Brave and stubborn Nakusa masala ‘
Brave and stubborn Nakusa masala ‘ 
मुख्य बातम्या

...कोण आहेत या नकुसा? ज्यांना भेटण्यास 'महिन्द्रा'चे अध्यक्षही उत्सू्क आहेत...

टीम अॅग्रोवन

‘ड्रायव्हर’... पुरुषांची मक्तेदारी असणारे हे क्षेत्र. पण, ही मक्तेदारी मोडून काढलीय नकुसा मावशी अर्थात नकुसा मासाळ यांनी. कोण आहेत या नकुसा मावशी, ज्यांना भेटण्यास महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्षही इच्छुक आहेत. त्या आहेत भाजीपाला विक्रेत्या आणि बोलेरो पिकअपच्या चालक..! 

गेल्या वीस वर्षांपासून नकुसा मावशी स्वतः ड्रायव्हर म्हणून काम करताहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली, जयसिंगपूर, वाठार, वारणा इथल्या भाजी बाजारातून भाजीपाला खरेदी करणे आणि तो भाजीपाला बोलेरो पिकअप या चारचाकी गाडीतून रत्नागिरी, राजापूर, लांजा या कोकण पट्ट्यात नेऊन विक्री करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय. भाजीपाला विक्री ठीक; पण सांगली ते कोकण हा प्रवास चारचाकी स्वतः चालक होऊन घेऊन जाणे आणि गेली वीस वर्षे सातत्याने हे काम करणे हे मोठे जिद्दीचे आणि धाडसाचे. हे काम या माऊलीने स्वीकारले आणि सर्वांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला. 

कोकणात जाणाऱ्या घाट रस्त्यात रात्री-अपरात्री स्वतः ड्रायव्हिंग करणे, या केवळ विचारानेच आपल्याला भीतीची चाहूल होते. पण, यावर यशस्वी मात केलीय नकुसा मावशीने आणि त्या बनल्यात मासाळ कुटुंबाचा आधार. घरातील कर्ता पुरुष ड्रायव्हर नोकरीच करायचा. पण, व्यसनाने हिरावून नेला. नकुसा मावशी हडबडल्या. पण, सावरल्या आणि वेगळी वाट निवडण्याचे धाडस केले. या धाडसाने कुटुंब उभे राहिले. सुरुवातीला त्यांनी गाडीवर ड्रायव्हर घेऊन भाजीपाला विक्रीस कोकणात जाण्याचे ठरवले. पण, पहिल्याच फेरीत त्याने धोका दिला. समोरचे घाटमार्गातले धुके पाहून मी घाट रस्त्यात कधी गाडी चालवली नाही, असे सांगत त्यांनी गाडी मध्येच सोडत पळ काढला आणि गाडीचे स्टेअरिंग नकुसा मावशीच्या हाती आले. हतबल नकुसा मावशी रात्रभर घाबरलेल्या अवस्थेत हळूहळू दरमजल करीत कोकणातला घाट उतरत्या झाल्या आणि इथून पुढे आता आपण स्वतः ड्रायव्हिंग करायचे, असे ठरवले. त्या आत्मविश्वासानेच त्यांना आजपर्यंत साथ केली आहे. 

तेव्हा हातात आलेल्या स्टेअरिंगने त्यांचे जगण्याचे चाक मात्र निर्धोक रस्त्याला लावले. तेव्हा RTO कार्यालयाने त्यांच्या धाडसाचे कौतुक करीत त्यांना वाहतूक परवाना दिला आणि सुरू झाला त्यांचा धाडसाचा आणि जिद्दीचा प्रवास. या व्यवसायात जम बसवत त्यांनी दोन मुलींची लग्ने केली. आता मुलगा त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतोय. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी त्या कोकण दौऱ्यावर असतात. आता थोडा व्याप वाढवलाय. दोन कामगार आणि मुलाच्या मदतीने त्या आसपासच्या दोन-तीन गावांतील बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला विक्री करतात. एका फेरीत त्या तीन चार टन भाजीपाल्याची विक्री करतात. कोबी, वांगी, टोमॅटो, गवार, कांडा, घेवडा, पडवळ, दुधी, दोडका, भेंडी, कारली असा सर्वच प्रकारचा भाजीपाला त्या विक्रीस नेतात. 

...त्या सहज गप्पांत, भीती वाटत नाही का? असा विषय आल्यावर म्हणाल्या, ‘बाई बी मीच आणि गडी बी मीच.’ खूप अनुभव वेगळे येतात; पण मी, माझी गाडी, गाडीतला माल आणि त्यो इकून परतणं एवढंच डोक्यात ठेवते.. चाललंय सगळं व्यवतशीर. रस्त्यात गाडी किरकोळ नादुरुस्त, पंक्चर झाली तर स्वतः पंक्चर काढणं, टायर बदलणं अशी कामं लीलया पार पाडतात. 

आता जरा स्थिरस्थावर होतायत. एवढ्या धावपळीतही गावाकडे शेतीत लक्ष घालताहेत. सांगलीतून जाऊन शेतीची मशागत करताहेत. जमीन कसताहेत. सांगलीत श्‍यामरावनगरमध्ये भाड्याच्या घरात त्या राहतात. गावाकडे छान निवारा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आलेय. त्यांच्या स्वप्नातला बंगला गावाकडे उभा राहतोय. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात आयुष्यभर केलेले कष्ट विरघळून जात असल्याचे दिसते. 

अशा या वेगळी वाट पकडून मक्तेदारीला आव्हान देत पाय रोवलेल्या नकुशा मावशींचा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे. अशा या नकुसा मावशीच्या धाडसाला आणि जिद्दीला आमचा सलाम. 

...आणि मावशी ‘सेलिब्रिटी’ झाल्या  काही दिवसांपूर्वी मिरजेतील ॲड. दीपा चौंदीकर यांना त्या कोकण रस्त्यात भेटल्या आणि त्यांचे धाडस सोशल मीडियातून सर्वत्र झाले आणि क्षणात त्या सेलिब्रिटी झाल्या. त्या ‘सेल्फी विथ नकुसा मावशी’ ठरल्या. त्यांची ही जिद्द सोशल मीडियातून थेट महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या कार्यालयातून नकुसा मावशीला फोनही आला. महिंद्राजींना मावशीचे खूप अप्रूप वाटले. त्यांच्याकडून मुंबईभेटीचे निमंत्रण ही येईल बहुधा... 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT