सूर्यकांत बनकर
Solapur News : करकंब परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना तीव्र दुष्काळी परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईला सामोरे जातानाच एप्रिल छाटण्या कराव्या लागत असल्याने टँकरने विकतचे पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत.
करकंबसह परिसरातील बार्डी, जाधववाडी, पेहे, नेमतवाडी आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बार्डी, जाधववाडी व करकंबच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी तर लाखो रुपयांची कर्ज प्रकरणे करून उजनीच्या डाव्या कालव्यावरून जलवाहिन्या करत द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. परंतु या वर्षी उजनीच्या पाण्याचे हुकलेले नियोजन आणि तीव्र दुष्काळी परिस्थिती याचा द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना सध्या सामना करावा लागत आहे.
द्राक्ष हंगाम संपताच शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करताना बागांची एप्रिल खरड छाटणी करावी लागते. सदर छाटणीनंतरच काडी तयार तयार होत असल्याने पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. परंतु सध्या शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या बोअर आटल्याने त्यांना विकत टँकरने पाणी घालून बागा जगवाव्या लागत आहेत, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरची पाणीपातळी खालावल्याने उपलब्ध असणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी असून त्यातील पाण्यावरच त्यांची भिस्त असून ते संपल्यावर पुढे काय, हा प्रश्नही त्यांच्या पुढे उभा आहे. त्यातच सध्या तापमानाचाही पारा वाढत असल्याने या वर्षी काडी कशी तयार होणार आणि पुढील हंगाम कसा जाणार ही चिंता आतापासूनच लागून राहिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.