सातारा : पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार येथे स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) पर्यटकांनी स्ट्रॉबेरीचा थेट बांधावर जाऊन आस्वाद घेतला. या महोत्सवास प्रतिसाद वाढत आहे. एक एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असल्याचे अायोजकांकडून सांगण्यात आले.
सलग सुट्या आल्याने पर्यटकांची पावले पाचगणी- महाबळेश्वरकडे वळाली आहेत. सकाळपासून पर्यटकांची भिलार परिसरात रीघ सुरू होती. शेतात जाऊन हाताने तोडून स्ट्रॉबेरी खाण्याची मजा हे पर्यटक लुटत होते. तसेच पर्यटक शेतातील स्ट्रॉबेरी व इतर भाज्यांचीही खरेदी करताना दिसत होते.
भिलार येथे जॅम, जेली, वाइन, स्ट्रॉबेरी, मलबेरी, खाद्यपदार्थ, महिला बचत गटाची उत्पादने यांची विविध स्टॉलही उभारले आहेत. ठिकठिकाणी पर्यटकांना माहिती देण्यासाठी शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येत होते. महोत्सवाच्या माहितीसाठी पाचगणी, महाबळेश्वर व भिलारमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले होते.
भिलार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. तसेच पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. स्ट्रॉबेरीची प्रतिकिलोस १०० ते १२० रुपये दराने विक्री केली जात आहे.