दापोली, जि. रत्नागिरी : हिरवे सोने (ग्रीन गोल्ड) म्हणून मेक्सिकोत ख्याती असलेल्या ॲव्होकॅडो (लोणी फळ) फळाची शेती नजीकच्या काळात कोकणात पाहावयास मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या अनुषंगाने ॲव्होकॅडो फळ पिकाची प्रायोगिक लागवड करून संशोधन सुरू केले आहे. पुढील चार वर्षांत या प्रयोगाचे निष्कर्ष मिळाल्यानंतर त्यास व्यावसायिक लागवडीकरिता मान्यता मिळेल. २०२५नंतर कोकणातील शेतकऱ्यांसाठी आंबा, काजूसह ॲव्होकॅडो हे अतिरिक्त फळपीक ठरू शकेल.
कोकणात दमट आणि उष्ण हवामानामुळे येथे विविध फळपिकांच्या लागवडीची संधी कमी असते. हापूस आंबा, काजूसह नारळ, सुपारी या पिकांचीच व्यावसायिक शेती या भागात केली जाते. इतर देशांप्रमाणे कोकण पट्ट्यात ॲव्होकॅडो लागवडीस पोषक वातावरण आहे. मात्र याची व्यावसायिक शेती करण्यापूर्वी जात, पीक व्यवस्थापन पद्धत, रोग-कीड नियंत्रण आदी बाबींवर संशोधन आवश्यक आहे. याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ॲव्होकॅडो लागवडीबाबत प्रायोगिक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.
गेल्या वर्षी विद्यापीठाच्या वाकवली येथील प्रक्षेत्रावर ॲव्होकॅडोच्या दोन जातींची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी फळधारणा, कीड- रोगनियंत्रण, पीक व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी दिली. डॉ. सावंत म्हणाले, ‘‘वाकवली प्रक्षेत्रावर दोन जातींच्या २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र कोकणातील हवामानानुसार नियमित फळधारणेचा विषय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षी आम्ही रूटस्टॉक आणि जाती आयात केल्या. मालोमा, हास या ॲव्होकॅडोच्या सर्वसामान्य जाती आहेत, त्यांना निर्यात मूल्यही आहे. मात्र आम्ही जे रूटस्टॉक (मूळकांड) याकरिता वापरले आहेत, ते पेटेंटेड आहेत. प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून ते आणलेले आहेत. एक वर्ष ते क्वारंटाइनमध्ये ठेवावे लागतात. मात्र हे वाण ‘ओपन क्वारंटाइन’ आहेत. एक वर्षानंतर आम्हाला क्वारंटाइनमधून खुले करण्यास मंजुरी मिळेल. तोपर्यंत आमच्या अपेक्षेप्रमाणे सर्व झाल्यास दुसऱ्या वर्षापासून थोडी फळधारणा सुरू होईल. संशोधन काळातील संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे आल्यानंतर व्यावसायिक लागवडीसाठीची आदर्श पीक लागवड पद्धत तयार करावी लागते. यानंतर शेतकऱ्यांसाठी या पिकाची शिफारस केली जाईल.’’
या प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. पी. बी. सानप म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वाकवली प्रक्षेत्रावर ॲव्होकॅडोच्या हास आणि मालुमा जातींची प्रतिकारक्षम अशा तीन रूटस्टॉकवर कलमे करून लागवड करण्यात आली आहे. या प्रयोगामध्ये बुरशीजन्य रोगास सहनशील, नियमित रोपांपेक्षा अधिक उत्पादन आणि पाणथळ जमिनीतही वाढीची क्षमता या मुद्यांवर संशोधन करण्यात येत आहे. प्राथमिक निरीक्षणात मूळकांडावरील रोपांची वाढ चांगली होत आहे. दोन वर्षांनंतर प्राथमिक उत्पादन सुरू होईल, व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यास चार ते पाच वर्षे लागतील. या नंतरच योग्य निष्कर्षाला पोहोचता येईल.’’
उत्पादन, आयात-निर्यात प्रमुख उत्पादक देश : मेक्सिको, चिली, डोमेनिकन प्रजासत्ताक, इंडोनेशिया, अमेरिका, कोलंबिया, पेरू, केनिया, ब्राझील, रवांडा, चीन, गुटेमाला, स्पेन, कांगो, व्हेनेझुएला, इस्राईल, दक्षिण आफ्रिका, कॅमेरून, हैती, ऑस्ट्रेलिया. प्रमुख निर्यातदार देश : मेक्सिको, पेरू, कोलंबिया, चिली, आफ्रिका, स्पेन इ. प्रमुख आयातदार देश : उत्तर अमेरिका, नेदरलॅण्ड, जपान, चीन, दक्षिण कोरिया, रशिया इ. प्रमुख उत्पादक राज्य : तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, सिक्किम
नैसर्गिक आपत्तीत आणि बदलत्या हवामानात आंबा, काजू पिकांवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पुढील काळात शेतकऱ्यांना आर्थिक सधन करेल, अशा ॲव्होकॅडो या फळपिकाच्या लागवडीचा प्रयोग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून केला जात आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री
गेल्या वर्षी कृषी विद्यापीठाच्या वाकवली येथील प्रक्षेत्रावर ॲव्होकॅडोच्या दोन जातींची लागवड करण्यात आली असून, या बाबत सविस्तर अभ्यास केला जात आहे. संशोधन काळात फळधारणा, रोगनियंत्रण, पीक व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास केला जाणार आहे. संपूर्ण संशोधनाअंती व्यावसायिक लागवडीसाठीची आदर्श पीक लागवड पद्धत तयार करून शेतकऱ्यांसाठी शिफारस केली जाईल. - डॉ. एस. डी. सावंत, कुलगुरू
ॲव्होकॅडोची ओळख शास्त्रीय नाव : पर्शीया अमेरिकाना (Persea americana) मूळस्थान : मेक्सिको कुळ : लॉरॅसिई (Lauraceae) प्रमुख जाती : चोक्वेट, ग्वेन, लुला, पिंकर्टन, रीड, पर्पल, ग्रीन, फ्युर्ट, पोलॉक, टि. के. डी-१, हास, मालुमा इ. या घटकांनी परिपूर्ण : ओलिक ॲसिड, स्निग्ध पदार्थ, पोटॅशिअम, कॅल्शिअम, क्लोरिन, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, गंधक, ॲस्कॉर्बिक आम्ल, जीवनसत्त्व- बी, ई, के. फळांना मागणी : पोषणमूल्यांच्या गुणधर्मामुळे औषध, सौंदर्यप्रसाधन, अन्न प्रक्रिया उद्योगात मागणी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.