दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने लावले ग्रहण
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने लावले ग्रहण 
मुख्य बातम्या

दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने लावले ग्रहण

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर लष्करी अळीने आलेल्या संक्रातीने अनेकांच्या दावणीलाच ग्रहण लागले आहे. चार- दोन महिने चारा विकत आणता येईल. पण वर्ष-दीड वर्ष चारा विकत आणायचा म्हणजे शक्‍यच नाही. तरीही शेतकऱ्यांनी उसनवार, पदरमोड, कर्ज उभारून दावणे शाबीत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण खरिपातील ज्या मका पिकापासून चारा उपलब्ध होणार होता त्या मकावरच लष्करी अळीने घाला घातला. एकही फवारणी न लागणारी मका जवळपास तीन फवारण्या करून चाऱ्यासाठी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण अळीच्या लष्कराने सारी गणितं बिघडवली. उत्पन्नही गेले अन्‌ दिसत असलेली मका जनावरांना खाऊही घालता येत नाही. त्यामुळे उभ्या ठाकलेल्या चारा प्रश्‍नाने अनेकांच्या दावणी झपाट्याने रीत्या होत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दीडशे उंबऱ्याच दरकवाडी गाव. हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या या गावातील रामेश्‍वर तात्याराव वाघ, बाबासाहेब जगन्नाथ वाघ, गणेश रामलाल बाहेती ही त्यांच्या जनावरांच्या दावणीला ग्रहण लागलेली प्रातिनिधिक उदाहरणे. प्रत्येकाची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात त्यांच्या सारखीच. 

रामेश्‍वर वाघ म्हणाले, ‘‘लहान मोठ्या चौदा जणांच्या त्यांच्या कुटुंबाकडे १८ एकर शेती. त्यात १३ एकर फळबाग, त्यात मोसंबी, डाळिंब, द्राक्ष अशी पिकं. उरलेल्या पाच एकरात खरीप रब्बीत जनावरांच्या चाऱ्याची सोय लागेल अशी पिकं घेण्याची पद्धत. कुटुंबातील सारेच शेतीत राबतात. कुटुंबाचा खर्च, शेतीचे व्यवहार भागावे म्हणून २००१ मध्ये दोन दुभत्या गायी घेऊन शेतीला दूध व्यवसायाची जोड दिली. हाती खेळता पैसा राहू लागल्याने त्यांनी २००८ पर्यंत गायींची संख्या १० वर, तर २०१८ पर्यंत १८ वर नेऊन पोहोचविली. दरम्यान २०१२ पासून सातत्याने दुष्काळाचं सत्र सुरू झालं. पण कधी फळबागेतून तर कधी मिळणाऱ्या कर्ज व इतर पद्धतीने उभ्या केलेल्या पैशातून धकत गेलं. पण गेल्या वर्षीच्या दुष्काळाला तोंड देताना जवळपास आठ लाख रुपये विकतच्या पाण्यावर खर्च करून कवडीचंही उत्पन्न न घेता फळबागा जगविण्यासह जनावरं जगविली. आशेवर असताना खरिपात पुन्हा पावसाची अवकृपा झाली. 

