अडीच महिन्यांनी पीक नुकसान काय पाहणार? 
मुख्य बातम्या

अडीच महिन्यांनी पीक नुकसान काय पाहणार?

‘पूर येऊन गेल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी तुम्ही येथे काय पाहणार? पूर ओसरताच तातडीने जर समिती आली असती, पीक नुकसान व परिस्थितीची भयानकता दिसली असती,’ अशा शब्दांत पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर आपला रोष प्रकट केला.

Raj Chougule

शिरोळ, जि. कोल्हापूर : ‘पूर येऊन गेल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी तुम्ही येथे काय पाहणार? पूर ओसरताच तातडीने जर समिती आली असती, पीक नुकसान व परिस्थितीची भयानकता दिसली असती,’ अशा शब्दांत पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर आपला रोष प्रकट केला. कोल्हापूर जिल्ह्यातील जुलै महिन्यातील महापूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला संतप्त शेतकऱ्यांच्या  तक्रारींना सामोरे जावे लागले. 

या वेळी ‘उसासारख्या पिकाचे प्रत्येक वर्षी सातत्याने नुकसान होत आहे, नुकसान झालेल्या उसासह भाजीपाला सोयाबीन उत्पादकाला भरीव मदत करावी,’ अशी मागणी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथक समोर केली. मंगळवारी (ता. ५) सकाळी अकराच्या सुमारास केंद्रीय पथकाचा ताफा शिरोळ तालुक्यात पीकपाहणी करण्यासाठी दाखल झाला. अडीच महिन्यांनंतर आलेल्या पथकातील अधिकारी गाडीतून उतरताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ‘बुके देऊन स्वागत’ करण्यासाठी धाव घेतली, परंतु पोलिसांनी त्यांना अडविले. एक तर अडीच महिन्यांनंतर पथक आले आहे, त्यांना आम्ही माहिती देण्यासाठी जात आहोत, तर तुम्ही आम्हाला बाजूला का काढता, असा सवाल संघटनेचे कार्यकर्ते सागर संभूशेटे यांनी करताच त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने बाजूला नेले. या वेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली.

यादरम्यान पथकाने इतर शेतकऱ्यांशी संवाद साधत बुडालेल्या पिकांची माहिती घेतली. शिरोळ येथे सुमारे वीस फूट पाणी होते,  यामुळे उसाची मोठी हानी झाली आहे. याची गांभीर्याने दखल घ्यावी व जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना केली. पुराने बाधित झालेल्या घराची पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून केली. 

सध्या ऊस हिरवट दिसत असला तरी बुडालेल्या उसामध्ये उत्पादन अतिशय कमी येणार असल्याची वस्तुस्थिती केंद्रीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाणून दिली. या वेळी ऊस कसा खराब झाला आहे याचे प्रात्यक्षिक ही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. उसाला कोणत्याही योजनेतून शासकीय मदतीचा आधार नाही, उसाचे पीकविम्याची बसत नाही, यामुळे उसासारख्या पिकाची नुकसानभरपाई जास्तीत जास्त मिळावी, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांच्या मार्फत करण्यात आली. शिरोळ येथील शेतकरी गिरीश कवळेकर व कृषी मित्र युसूफ सिकंदर किरणे व अन्य उपस्थित शेतकऱ्यांशी पथक प्रमुख रेवनिष कुमार यांनी संवाद साधला. तालुक्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे, पण विमा उतरूनही विमा कंपन्या सोयाबीनचे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत, याकडे केंद्राने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी कुरुंदवाड मधील मध्ये शेतकऱ्यांनी केली.  कुरुंदवाड येथील ग्रामस्थ महेश दिवाजी जेवापे यांच्याशी केंद्रीय पाहणी पथकातील सदस्यांनी संवाद साधला. या वेळी श्री. जेवापे यांनी महापुरात त्यांचे घर व जनावरांच्या गोठ्यातील दोन म्हशी वाहून गेल्याची माहिती दिली, तसेच अजूनही अनुदान मिळाले नसल्याचे सांगितले. आम्हाला मदत करण्याचा अधिकार नसला, तरी जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही शासनाकडे मांडणार असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी या वेळी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.  समिती सदस्यांनी या वेळी झालेले पंचनामे व मिळालेली तातडीची मदत याची माहितीही जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ आदी अधिकाऱ्यांकडून घेतली. केंद्रीय पथकात प्रमुख वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनीष कुमार, नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, सनदी अधिकारी प्रताप जाधव यांचा समावेश होता.

सध्या शिवारात हिरवळ... तालुक्यात पुरामुळे भाजीपाला व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले परंतु नुकसान होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नुकसान सोसत दुसरी पिके घेतली. त्यामुळे सध्या जरी शिवारात हिरवळ दिसत असली, तरी तो शेतकरी नुकसानीतच आहे हे केंद्रीय पथकाला कसे कळणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून व्यक्त झाला. प्रशासनाची दुटप्पी भूमिका पूर ओसरून गेल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनी केंद्रीय पथकाने दौऱ्याचा फार्स केला आहे. तुम्ही उशिरा आला आहात हे सांगण्यासाठी आम्ही केंद्रीय पथकासमोर आलो, परंतु केंद्रीय पथक हे प्रशासनाचे नियोजन पाहण्यासाठी आले आहे, शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठी आले नाही, असा उलट जवाब जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिला. याचा मी निषेध करतो. कोणतीही मदत न देता शेतकऱ्यांची चालवलेली चेष्टा खपवून घेणार नाही. - सागर संभूशेटे,  स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT