Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Article on Govind Hande : ‘जे जे आपणासी ठावे...’ या उक्तीनुसार गोविंद हांडे यांनी त्यांच्याकडील ज्ञान इतरांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने शेतीमाल निर्यातीसंबंधित अनेक व्याख्याने दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक निर्यातदार तयार झालेत. त्यामुळे त्यांच्या निधनाने आपला एक हक्काचा निर्यात तज्ज्ञ हरपल्याची भावना निर्माण झाली आहे.
Govind Hande
Govind HandeAgrowon

विजय कोळेकर

Indian Agriculture : ज्या काळात शेती खाते म्हणजे अनुदान देणारे खाते, अशी ओळख होती, त्या काळात शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे धाडसी कार्य सुरू करून देणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती सेवा वैयक्तिकरीत्या देखील अखंड चालू ठेवणारे गोविंद हांडे हे स्वतःचीच ईश्वराकडे इतक्या लवकर निर्यात करतील असे स्वप्नातही वाटत नव्हते.

पण नियतीच्या इच्छेपुढे कोणाच चालत का? त्यांच्या जाण्याने आपल्या शेतकरी बांधवांची जशी हानी झाली तशीच राज्याच्या कृषीनिर्यात क्षेत्रात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ - कृषी विभाग’ हे बिरुद सार्थ करणारी निर्यात सेवा खऱ्या अर्थाने हांडे यांनी नावारूपाला आणली आणि त्यांच्या पुढाकारामुळे कृषी विभागामध्ये निर्यात कक्ष स्थापन होऊ शकला.

२००७ मध्ये माझ्यावर पुण्यातील उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेची जबाबदारी आली आणि हांडे यांच्यासोबत माझा जवळचा संबंध आला. कृषिमाल निर्यातीच्या मोठ्या साखळीमध्ये कीडनाशकांचा उर्वरित अंश तपासणे हा एक निर्णायक टप्पा असतो म्हणून याचे महत्त्व मी त्यांच्याकडून समजावून घेतले.

त्यावेळी त्यांचा जागतिक बाजारपेठेचा आणि निर्यातीविषयीचा गाढा अभ्यास लक्षात आला. त्यानंतर दोन वर्षे आम्ही एकत्र काम केले. या काळात राज्याच्या फलोत्पादन निर्यातीमध्ये द्राक्षाबरोबरच डाळिंबाचा विचार होऊ लागला. युरोपची बाजारपेठ ‘गणेश’ आणि ‘भगवा’ डाळिंबाला खुणावत होती.

Govind Hande
Indian Agriculture : स्वदेशी तंत्र हाच विकासाचा मंत्र

पण मोठी अडचण होती ती डाळिंबासाठी उर्वरित अंश संनियंत्रण आराखडा (रेसिड्यू मॉनिटरिंग प्लॅन) तयार नसण्याची! द्राक्ष निर्यातीच्या धर्तीवर युरोपियन देशांमध्ये डाळिंब निर्यातीसाठी बंधनकारक असलेला ‘उर्वरित अंश संनियंत्रण आराखडा’ तयार करण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांचे साहाय्याने पार पाडली. या दरम्यान अपेडा या निर्यात संस्थेबरोबर काम करण्याचा योग आला. केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील यंत्रणेचा राज्याच्या कृषी विभागाशी उत्तम समन्वय साधण्याचे काम हांडे यांनी केले.

देशाच्या फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तोच कित्ता युरोपीय बाजारपेठेमध्ये गिरविण्यामध्ये आपल्या राज्यातले निर्यातदार निश्चितच यशस्वी झाले आणि त्यांना हांडे यांची मोलाची साथ मिळाली. राज्याच्या निर्यात धोरणात त्यांचा मोठा सहभाग राहिला. त्यांची एकच तळमळ असायची की आपल्या राज्यातील निर्यातक्षम उत्पादने घेणाऱ्या जिल्ह्यांमधून अधिकाधिक निर्यात वाढावी व त्यासाठी नवीन निर्यातदार तयार व्हावेत.

यासाठी त्यांनी निर्यातदार मार्गदर्शन अखंडपणे सुरू ठेवले. महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात फायटो सॅनिटरी अधिकारी ही कृषी अधिकारी संवर्गातील पदे निर्माण केली गेली आणि त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

वेगवेगळ्या देशांना फळे, भाजीपाला यांच्या निर्यातीसाठी अत्यावश्यक असलेली सर्व मानके त्यांनी मुखोद्गत केली होती. ते नेहमी सांगायचे निर्यात म्हणजे एका साच्यातून सर्व माल पिकवला आणि कोणत्याही देशाला पाठवला असे नसून प्रत्येक देशाची मानके ही वेगवेगळी असतात.

त्यांचा अभ्यास करून माल तयार करावा लागतो. म्हणून ते नेहमी प्रत्येक देशांचे प्रोटोकॉल समजावून सांगायचे. प्रगतिशील शेतकऱ्यांचा जसा मित्र तसा नवउद्योजकांचा मार्गदर्शक हीच त्यांची छबी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे.

Govind Hande
Indian Agriculture : हवामान बदलाच्या स्थितीत शेती व्यवस्थापनातील बदल

‘ग्लोबल गॅप’सारखा नवीन विषय जेव्हा आला तेव्हा विस्तार यंत्रणेमार्फत बागायतदारांना हा विषय समजावून सांगण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. द्राक्षे, आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी यासारख्या प्रमुख फळपिकांच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी ‘ग्लोबल गॅप’ कसे फायदेशीर आहे, त्याचे प्रमाणीकरण करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी आवश्यक साहित्य तयार केले.

त्याचप्रमाणे केंद्र शासनाने जेव्हा अन्न सुरक्षितता व मानके प्राधिकरण (FSSA) कायदा मंजूर केला तेव्हापासून निर्यातीमधील साखळीमध्ये तसेच प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी HACCP मानके बंधनकारक झाली आणि त्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यापासून उद्योजकांकडून त्याची अंमलबजावणी करून घेण्याचे क्लिष्ट काम हांडे यांनी लीलया पेलले. त्यांनी ज्या ज्या निर्यातदारांना, उद्योजकांना तांत्रिक माहितीच्या जोरावर उभे केले ते आजही त्यांचे ऋण मानतात.

जे जे आपणासी ठावे।

ते ते इतरासी शिकवावे।

शहाणे करून सोडावे। सकल जण।।

समर्थ रामदास स्वामी यांच्या या उक्तीनुसार जीवनात आचरण करणाऱ्या हांडे यांनी त्यांच्याकडील ज्ञान इतरांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व प्रशिक्षण संस्थांमध्ये अनेक व्याख्याने दिली. यशदा पुणे, वनामती नागपूर, व्हॅम्नीकॉम पुणे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अशा अनेक राज्यस्तरीय संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने अनेक धोरणकर्त्यांनी ऐकली आहेत. त्यामुळे अशा सर्व संस्थांमध्ये हक्काचा निर्यात तज्ज्ञ हरपल्याची भावना आहे. शासनाच्या नियमामुळे सर्वच अधिकाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागते आणि त्या धोरणाचा फटका अशा विशेष पदावर तयार झालेल्या आणि अनुभवी अधिकाऱ्यांना आणि पर्यायाने विभागाला देखील होतो.

निवृत्तीच्या अगोदर आणि नंतरही त्यांनी एक खंत बोलून दाखवली होती की विभागामध्ये कृषी निर्यातीसाठी स्वतःहून पुढाकार घेणारे अभ्यासू अधिकारी निर्माण होत नाहीत. तसेच शासनाची धोरणे देखील असे मनुष्यबळ तयार करण्यासाठी फारशी अनुकूल नाहीत. हांडे यांच्या जाण्याने कृषी निर्यात क्षेत्रातील पोकळी भरून काढण्यासाठी विभागातील तसेच खाजगी क्षेत्रातील युवकांनी निर्यातीमधील सर्व टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. राज्य, विभाग व जिल्हास्तरावर तळमळीने काम करणारा अद्ययावत कृषी निर्यात कक्ष कार्यान्वित करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदाशास्त्र विशेषज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com