, मोठी दुरुस्ती, वीजपुरवठा यंत्रणा दुरुस्ती यासाठी कोणताही मोठा निधी जिल्हा परिषदेकडून मिळू शकत नव्हता. ही बाब लक्षात घेता काही ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे करून घेतली. तत्पर सेवेसाठी उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सेवा प्रदान केली जात आहे. संबंधित सर्व दवाखान्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ राहील व रेकॉर्ड अद्ययावतीकरणावर भर दिला. या अंतर्गत पाचोरा तालुक्‍यात सर्वाधिक १३ दवाखाने ‘आयएसओ` झाले. रावेर, यावल, जळगाव, भुसावळ, जामनेरातही चांगले काम यासंबंधी झाले. त्यात लोहटार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याने उल्लेखनीय कामकाज केले आहे. या दवाखान्यात पशुधनाचे आजार व इतर बाबींबाबत जनजागृतीसाठी वृत्तपत्रांची कात्रणे एका बोर्डवर लावली आहेत. यासंदर्भात संबंधित दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनीच सर्व कार्यवाही केली. वृत्तपत्रही संबंधित अधिकारी स्वखर्चाने आणतात. वरखेडी (ता.पाचोरा), हिवरे (ता.रावेर) येथील दवाखान्यात चाराबाग तयार केल्या आहेत. त्यात विविध जातीच्या चाऱ्याची लागवड केली जाते. ‘आयएसओ‘ उपक्रमासंबंधी जिल्हा परिषदेकडून भरीव निधी मिळाला नसला तरी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर तत्पर सेवेसंबंधी योगदान दिले. यंदा ४० पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ` करायची तयारी सुरू आहे. ती प्राथमिक स्तरावरच असून, लवकरच त्यासंबंधी बैठक घेतली जाईल. त्यात कोणत्या गावांमधील दवाखाने घ्यायचे, यावर निर्णय घेतला जाईल. ‘आयएसओ` उपक्रमात मागील वर्षी सहभागी झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कुणी उत्तम काम केले, याची माहिती घेऊन संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा परिषद प्रशस्ती पत्रक देणार आहे. त्याचाही कार्यक्रम लवकरच निश्‍चित केला जाणार आहे.   ‘आयएसओ` उपक्रम हा केवळ भौतिक सुविधांसाठी राबविलेला नाही, तर तत्पर सेवा, रेकॉर्ड अद्ययावत करण्यात आले. पुरेसे मनुष्यबळ देऊन जेथे अधिक गरज आहे, तेथे गतिमान कामकाज करण्यावर भर दिला. यासाठी कुठलाही मोठा निधी घेतला नाही. आवश्‍यक त्या बाबींसाठी लोकसहभागातून मदत घेतली. यावर्षीही ४० पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ` करण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. पी. एस. इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT