Pune News : देशातील सर्वात मोठ्या १५० जलाशयांपैकी ७ जलाशये कोरडी पडली आहेत. यापैकी ६ जलाशये दक्षिणेतील आहेत. देशात आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये चिंता जास्त वाढली. महाराष्ट्रातही पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा १३ टक्क्यांनी कमी आहे. शेकडो गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाढत्या पाणीटंचाईचा फटका शेती आणि पशुधनाला जास्त बसणार, असे शेतकरी सांगत आहेत.
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोण निवडून येणार आणि कोण पडणार, या चर्चेने रान उठले. पण दुसरीकडे देशातली मोठमोठी धरणे कोरडी पडत आहेत. जनावरांसह माणसांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दक्षिणेत तर हे संकट आणखी गंभीर होत आहे. महाराष्ट्रातही शेकडो छोटी धरणे कोरडी पडली आहेत.
देशातील सर्वांत मोठ्या १५० जलाशयांपैकी ७ जलाशये कोरडी पडली आहेत. यापैकी ६ जलाशये दक्षिणेतील आहेत. देशात आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये चिंता जास्त वाढली. कारण आंध्र प्रदेशातील जलाशयांमध्ये केवळ ७ टक्के पाणीसाठा आहे, तर बिहारमध्ये केवळ ३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या देशातील ९ जलाशयांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. १०० टक्के पाणीसाठा तर एकाही जलाशयात नाही. ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असलेला एकच जलाशय आहे. ९८ जलाशयांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे.
महाराष्ट्रातही पाण्याने चिंता वाढवली. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. मराठवाड्यातील स्थिती भयावह असून केवळ १७ टक्के पाणी आहे. मराठवाड्याचे महत्त्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात १० टक्क्यांपेक्षाही कमी पाणी आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील हजारहून जास्त गावांना टॅंकरने पाणी सुरू आहे. केवळ मराठवाड्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भातही पाण्याची स्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली. राज्यातील शेकडो छोटी धरणे कोरडी पडली आहेत.
खरिपावरही संकट
धरणांमध्ये पाणीसाठा घटल्याचा फटका माणसांना तर बसतच आहे. पण शेती आणि पशुधनाला जास्त फटका बसत आहे. उन्हाळी पिके आणि खरिपाच्या आगाप लागवडीसाठी पाण्याची गरज असते. उत्तरेत अशी लागवड जास्त होत असते.
पण सध्या धरणांमध्येच पाणीसाठा कमी असल्याने बहुतांशी भागात शेतीचे पाणी कमी केले आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये पाणी बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केले जाऊ शकते. यामुळे शेतीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
दहा वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा
केंद्रीय जल आयोगाने आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगितले, की देशातील महत्त्वाच्या १५० धरणांमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच धरणांमधील पाणीसाठा तब्बल ९६ टक्के होता. तर आधीच्या वर्षीच्या तुलनेत ८२ टक्के पाणी शिल्लक होते. पण सध्या केवळ सरासरी ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यावरून देशात पाण्याची स्थिती किती चिंताजनक आहे, हे लक्षात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.