सोयाबीन बियाण्यांची  खरिपासाठी जुळवाजुळव Of soybean seeds Match for kharif 
मुख्य बातम्या

सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळव

येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याची शोधाशोध करू लागले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, असे शेतकरी, शेतकरी गटांकडून ८० ते १०० रुपयांदरम्यान प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन बियाण्याची शोधाशोध करू लागले आहेत. सध्या ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे, असे शेतकरी, शेतकरी गटांकडून ८० ते १०० रुपयांदरम्यान प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

या हंगामात सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धतेबाबत आतापासूनच विविध प्रश्‍न उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. प्रामुख्याने गेल्यावेळी काढणीच्या काळात पाऊस झाल्याने सोयाबीनचा दर्जा काही भागात मोठ्या प्रमाणात खालावला होता. अशा स्थितीत बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला यंदा दरही हमीभावापेक्षा अधिक मिळालेला आहे. आता हंगामात लागवड करायची तर सोयाबीन बियाणे कसे मिळवायचे हा पेच आहे. काही शेतकऱ्यांजवळ सोयाबीन आहे. त्यांनी विक्री सुरू केली असून, साधारणपणे ८ ते १० हजार रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल दर आकारत आहेत. 

बाजारपेठांमध्ये सोयाबीन गेल्या काही दिवसांत सात हजारांपर्यंत विक्री झाली होती. ही तेजी अद्यापही कायम आहे. या भागातील बाजार समित्यांमध्ये मध्य प्रदेशातील विविध बियाणे कंपन्यांनी सोयाबीनची खरेदी केलेली आहे. संपूर्ण चांगले सोयाबीन कंपन्यांनी गोळा केले असून, तेच आता प्रक्रिया करून शेतकऱ्यांना या हंगामासाठी विक्री केले जाणार आहे. गेल्या वर्षात सोयाबीन उगवणीबाबत हजारोंच्या संख्येने तक्रारी झाल्या होत्या. हे सर्व लक्षात घेता शेतकरी सजगपणे बियाण्याचा शोध घेत आहे. ठिकठिकाणी बियाण्याची विचारणा सुरू झालेली आहे.

प्रतिक्रिया

सोयाबीन बियाण्याला या वर्षी केंद्र, राज्य सरकारकडून अनुदान द्यायला हवे. जसे हरभरा बियाण्यासाठी भेटले होते. शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची गावागावात मागणी पुढे येत आहे.  - श्रीकृष्ण शेलकर, शेतकरी, मोताळा, जि. बुलडाणा

प्रतिक्रिया यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासणार आहे, हे आतापासून दिसत आहे. काही जणांनी सोयाबीन साठवलेले आहे. परंतु त्याच्या उगवणीबाबतचे प्रश्‍न निर्माण होत आहेत. माझ्याकडे चार लॉट होते. पैकी एक पास झाला.  - विनोद पाटील, शेतकरी, सुडी, जि. वाशीम 

प्रतिक्रिया

बहुतेक शेतकऱ्यांकडील सोयाबीन विकून झालेले आहे. ज्यांच्याकडे आहे ते प्रति किलो १०० रुपयांनीही द्यायला मागेपुढे करीत आहेत. यंदा सोयाबीन बियाण्याचा दर अस्मानाला भिडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे स्वतः जवळचे सोयाबीन विक्री केले. यंदा त्यामुळे सोयाबीन बियाण्याची टंचाई निश्चित जाणवणार आहे. शिवाय खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा महत्त्वाची राहील. ती तपासूनच शेतकऱ्यांना मिळायला हवी. सरकारने आत्तापासूनच नियोजन करून पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना गावागावांत शुद्ध बियाणे पुरविण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली केल्या पाहिजेत. पेरणीनंतर बियाणे मिळाले तर ते वराती मागून घोडे दामटण्याचा प्रकार होईल.  -डी. एन. पांचाळ,  शेतकरी, गोरेगाव, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT