Nashik : The loss of grape growers at Rs 1600 crore
Nashik : The loss of grape growers at Rs 1600 crore 
मुख्य बातम्या

नाशिक : २० हजार एकरांवरील द्राक्ष वेलींवरच; १६०० कोटींवर नुकसान 

टीम अॅग्रोवन

नाशिक : राज्यात द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिकमध्ये लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. संचारबंदी असल्याने प्रमुख बाजारपेठेत मालवाहतुकीची अडचण, व्यापाऱ्यांची नसलेली उपलब्धता व मंदावलेली निर्यात प्रक्रिया यामुळे दरात मोठी घसरण होऊन प्रतिकिलोमागे ४० रुपयांपर्यंत नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे चालू वर्षी अंतिम टप्प्यात द्राक्ष उत्पादकांचे १६०० कोटींवर नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्किल झाले आहे. 

जिल्ह्यात ५८,३६७ हेक्टर क्षेत्रावर लागवडी आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात ४० टक्के बागा शिल्लक होत्या. व्यापाऱ्यांशी सौदे शेतकऱ्यांनी केले. मात्र, लॉकडाऊनची घोषणा होताच व्यवहार एकदम ठप्प झाले. त्यात बाहेरील राज्यातील व्यापारी परत गेले. काढणीसाठी उपलब्ध असलेले आदिवासी भागातील मजुरांनीही परतीचा रस्ता धरल्याने एकीकडे व्यवहार व काढणीची कामे अडचणीत सापडली. संचारबंदी असल्याने स्थानिक फळविक्रेत्यांनी खरेदी कमी केली. त्यामुळे हा माल खपवायचा कसा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

लॉकडाऊनच्या घोषणा होण्याच्या दरम्यान ४० हजार एकरांवरील ४ लाख टन द्राक्षे काढणीविना राहिली. यावेळी उठाव नसल्याने थेट विक्री, व्यापारी, बेदाणा निर्मिती अशा पर्यायी व्यवस्थेतून ५० टक्के माल खपला असला तरी अजूनही २ लाख मेट्रिक टन माल पडून आहे. 

अजूनही २० हजार एकरांवरील साधारणपणे दोन लाख मेट्रिक टन माल वेलींवरच आहे. सध्या अनेक व्यापारी द्राक्ष उत्पादकांची अडवणूक करून पडीच्या दरात खरेदी करीत आहेत. ज्यामध्ये सर्वसाधारण १० रुपयांप्रमाणे खरेदी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किलोमागे ४० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या नुकसानीचा आकडा १६०० कोटींवर गेला आहे. 

जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती पुढीलप्रमाणे  
लॉकडाऊन दरम्यान काढणीविना शिल्लक माल ४ लाख टन 
झालेली काढणी १०,००० हेक्टर 
अपेक्षित दर ५० रुपये प्रतिकिलो
सध्याचा सर्वसाधारण दर १० रुपये किलो 
दरातील तफावत ४० रुपये प्रतिकिलो

चालू वर्षी चार एकर बागेसाठी १० लाख रुपये खर्च केला. अवकाळी पावसाच्या फटक्यातून बागा वाचवून निर्यातक्षम मालही तयार आहे. मात्र, व्यापारी नाही, निर्यात थांबली. त्यात जे व्यापारी आहेत ते १० रुपयांपर्यंत माल मागतात. आता उत्पादन खर्चही निघणार नसल्याने पुन्हा कसे उभे राहायचे हा प्रश्न उभा राहिला आहे.  -पुंडलिक दामू कांडेकर, द्राक्ष उत्पादक, लाखलगाव, जि. नाशिक 

जिल्ह्यात अजूनही २० हजार एकरांवरील बागा काढणीविना आहेत. त्यात उठाव नाही तर दुसरीकडे अपेक्षित दर नसल्याने द्राक्ष उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. व्यापारी, मजूर अशा अडचणीत माल काढणीविना असल्याने पुढील हंगामाची कामेही अडचणीत सापडली. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चहुबाजूंनी अडचणीत आहे.  - कैलास भोसले, कोषाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

SCROLL FOR NEXT