अनेकदा दोनशे रुपये टॅंकरनं पाणी इकत घेतलं. जवळपास ८० हजाराचं पाचट फळबागांना आच्छादनासाठी आणलं. चार, पाच किलोमीटरवरून मिळेल तिथून पाणी आणणं अन्‌ भागवणं सुरू असतानाच १८०० रुपये टनानं मिळणारा ऊस ४५०० ते ५५०० रुपये प्रतिटनावर पोहोचला. तर १२ ते १५ रुपयांना मिळणारी कडब्याची पेंढी ३५ ते ४० रुपये मोजूनही मिळेनाशी झाल्यानं सारं अवघड होऊन बसलं. दुधातून मिळणारे खेळते पैसे, अन्‌ मोसंबीतून मिळालेले आठ लाख यात चक्र घुमवत गेलो. पण ज्या मक्यावर चाऱ्याची भिस्त होती ती मका लष्करी अळीनं फस्त केली. पाणी इकत, चारा इकत रोटेशन घुमणं अवघड झाल्यानं २०१८ मध्ये पहिल्यांदा दोन गायी विकल्या. त्यानंतर अठरा पैकी सोळा गायी टप्प्याटप्यानं जवळपास दीड वर्षात विकाव्या लागल्या अन्‌ शेतीला दिलेली पूरक उद्योगाची जोड थांबली. आता केवळ आठ कालवडी व तीन म्हशीच शिल्लक राहिल्या. त्यांच्याही चारा पाण्याचा प्रश्‍न आहे. दोन वर्षांपासून बागांमधून मोसंबीतून मिळालेलं उत्पन्न वगळता हाती काहीच नाही. चौदा जणांच्या कुटुंबाला महिन्याला नाही म्हटलं तरी किमान ५० हजार खर्च लागतो. दुधाच्या पूरक उद्योगाचा आधार होता, पण आता तोच गेलाय. तीन शेततळे, चार विहिरी, पण त्यात पाणी नाही. एका विहिरीला कसंबसं जनावरांचं भागण्यापुरतं पाणी येतंय आता. पावसाची अन्‌ निसर्गाची अवकृपा कायम राहिल्यास भीषण संकट आहेच.’’

आशेवर जगणं सुरू आहे बाबासाहेब वाघांनी तीन वर्षांपूर्वी दहा गायींपासून सुरू केलेला पूरक उद्योग सहा महिन्यांखाली संपला. ते म्हणाले, ‘‘चार एकर शेतीला लाखभर रुपये दरवर्षी खर्च होतो. गेल्या हंगामात एक लाख खर्च झाले. तेवढंच उत्पन्न झालं. शिवाय जनावरं जगविण्यासाठी चारा पाणी इकत सुरू झाल्यानं काही महिने प्रयत्न केले. पण मेळ जमनां म्हणून सहा महिन्यांखाली प्रत्येकी ५० ते ५५ हजाराला घेतलेल्या गायी दोन टप्प्यांत २१ हजार प्रतिप्रमाणे विकून टाकाव्या लागल्या. सात लोकांच्या कुटुंबाला नाही म्हटलं तरी वर्षाला कमीत कमी तीन लाख खर्च धरून चला. त्यात आधी मका संपवणाऱ्या अळीनं आता बाजरीलाही संपवणं सुरू केलंय. आणखी काय काय संपवते कुणास ठाऊक. त्यामुळं यंदा उत्पन्नाची आशा नाही. शेतीवर जगणं म्हणजे सार अवघडं होऊन बसलं. निसर्ग साथ देईल या अपेक्षेनं जगणं सुरू आहे.’’

सारं विकत करणं शक्‍य नाही... जवळपास सात ते आठ वर्षांपासून ५० दुभत्या गायीचा आजवर सांभाळ करणारे गणेश रतनलाल बाहेती म्हणाले, ‘‘यंदा मका बी गेली अन्‌ बाजरी बी गेली जनावरांचं सगळंच गेलं. मक्याचं दहा एकर क्षेत्र होतं. सहा एकर मोडली उरलेली मोडतोय. लष्करी अळीनं एवढी मका संपवली की तिच्याकडं बघितलंच जात नाही, तर ती जनावरांना खाऊ कशी घालावी? जनावरं मरत असल्याची उदाहरणं आहेत. पानं, कणसं शेंड्या अळीचा विळखा होता. दररोज सहा क्‍विंटल चारा लागतो. त्यामुळे १५ जनावरं विकावी लागली.

सततच्या दुष्काळाने जवळपास १०० एकर डाळिंब, ४० ते ५० एकरापर्यंत द्राक्ष व ५० एकरापर्यंत मोसंबीचे क्षेत्र उरलेल्या दरकवाडीत किमान शंभर शेततळी असतील असे गावकरी सांगतात. पण एकाही शेततळ्यात पाणी नाही. २०१२ च्या दुष्काळात किमान १०० एकर, तर गेल्या वर्षी किमान ५० एकर बाग गेल्याचे शेतकरी सांगतात. २०१२ ला गेलेल्या बागांचे पंचनामे झाले. पण यंदा गेलेल्या बागांचे पंचनामेच नाही. गेल्या वर्षी अन्‌ यंदाही अजून शेततळी भरून घेण्याची संधी मिळाली नसल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT