सांगली : जत तालुका पशुवैद्यकीय विभागाचा कारभार पशुधन विकास विस्तार अधिकाऱ्याविना सुरू आहे. कारभार हंगामी अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. ४४ पदे रिक्त आहेत. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने साडेतीन लाख जनावरांची हेळसांड सुरू आहे. लसीकरण वेळेवर होत नाहीत. विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. खिलारी जनावरे व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशाचे वैभव आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. भूमिहीन शेतमजूर, ऊससोडी मजूर शेळीपालन करतो. तालुक्यामध्ये एकूण जनावरांची संख्या ३ लाख ४९ हजार ८९५ इतकी झाली आहे. त्यामध्ये गाई-बैल ७० हजार ९९६, म्हशी ७० हजार ५८, शेळ्या ४५ हजार ९६४, मेंढ्या १ लाख ६२ हजार ८७७ इतक्या आहेत. पशूंच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यामध्ये पशुविकास विस्तार अधिकारी, पशुधन विकास अधिकारी ही पदे मंजूर आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पदे कायमस्वरूपी रिक्त आहेत. दवाखान्यावर कोट्यवधींचा खर्च केला जातो. सध्या दरीबडची, उमदी, सोन्याळ, बोर्गी, सनमडी, बाज, माडग्याळ, वज्रवाड, शेगाव या दवाखान्यांतील पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या दवाखान्यांचा पदभार हंगामी डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. त्यांच्याकडे अगोदरच अन्य दवाखान्यांच पदभार आहे. आठवड्यातील फक्त दोन किंवा तीन दिवसच दवाखाना सुरू असतो. आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत, त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होते.
पशुवैद्यकीय विभागातील जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. लोकप्रतिनिधींना रिक्त पदाची माहितीही दिली आहे. - डॉ. स्वप्नील सोनार, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी
श्रेणीनिहाय दवाखाने : श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखाने एकूण : १४ जत, दरीबडची, उमदी, संख, कुंभारी, आवंढी, येळवी, बोर्गी, सोन्याळ, सनमडी, उमराणी, वज्रवाड, माडग्याळ, बाज.
श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखाने एकूण ०९ : वाळेखिंडी, डफळापूर, अंकले, शेगाव, बिळूर, तिकोंडी, मुचंडी, कोत्येंबोबलाद, वळसंग.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.