एक किलो सूतनिर्मितीसाठी होतोय ४० रुपये खर्च
एक किलो सूतनिर्मितीसाठी होतोय ४० रुपये खर्च 
मुख्य बातम्या

एक किलो सूतनिर्मितीसाठी होतोय ४० रुपये खर्च

Chandrakant Jadhav

जळगाव : राज्यातील वीज कंपनीने विजेचे दर वाढविल्याने राज्यातील सूतगिरण्या, जिनिंग प्रेसिंग कारखाने आदींना फटका बसत असून, एका २५ हजार चात्यांच्या सूतगिरणीला दर महिन्याला तुलनेने किमान २० लाख रुपये, तर ५२ हजार चात्यांच्या सूतगिरणीला ४० लाख रुपये अधिक वीजबिल येत आहे. जिनिंगनाही ७० हजार ते एक लाख रुपये जादा वीजबिल येत असून, सूत उत्पादनाचा खर्च किलोमागे १२ ते १३ रुपयांनी वाढला आहे. त्यातच सूत निर्यात व प्रोत्साहन अनुदानासंबंधीच्या अडचणी असल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आल्याची स्थिती आहे.  राज्यात सुमारे १४९ सूतगिरण्या सुरू असून, त्यात ५३ गिरण्या सहकारी आहेत. विजेचे दर सूतगिरण्यांसाठी सात रुपये प्रतियुनिट, असे होते. परंतु हे दर वाढवून ते नऊ रुपये प्रतियुनिट, असे केले आहेत. २५ हजार चात्यांच्या गिरणीत रोज १५ मेट्रिक टन सूताचे उत्पादन होते. एक किलो सूत उत्पादनासाठी २८ रुपयांपर्यंचा खर्च तीन महिन्यांपूर्वी येत होता. परंतु वीजदर वाढल्यानंतर हा खर्च किमान ४० रुपये प्रतिकिलो, असा झाला आहे. राज्यातील काही सूतगिरण्या एक लाख चात्यांच्या तर काही ५२ हजार आणि कमाल सूतगिरण्या या २५ हजार चात्यांच्या आहेत. ५२ हजार चात्यांच्या सूतगिरणीला रोज ७० ते ८० हजार युनिट विजेची गरज असते. तर २५ हजार चात्यांच्या सूतगिरणीला रोज ३५ ते ४० हजार युनिटची गरज असते. वीज दरवाढीनंतर राज्यातील सूतगिरण्यांना दर महिन्याला मिळून ४५० कोटी रुपये जादा मोजावे लागत आहेत. शासनाने सहकारी सूतगिरण्यांना प्रतियुनिट तीन रुपये व खासगी सूतगिरण्यांना दोन रुपये प्रतियुनिट अनुदान देण्याचे म्हटले आहे. हे अनुदान देताना मागील तीन महिन्यांमध्ये जे जादा वीजबिल द्यावे लागले, त्यासंबंधीची भरही काढावी, असा मुद्दा वस्त्रोद्योगातील जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.  जिनिंगनाही वीजदरवाढीचा फटक बसत असून, दर महिन्याला ७० हजार रुपये जादा बिल येत आहे. एका ११० गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनक्षमता असलेल्या जिनिंगला महिन्याला ३५ ते ४० हजार युनिटची आवश्‍यकता असते. जवळपास साडेनऊ रुपये प्रतियुनिट, असे दर जिनिंग व्यावसायिकांना द्यावे लागत आहेत. राज्यात सुमारे ८०० जिनिंग प्रेसिंग कारखाने असून, या सर्वांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. महागडी वीज व इतर बाबींमुळे गाठींचा उत्पादन खर्च यंदा सात टक्‍क्‍यांनी वाढला आहे. जिनिंगना मिळून दर महिन्याला ४० ते ४५ कोटी रुपये वीजबिलासंबंधी जादा अदा करावे लागत असल्याची माहिती मिळाली. 

वस्तू व सेवा करासंबंधीची किचकट प्रक्रिया जिनिंग प्रेसिंग कारखानदारांसमोर अडचणीची आहे. त्यातच वीजबिल आता दर महिन्याला ७० हजार ते एक लाख रुपये अधिक येते. मजुरी, वीज, वाहतूक खर्च आदींमुळे एका गाठीचा उत्पादन खर्च मागील हंगामाच्या तुलनेत सात टक्‍क्‍यांनी वाढला आहे. - संदीप पाटील, जिनिंग प्रेसिंग कारखानदार, जळगाव शासनाकडून साडेचार वर्षांपूर्वी सूत निर्यातीसंबंधी प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) अनुदान दिले जायचे. ते बंद झाले. नंतर वीजदरवाढ करण्यात आली. यामुळे आमच्या सूतगिरणीचा उत्पादन खर्च वाढला. शासन विजेसंबंधी अनुदान देणार आहे. परंतु ते देताना वीज दरवाढीसंबंधीची भरही निघायला हवी.  - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी,  उंटावद होळ (ता. शहादा, जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT