दुष्काळाचा फटका
दुष्काळाचा फटका 
मुख्य बातम्या

हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌ पाण्यासाठी वणवण (video)

Santosh Munde

जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ टॅंकर घेऊन फिरणारे शेतकरी, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश न आल्याने सरपण झालेल्या फळबागेवर चालविलेली कुऱ्हाड, अपवाद वगळता पाण्यासाठी आसुसलेले शेततळे, कर्जमाफी, कर्ज न मिळणे, विमा परताव्याचे भिजत घोंगडे व त्यातील घोळ, बाग वाचविण्यासाठी जवळची जमापुंजी खर्च करावी की खरिपाची सोय लावावी या चिंतेने दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

यंदाच्या दुष्काळात होरपळणारे जालना जिल्ह्यातील शेतकरी या आधीच्या दुष्काळात असं नव्हतं म्हणताना दिसतात. गतवर्षी जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६१ टक्‍केच पाऊस झाला. चार तालुक्‍यांत पावसाचा टक्‍का ६० च्या आत राहिला. बहुतांश भागात पंचमीनंतर पावसाने मारलेली दांडी, त्यामुळे हातचा गेलेला खरीप, रब्बीला बसलेला फटका, त्यामुळे धान्य आणि पाणी विकत घेण्याची आलेली वेळ, जनावरांचा चारा व पाण्याचा निर्माण झालेला प्रश्न, मे महिन्याच्या मध्यानंतर काही तोकड्या प्रमाणात सुरू झालेल्या चारा छावण्या, हाताला काम नसल्याने रोजगाराचा निर्माण झालेला प्रश्न, त्यामुळे वाढत असलेले स्थलांतर साऱ्याच आघाड्यावर जालना जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थांची परीक्षा सुरू आहे. खरीप, रब्बीची पीक गेली पण विमा परतावा नाही, ज्यांना फळबागांचा विमा मिळाला त्यांचा त्यापेक्षा कित्येक पट खर्च पाण्याच्या शोधात होतो आहे. त्यामुळे मिळालेले पैसे बागा जगविण्यात घालावे की खरिपाची सोय कशी लावावी, तेथून पुढे पीक येईपर्यंत कुटुंबाचा चरितार्थ भागवावा कसा हा प्रश्न येथील शेतकरी कुटुंबांना भेडसावतो आहे. दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष पहा Video

अनेक कुटुंबातील मुलांना शाळेच्या सुटीचा आनंद न घेता या सुटीत आपल्या शिक्षणाला लागणारा खर्च भरून काढण्यासाठी पालकांना मदत म्हणून हाताला मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. बागांच्या भागात पाण्यासाठी रानोमाळ फिरणारे टॅंकर, पाणी मिळेल या आशेपोटी खोदल्या जाणाऱ्या विहिरी, बोअरमधून केवळ धुराळाच बाहेर पडताना दिसत आहे. शासनाच्या योजनांचे आकडे बरंच काही झाल्याचं सांगत असले तरी प्रत्यक्षात काय होते आहे याची कल्पना गावपातळीवर नसल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचूनही उपयोग नाही जालना जिल्ह्यातील ॲग्रोव्हीजन गटशेती संघाच्या शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्येच जिल्हा प्रशासनाला भविष्यात उद्‌भवणाऱ्या फळबागांवरील संकटाची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आपले प्रश्न, समस्या मांडण्यासाठी व्हॉट्‌स ॲप नंबर दिला होता. त्यावर ऍग्रोव्हीजन गटशेती संघाच्या माध्यमातून ११ मे रोजी समस्या टाकण्यात आली होती. चोवीस तासांत त्यावर आपली समस्या संबंधितांकडे पाठविण्यात आली आहे, लवकरात लवकर अपेक्षित उत्तर मिळेल असे कळविले गेले. परंतु, त्याचाही काही उपयोग झाला नाही कारण पाण्याचा खर्च आवाक्‍यात नसलेल्या फळबागधारकांना अजूनही पाणी मिळालेच नाही. त्यामुळे बागा जाण्याचे प्रमाण दिवसागणीक वाढत चालले आहे. बागा गेल्यास किमान पाच ते दहा वर्षे या बागा  पुन्हा उभ्या करण्यासाठी लागतील, असे ॲग्रोव्हीजन गटशेती संघातील शेतकऱ्यांनी सांगितलं.

भूजल पातळीतही घट जालना जिल्ह्यातील भूजल पातळीत मार्चअखेर २.४२ मीटरची घट नोंदली गेली आहे. त्यामध्ये बदनापूर तालुक्‍यात सर्वाधिक ३.३७ मिटरची घट झाली. त्यापाठोपाठ जालना तालुक्‍यात २.३४, भोकरदन तालुक्‍यात २.७९, अंबड तालुक्‍यात १.३६, परतूर तालुक्‍यात २.७३, मंठा तालुक्‍यात २.४३ तर घनसावंगी तालुक्‍यात १.६७ मीटरची घट नोंदली गेली होती.

खामखेडावासीयांना पाणी विकत घेण्याची वेळ गावात टॅंकर सुरू नसल्याने भोकरदन तालुक्‍यातील खामखेडा येथील बहुतांश ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही मिळेल तिथं नेऊन शुद्ध, अशुद्ध पाण्याचा विचार न करता पाणी पाजावे लागत असून, आसपास चारा छावणी नसल्याने जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना आहे. परंतु, तिला पाणी नाही. योजना असल्याने टॅंकर सुरू झाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

‘जलयुक्‍त’ची १३ टक्‍केच कामे पूर्ण २०१८-१९ वर्षासाठी जलयुक्‍त शिवार योजनेतंर्गत जालना जिल्ह्यातील २०६ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये आराखड्यानुसार ३५३० कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५८ कामे पूर्ण झाली होती. १७८८ कामांना अजूनही सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

छावण्यांची संख्या तोकडी जालना जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यात जवळपास १८ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जनावरांची चारा, पाण्यासाठी होणारे हाल थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाला उशिराने शहाणपण सुचले. मंजुरी ३२ छावण्यांना असली तरी प्रत्यक्षात सुरू झालेल्या चारा छावण्यांची, त्यांना मंजूर जनावरांची संख्या कमी असल्याने जनावरांचे हाल कायम आहेत.

दुधाचे अनुदानच नाही उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाला दर मिळत नसल्याने शासनाने दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देऊ केले. परंतु, प्रत्यक्षात गत तीन महिन्यांचे अनुदान मिळाले नसल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. दरदिवशी जवळपास अडीचशे लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या बदनापूर तालुक्‍यातील वरूडी येथील दूध उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.   अस्तरीकरणाविना पडून आहेत शेततळे विविध शेततळे योजनेतून जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळी उभारली गेली. एकट्या मागेल त्याला शेततळे योजनेतून ८ हजारांवर शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. परंतु, या शेततळ्यांमध्ये पाणी साठविण्याइतकाही पाऊस गतवर्षी झाला नाही. शिवाय सततच्या दुष्काळामुळे शेततळ्यांना अस्तरीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. उद्दिष्ट तुटपुंज मिळतं असल्याने सर्वच शेततळ्यांचे अस्तरीकरण करणे शक्य होत नाही. तीन महिन्यांत देयकं ऑनलाइन सादर करावयाची असली तरी पूर्वसंमती महिनाभरातच होत असल्याचा अनुभव वरूडीच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविला. त्यामुळे वरूडीतील ७० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेततळे बांधूनही त्यात पाणीच साठविता आले नसल्याची स्थिती आहे. शेतकरी प्रतिक्रिया एक एकर शेती असल्यानं पूरक म्हणून दुग्धव्यवसाय संकलन करतो. जनावरांना चारा, पाणी सारं इकत सुरू आहे. गत तीन महिन्यांत शासनाचे अनुदान अजून मिळाले नाही. जगण्याची, जनावरं जगविण्याची मोठी कसरत सुरू आहे. - परमेश्वर शिंदे, दूध उत्पादक, वरूडी, ता. बदनापूर.

दुष्काळामुळं मोसंबीची बाग तोडावी लागली. निसर्गामुळं शेती साथ देईना म्हणून  पूरक उद्योग म्हणून शेळीपालन करावं म्हणलं ना मराठवाडा पॅकेज कुठं गेलं ते कळलं ना आधार मिळाला. त्यामुळं होत्या त्या शेळ्या कमी कराव्या लागल्या. - पंडित शिंदे, वरूडी, ता. बदनापूर.

गावाजवळून लहूकी नदी जाते. तिला पूर येत नाही असं झालं नाही. पण गावशिवारात तीनशे फुटापेक्षा जास्त मोठं पात्र असलेल्या या नदीवर दहा किलोमीटरच्या परिसरात एकही कट्‌टा नाही. त्यामुळं पाणी अडत नाही अन्‌ जिरतही नाही. अनेक वर्षांपासून याविषयी मागणी असूनही निर्णय घेतला जात नाही. - जयकिसन शिंदे, शेतकरी, वरूडी, ता. बदनापूर.

शेती २५ एकर. कापूस, तूर, सोयाबीन पिकांतून यंदा चार आणेच वसूल झाले. पंचमीपासून पाऊस गेला तो आलाच नाही, रब्बीही साधला नाही. आता येत्या खरिपासाठी आवश्यक किमान चार लाखांच्या खर्चाची सोय लावण्याची चिंता आहे. - विष्णू नागवे, खामखेडा, ता. भोकरदन

दिवाळीपासून माणसांनाच पाणी इकत घेऊन प्याव लागत तिथं जनावरांचे हाल  इचारू नका. आसपास काय भोकरदन तालुक्‍यात कुठंही छावणी हाय का नाही हे कळलं नाही. त्यांना खायलाच नाही तर ते दूध कुठून देतील. जनावरं इकावी तर  त्यांना कुणी घेतही नाही. - श्रीमंत नागवे, खामखेडा, ता. भोकरदन.

प्यायपुरतं पाणी कसंबसं येतयं. खरीप, रब्बी गेला, विमा उतरविला पणं परतावा मिळाला नाही. पाणी आल्याशिवाय खरिपाची सोय लावण्याचं मनात नाही. - काळूबा हिवाळे, देळेगव्हाण, ता. जाफ्राबाद.

कष्टानं उभी केलेली बाग वाचविण्यासाठी पाणी मिळलं म्हणून सहा बोअर घेतले पणं थेंब नाही. उन्हाचा सामना करणारी आंब्याची झाडंच वाळून चालली. पहावत नाही पण आसपास पंचक्रोशीत पाणी नाही, काय करावं काही सुचेना. विमा उतरविला पण परतावा नाही, शासनही काही आधार देईना. - हरीश मोरे,नळविहिरा, ता. जाफ्राबाद.

खरिपाची पिकं गेली, रब्बीचीही गेली पण कुणी पहायला, पंचनामा करायला आलं  नाही. यंदा लई बिकट परिस्‍थिती झाली. - महादू गाडेकर, नळविहिरा, ता. जाफ्राबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT